Sunday, May 31, 2020

मला उद्ध्वस्त व्हायचंय लेखिका- मालिका अमर शेख

 मला उद्ध्वस्त व्हायचंय

                                   

                            लेखिका- मालिका अमर शेख

 

मालिका अमर शेख यांना आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. मी त्यांना ओळखत होतो ते म्हणजे कवी,समाजसेवक,दलित पँथर संघटनेचे निर्माते नामदेव ढसाळ यांची पत्नी म्हणून. पण आज मालिकाजींची खरी ओळख त्यांच्या आत्मचरित्रामधून झाली. कणखर,मनमोकळा स्वभावाच्या मालिकाजींच्या जीवनाचा  प्रवास मला उद्ध्वस्त व्हायचंय  या पुस्तकामधून त्यांनी मांडला आहे.

२३२ पानांच्या या पुस्तकामध्ये सुरवातीलाच प्रस्थावनेमध्ये मालिकाजींनी त्यांचा त्यांच्या आयुष्याकडे बघण्याचा आणि घडून गेलेल्या त्यासर्व घटनांकडे परत बघते वेळी त्यांचा दृष्टिकोन काय आहे,आत्मचरित्र लिहिणे म्हणजे काय याचे संपूर्णपणे विश्लेषण केले आहे. स्व विषयीचे प्रखंड मत त्यांनी या पुस्तकामध्ये मांडले आहे.

वडील मेहबूब पटेलचे अमर शेख झाले. कामगार-चळवळीमधून लाल बावटा युनियन संघटनेत प्रवेश केला. मग पुढे कॉम्युनिटी पार्टीमध्ये प्रवेश आणि तिथे कुसुम जयकर म्हणजे मलिका शेख यांच्या आईशी ओळख आणि त्यांची फँटॅस्टिक प्रेमकहाणी. मग कोणाच्याही विरोधाला न बधता लग्न.त्यावेळचं  इंटरकास्ट लव्हमॅरेज म्हणजे वाचकाला समजले असेल काय हलकल्होळ माजला असेल. दोन कॉम्युनिस्ट कार्यकर्ते, दोन पुरोगामी मने, त्यांचे समाजाविषयीची मत. त्यांचे हे विचार त्यांच्या पाल्यांमध्ये उतरले असणारच. त्याचे दर्शन घडते ते मलिकाजींच्या मोठ्या बहिणीने कोर्टामध्ये 'माणुसकी' हीच आमची जात असे सांगितले. मलिकाजींचे वाचन हे खूप अफाट होते. लहानपणी त्या ताप आणि विविध प्रकारच्या आजारामुळे त्या घरीच असत त्यामुळे त्यांची पुस्तकांशी चांगलीच मैत्री झाली. वाचनाबद्धलचा त्यांचा अनुभव त्यांनी खूप छान प्रकारे मांडला आहे.आयुष्याचा हिशेब न ठेवता बेभानपणे फेकून देणाऱ्या आणि धुंदपणे जगणाऱ्या मलिकाजींची ओळख कवी,समाजसेवक,दलित पँथर संघटनेचे नेते नामदेव ढसाळ यांच्याशी झाली.खूप कमी संसारी महिला आहेत ज्यांनी आपल्या नवऱ्याला संपूर्ण पणे ओळखलेलं असतं. पण मलिकाजींनी नामदेव ढसाळ यांना संपूर्ण पणे ओळखले होते. मलिकाजींनी नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्वाबद्धल सखोल विश्लेषण केले आहे. त्यामुळे वाचकाला सहज समजून येते कि त्यांनी आपल्या जोडीदाराला किती आत्मसात केले आहे.नामदेवजींच्या व्यक्तिमत्वाला मलिकाजी आई-वडील,नातेवाईक,समाज यांच्याकडून लाड केलेलं लाडकं कोकरू असेही म्हणतात.लेखिकेने नामदेवजींची ओळख ही इतकी जास्त केली आहे की वाचकाला असा प्रश्न पडतो की हे नामदेव ढसाळ यांचे आत्मचरित्र आहे कि काय...?  मलिकजी एक कवयत्री होत्या. ही दोन कवीमने एकत्र आली. मलिकाजींनी त्यांची आणि नामदेवजी यांची झालेली ओळख,मग त्यांचे प्रेम संबंध,त्यांच्या दोघांचं खुलत जाणारे प्रेम,एकमेकाविषयीची मते,त्यांचे मुंबईमध्ये भटकणे आणि त्यासर्व गोष्टी जे प्रेमी युगलक करतात त्यासर्व गोष्टी मलिकजींनी उत्तम प्रकारे मांडल्या आहेत. या दोघांच्या प्रेम कहाणी मुळे पुस्तकामध्ये रंजकता आली आहे.

आता यासर्व गोष्टी वाचून वाचकांना प्रश्न पडला असेल कि इतकं सर्व चांगलं लिहिलं आहे तर मग पुस्तकाचे शीर्षक मला उद्ध्वस्त व्हायचंय असे का...?

तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजेल. कारण एक संघटना चालवणाऱ्या नेत्या सोबत संसार करणे ही साधी गोष्ट नव्हती. प्रसंगी खूप यातना भोगाव्या लागणार होत्या. कधी कधी घरचं सोडून बाहेरचंच बघावं लागणार होतं. त्यामध्ये स्वतःची आणि आपल्या सोबत असणाऱ्या सर्वांची फरफट होणार होती. एका प्रसंगामध्ये मालिकाजीं सांगतात की दलित पँथर संघटनेच्या काही कामसाठी त्यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या आणि त्या पूर्ण कोरड्या झाल्या. पुढे त्यांनी नामदेवजींकडून ठेवलेल्या अपेक्षा कशा भंग झाल्या आणि त्यांचे आयुष्य कसे उध्वस्थ झाले हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.

मालिका शेख जरी या पुस्तकाच्या लेखिका असल्या तरी त्या मूळ कवीच आहेत हे त्याच्या लिखाणावरून समजून येते. वाक्यांची बांधणी अशा प्रकारे केली आहे,की ते वाचतेवेळी आपण एखादे काव्य वाचत आहोत असा भास होतो. वाक्यांच्या अशा मांडणीने मलिकाजीं वाचकाला पुस्तकासोबत धरून ठेवतात. त्यामुळे संपूर्ण पुस्तक वाचून झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही.

पुस्तकाचे प्रकाशन आर्यन पब्लिकेशन्स यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. सुखकर आणि  समाधानी आयुष्याची होरपळ होणार आहे हे माहिती असून सुद्धा अखंड प्रेमासाठी आयुष्य उध्वस्थ करणाऱ्या वाटे कडे मलिकाजीं का गेल्या या गोष्टीचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजेल. मलिक अमर शेख लिखित मला उध्वस्थ व्हायचंय.

 


श्रीजीवन तोंदले


1 comment:

  1. अतिशय सुंदर व वेचक शब्दात मांडणी केल्यामुळे सदर पुस्तक वाचण्याची इच्छा होत आहे ... असेच विविध परिचय देत चला...

    ReplyDelete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.