Sunday, June 6, 2021

प्रत्येक वयात आलेल्या व्यक्तीने वाचावे आणि सुजाण वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक.वाफाळलेले दिवस

                               

                                      लेखक - प्रतीक पुरी

 

 लैंगिकता या विषयी आपल्याकडे उघडपणे बोलले जात नाही. शरीरामध्ये होणारे बदल याविषयी सुद्धा उघडपणे विचारले जात नाही.आपल्याकडे लैंगिकता म्हणजे अश्लील,नाक मुरडला जाणारा,दबक्या आवाजात,चोरून बोलला जाणारा विषय आहे. या विषयी जनजागृती झाली तर त्यामध्ये समाजाचे कल्याणच होणार आहे याची जाण खूप कमी लोकांना आहे. या संदर्भात लैंगिक शिक्षणाचा प्रसार करणारे आदरणीय रघुनाथ धोंडो कर्वे यांच नाव आवर्जून घेतलं पाहिजे. 'लैंगिकता' या विषयावर त्यांनी आपले मत निर्भीडपणे मांडले. पण वेळप्रसंगी त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आत्ता आत्ता कुठे  लैंगिकता या विषयावर जनजागृती होत आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून,चित्रपट,नाटक,पुस्तकांच्या माध्यमातून या विषयावर प्रकाश टाकला जात आहे.'लैंगिकता' याच विषयावर आधारित एक पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे. लेखक प्रतीक पुरी लिखित 'वाफाळलेले दिवस'.  

१७५ पानांच्या या पुस्तकाची कथा,कथेचा नायक जो आठवी इयत्तेमध्ये शिकणारा मुलगा आहे आणि तो नुकताच वयात आलेला आहे. तो या पुस्तकाची कथा आपल्याला सांगत आहे. कथा सांगतेवेळी तो स्वतःला 'आपण' असं संबोधित करतो. त्याच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांविषयी तो सांगत आहे आणि याच सोबत त्याच्या शाळेतील त्याच्या मित्रांमध्ये होणारे शारिरीक बदल, आणि त्याच्या छोट्याश्या प्रेमाविषयीसुद्धा त्याने सांगितलं आहे.

वयात येणाऱ्या मुलामुलींना त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी खूप प्रश्न पडत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना घरातून मिळतातच असं नाही. याचं कारण म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे लैंगिकता हा विषय आपल्याकडे उघडपणे बोलला जात नाही. पुस्तकाच्या कथेमध्ये नायकाला अशाच पद्धतीचे प्रश्न पडतात  (हे प्रश्नसुद्धा खूप गंमतीशीर आहेत उदा. मुलींमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा होत असेल,त्या काय बोलत असतील..? असे आणि अनेक प्रश्न जे वयात येणाऱ्या मुलांना पडतात ते सर्व लेखकाने उत्तमरित्या पुस्तकामध्ये मांडले आहेत.) आणि त्याला त्याची काही उत्तरे त्याचा मित्र 'नित्या' (नित्यानंद) याच्याकडून मिळतात तर काही गोष्टींचे आकलन त्याचे त्याला होत जाते. शरीरामध्ये होणाऱ्या बदलासोबतच त्याच्या विचारांमध्येही बदल होत असतो. त्याच्या या विचारांनी मन थक्क होऊन जाते. कथेमध्ये येणारे प्रसंग खूप मनोरंजक आहेत. विशेष म्हणजे नायक आणि त्याच्या वडिलांचे संभाषण किंवा नायक आणि त्याचा मित्र नित्या यांच्यातील संभाषण.

पुस्तकाची भाषा अश्लील आणि शिवराळ जरी असली तरी ती आजच्या घडीला धरून आहे असं वाचताना वाटतं याच कारण म्हणजे आजकाल  मुलांच्या तोंडी अशीच भाषा ऐकायला मिळते. पुस्तकांच्या याच भाषेने आणि त्याला प्राप्त झालेल्या विनोदी स्वरूपामुळे लैंगिकता या विषयावर मार्मिक भाष्य झाले आहे. त्यासाठी लेखकाचे विशेष कौतुक.

पुस्तकाचे मुखपृष्ठ दिनकर जाधव यांनी साकारले आहे. या मुखपृष्ठाविषयी मांडलेलं मत आणि पुस्तकाचा आशय हे पूरक झालेले दिसून येते. पुस्तकाचे प्रकाशन 'गोल्डन पेज' यांनी केले आहे. प्रत्येक वयात आलेल्या व्यक्तीने वाचावे आणि सुजाण वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक,लेखक प्रतीक पुरी लिखित 'वाफाळलेले दिवस'.


 

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.