पावसाच्या रौद्र रूपाची झड झिंबड

     झड झिंबड

                       लेखक - कृष्णात खोत.

   

   

  शेतकरी वर्ग मिरगाच्या हंगामानंतर ज्याची चातकासारखी वाट बघतो,रणरणत्या उन्हाने तापलेल्या धरणीला आणि संपूर्ण अस्तमानताला शांत करण्यासाठी येणारा वरुणराज पाऊस. पाऊस म्हणजे मंद धुंद गारवा,पाऊस म्हणजे प्रीतीला आलेलं उधाण,पाऊस म्हणजे जमिनीच्या गर्भामध्ये बहरणाऱ्या बीजाला नवचैतन्य देणारा ओलावा, पण सर्वाना सुखकर करणारा हा पाऊसच जर सर्वांचा वैरी बनला तर..? मानवाने निसर्गाची अपरिमित केलेली हानी भरून काढण्यासाठी निसर्ग जर  पावसाच्या रूपाने तांडव करू लागला तर....? याच विषयावर आधारित एक पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलॊ आहे. लेखक 'कृष्णात खोत' लिखित पुस्तक 'झड झिंबड'.

  गाव खेड्यामधील चालणारे राजकारण आणि प्रत्येकाच्या मदतीला कायम धावून जाणारी गाव खेड्यांमधील लोकांचा जिव्हाळा याचे उत्तम दर्शन आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. पावसाळ्यामध्ये नदीला आणि गावालगतच्या ओढ्याला पूर येऊन गावाचा इतर गावांशी संपर्क तुटत असे, यावर उपाय म्हणून पूल बांधला जातो. तो ज्या जागी बांधला जातो ती जागा आणि पूल पुढे गावकऱ्यांसाठी मोठं संकट घेऊन येतो. सन २००५,२०१९ आणि २०२१ या वर्षांमध्ये कोल्हापूर-सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला होता. त्या महापुराच्या संकटामध्ये कितीक  लोकांना आपला जीव गमवावा लागला तर कित्येकांचे संसार उध्वस्त झाले. पावसाच्या त्या प्रलयकारी परिस्थितीवर २११ पानांच्या या पुस्तकाची कथा बेतलेली आहे. पुस्तकामध्ये खूप व्यक्तिरेखा आहेत पण कथेमधील मुख्य व्यक्तिरेखा ही पाऊस आहे. पावसाचा जोर जस जसा वाढू लागतो तशी कथा अजून दाहक आणि रंजक बनत जाते. कथेमध्ये जस जसा पाऊस वाढू लागतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला लेखकाने दिलेलं नाव, उदा. उगाळफुट्या पाऊस, पुलबुडव्या पाऊस,गावहालाव्या पाऊस,बांधफोड्या पाऊस,घरबुडव्या पाऊस,घरपाड्या पाऊस या आणि त्या प्रत्येक नावांवरून आपल्याला त्या त्या परिस्थितीची भीषणता समजून येते. पुस्तकाची कथा वाचकाच्या मनाला पिळवटून टाकते.

  भावनिकतेच्या टोकाला घेऊन जाणारे लिखाण लेखक 'कृष्णात खोत' यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. तसही लेखक कृष्णात खोत यांची प्रत्येक कादंबरी वाचकाला तिच्याकडे ओढून घेते. गाव खेड्यांमध्ये चालणारे राजकारण,खेडेगावातील जनजीवन,तिथल्या रूढी परंपरा,प्रत्येक कुटुंबातील भावनिक ओलावा या सर्व गोष्टी कथेमध्ये असतात त्यामुळे वाचनात गोडी निर्माण होते.

  पुस्तकाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन यांनी केले आहेतर मुखपृष्ठ  राजू देशपांडे यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक 'कृष्णात खोत' लिखित,

  'झड झिंबड'.


  आमच्या चॅनेलला आजच भेट द्या  https://youtu.be/5VIjOdHZY1w

  Comments

  1. Khopach chan chan books chi mahiti milate tumaxhya hya blocksmule
   Aasech navnavin books chi mahiti aamachyaparyant pohochavat ja
   Thank you so much ....
   Keep it up ....

   ReplyDelete
  धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.