Thursday, September 26, 2019

अ‍ॅडम लेखक - रत्नाकर मतकरी




अ‍ॅडम

लेखक -  रत्नाकर मतकरी

कामिनी, मानिनी ,स्वामिनी, विजेती, पराजिता, बहरलेली, खुललेली, थकलेली, गांजलेली आणि संतापलेली हे आणि अशी कितीतरी रूपे स्त्री ची आहेत. कधी ती पराजिता असते तेव्हा तो विजयानं उन्मत्त होऊन थयथया नाचत असतो. आणि कधी ती स्वामिनी असते तेव्हा तो तिच्या शेजारी हात जोडुन दास बनुन उभा असतो. मंडळी असं म्हणतात कि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण तिच स्त्री जर त्या पुरुषाच्या यशामध्ये वाटा मागू लागली तर.... आणि तिच स्त्री त्याचं जीवन उद्ध्वस्त करू लागली तर.

नमस्कार मंडळी वरील विषयाला अनुसरूनच एक कादंबरी तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. एका अशा लेखकांची कादंबरी जे भय आणि गुढ कथा, तसेच साहित्य, रंगभूमी,  दूरदर्शन, चित्रपट, नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, ललितलेख  अशा वेगवेळ्या साहित्यप्रकारामधुन त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. ते लेखक म्हणजे आदरणीय रत्नाकर मतकरी सर. आज त्यांची एकमेव कादंबरी अ‍ॅडम हे तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे.

कादंबरीच्या सुरुवातीला तामिळ म्हण आहे,त्याचा मराठी मध्ये अर्थ पण दिला आहे. कादंबरीची कथा त्या म्हणीशी समरस आहे. असे म्हंटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कथेचा नायक वरदा अत्यंत हुशार,सहिष्णु, कष्टाळू. त्याच्या वाढत्या वया प्रमाणे त्याच्या शरीरामध्ये होणारे बदल आणि स्त्री शरीराविषयीच त्याचे आकर्षण. कुमार वयातच मिळालेलं शरीर सुख आणि पुढे पुढे ते सतत मिळत जाते. यामुळे वाचकाला सुरवातीला ही कादंबरी विक्षिप्त वाटते. पण जस जसे आपण अजुन या कादंबरीच्या जवळ जातो तस तसे आपण कादंबरीकडे आकर्षित होतो.

कादंबरीची कथा ही प्रामुख्याने तिचा नायक  वरदा याची आहे. वरदा आणि त्याचं स्त्री शरीर विषयीच आकर्षण हे काहीस बऱ्याच पुरषांच असतं तसच आहे. पुढे त्याच्याकडे आकर्षित झालेल्या स्त्रिया त्यांच्या समाधानासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला जवळ करतात पुढे अशाच काही स्त्रिया त्याच्या आयुष्यात येतात त्या पण स्वतःच्या स्वार्थासाठीच. शरीर सुखासाठी वेडा झालेल्या वरदाला हे लवकर समजत नाही. महाविद्यालयीन जीवनात तो प्रेमात पडतो. शामला सोबत लग्न करून सुखाने संसार करावा या इच्छेने वरदा साध्या कामगाराची नोकरी सुद्धा पत्करतो, पण  तिच शामला स्वतःच्या स्वार्थासाठी प्रेमाचं नाटक करुन त्याच्याशी लग्न करते आणि  पुढे त्याच्या जगण्याची वाट लावते आणि पहिल्या प्रियकराशी उघडपणे संबंध ठेवते. यावरच न थांबता ती वेळोवेळी वरदाला त्रास देऊन त्याला जेरीस आणते. वरदाची ही झालेली फरफट वाचते वेळी मन हादरून जाते. आता पुढे काय होणार याची उत्खणटा वाचकाच्या मनाला लागुन राहते.

कथेच्या शेवटी शेवटी जाते वेळी कथे मध्ये अजुन एक कथा येते ती म्हणजे "प्रेमाची". प्रेमा ही नवऱ्याने अतिछळ करून टाकलेली दोन लहान मुलांची आई. या प्रेमाचे तिच्या नवऱ्या कडुन झालेले छळ वाचतेवेळी  मन सुन्न होते. देह विक्री करण्यासाठी प्रवृत्त होते ते तिच्या लहान मुलांच्या पोटाला दोन घास घालण्यासाठी. आपल्या आईच्या सल्ल्याने ती वरदाचा शोध घेत बेंगळूरला येते. तिची करुण कथा ऐकुन वरदा तिला तिच्या मुलांसकट आधार देतो. त्या दोघात कोणतेही नाते नसताना सुद्धा नवर-बायको सारखे राहू लागतात. जे शरीर सुख लग्नाच्या बायको कडुन म्हणजेच शामला कडुन मिळाले नाही ते वरदाला प्रेमा कडुन मिळत जाते.

इथं पर्यंत वाचकाला वाटते की वरदाचा संघर्ष आणि त्याची फरफट संपली पण तो वाचकाचा गैर समज होतो. ज्या प्रेमाला तो तिच्या मुलांसह आधार देतो तिच प्रेमा त्याच्या घरात वाटा मागते. पुढे अनपेक्षतपणे त्यांच्या आयुष्यात आलेल्या निर्मला कडुन सुद्धा त्याला प्रेम आणि सर्व काही सुख मिळते. त्याच्या वर जिवापाड प्रेम करणारी निर्मला आणि तिचे प्रेम  वरदाला काही काळच लाभते.सरते शेवटी वरदा एकटा पडतो. त्याच्या आयुष्यात आलेल्या त्या सर्व स्त्रिया त्याचे सर्व आयुष्य धुन नेतात आणि त्याला घर का ना घाट का अशा अवस्थेत सोडून देतात.

कादंबरीचा शेवट हा कादंबरीच्या सुरवातीला असलेल्या म्हणी ने केला आहे. त्यामुळे वाचकाला कादंबरीची खरी कथा समजते.कादंबरीमधील भाषा अत्यंत सोपी आहे. कादंबरी मध्ये काही ठिकाणी तामिळ शब्दांचा वापर केला आहे त्यामुळं वाचनामध्ये काही अवघडले पणा येत नाही.कादंबरीचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन यांनी केले आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केले आहे.कादंबरी विक्षिप्त वाटत असली तरी ती भन्नाट आहे. प्रत्येक वाचकाच्या संग्रही ती असलीच पाहिजेल आणि प्रत्येक वाचकाने जरूर वाचावी अशी कादंबरी लेखक रत्नाकर मतकरी लिखित अ‍ॅडम.



-        श्रीजीवन तोंदले