Sunday, October 24, 2021

मानवी मनामध्ये चाललेल्या युद्धाचे वर्णन या पुस्तकामध्ये दिसून येते.

 



शीतयुद्ध सदानंद

 

                                                 लेखक - श्याम मनोहर

 

 

'शीतयुद्ध'  हा शब्द ऐकला की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्धाची आठवण येते. 'शीत' या शब्दापेक्षा त्याची दाहकता कितीतरी पटीने जास्त होती, हे आपण इतिहासामध्ये वाचलंच आहे.भयंकर दाहकता असणाऱ्या त्या शीतयुद्धापेक्षा विनोदी आणि प्रत्येक वळणावर उत्सुकता वाढवणारं एक शीतयुद्ध माझ्या वाचनात आले आहे. आता मंडळी तुम्ही म्हणाल युद्ध आणि त्यातही शीतयुद्ध आणि ते ही विनोदी हे कसं काय ? तर मी बोलत आहे, लेखक श्याम मनोहर लिखित 'शीतयुद्ध सदानंद' या पुस्तकाविषयी. मूळ मराठी भाषेमध्ये असणाऱ्या या कादंबरीचा कन्नड अनुवाद झाला आहे. यासोबतच या कादंबरीवर आधारीत मराठी नाटक आणि एक मराठी सिनेमा सुद्धा प्रदर्शित झाला आहे.  'मनुष्य प्राणी' हा वरून जसा दिसतो तसा तो त्याच्या आतूनही असतो असं नसतं. त्याच्या वागण्यामध्ये आणि विचारांमध्ये फरक असतोच. मानवी मनामध्ये चाललेल्या युद्धाचे वर्णन या पुस्तकामध्ये दिसून येते.  

१२२ पानांच्या या पुस्तकाची कथा एखाद्या पुराणकथेला शोभेल अशी आहे. कथेचा नायक 'सदानंद' हा त्याच्या स्कूटरने जात असतो आणि रस्त्याने जाणारी छोट्या बाळाची प्रेतयात्रा त्याला आडवी येते. स्कूटरवरचा त्याचा कंट्रोल सुटतो आणि छोट्या बाळाच्या प्रेताला धक्का लागून ते प्रेत रस्त्यावर पडते.प्रेतयात्रेमध्ये असणारे दोन पैलवान श्रीरंग आणि गोविंद हे दोघे बाळाचं प्रेत पडलं म्हणून चिडतात आणि सदानंदला शिक्षा द्यायची असं ठरवतात. आणि इथून कथेला सुरुवात होते. पुढे  कशा प्रकारे सदानंदला ते दोघे शिक्षा करता हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.

सदानंद-श्रीरंग-गोविंद या तिघांमध्ये चालणारे हे शीतयुद्ध वाचते वेळी एक धमाल आनंद येतो. कारण हे शीतयुद्ध जस जसे पुढे जाईल तसे वाचकाच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते. सदानंद याला शिक्षा करण्यासाठी श्रीरंग आणि गोविंद कोणकोणते उपाय शोधतात आणि त्यांच्या पासून स्वतःला वाचवण्यासाठी सदानंद कायकाय शकला लढवतो यावरून आपल्याला हे समजून येते की माणूस  वरून कितीही चांगला,नैतिकतेने वागण्याचा प्रयत्न करत असला तरी तो आतून किती अनैतिक किंवा त्याच्या अंतर्मनात सुरू असणारे विचार हे किती कल्पनेच्या पुढचे आणि  धक्कादाक असतात हे लेखक श्याम मनोहर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे मांडले आहे.पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे कथेची सुरुवात आणि कथेमधील व्यक्तिरेखांचा होणारा परिचय. सदानंदला त्याचे शेजारी या प्रकरणामध्ये खूप मदत करतात. मदत करतेवेळी त्यांच्या मनामध्ये सुरु असणारा कल्लोळ वाचनामध्ये रंजकता निर्माण करतात.

या पुस्तकाच्या माध्यमातून एक गोष्ट प्रकर्षाने समजून येते ती म्हणजे कधी कोणाच्या कशा भावना दुखावल्या जातील हे सांगता येत नाही. सध्याच्या जगामध्ये आज-काल कोणाच्या कशावरून भावना दुखावल्या जातात हे आपण व्यावहारिक जीवनात पाहत असतोच. त्यामुळे आपल्याला बोलताना, चालताना, लिहिताना, समाजामध्ये वावरत असताना या गोष्टीचे सतत भान ठेवले पाहिजे की आपल्या एखाद्या कृतीने कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत. नाही तर सदानंदच्या मागे जसे श्रीरंग-गोविंद लागले तसे आपल्या मागे न लागोत एवढंच....

पुस्तकांचे प्रकाशन 'पॉप्युलर प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ हे पुस्तकाच्या कथेला समरूप आहे. माणसाच्या मूळ वर्तनामागे असलेल्या त्याच्या आंतरक्रियेमध्ये चालले आणि होणारे बदल हे किती विदारक असतात हे जाणून घेण्यासाठी हे भन्नाट असे पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचलेच पाहिजे. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक श्याम मनोहर लिखित 'शीतयुद्ध सदानंद'.


Sunday, October 17, 2021

नैतिक आयुष्याला पडलेला आणि न सांधता येणार तडा....





तडा

 

                                 लेखक - डॉ. एस.एल.भैरप्पा.

मराठी अनुवाद लेखिका -  सौ.उमा.वि.कुलकर्णी.

 

 

एकदा का काचेच्या भांड्याला तडा गेला, तर तो परत सांधता येत नाही. तसेच मनुष्याच्या नैतिक आयुष्याला एकदा का तडा गेला, मग तो त्याच्या अजाणतेपणी असो वा जाणतेपणी तो परत सांधता येत नाही. स्वतःचे आयुष्य  मुक्त आणि स्वतंत्रपणे जगाता यावे यासाठी तो कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो यामध्ये तो स्वतःची वाताहत करून घेतोच पण दुर्दैवाने त्याच्या सोबत असणाऱ्यांची सुद्धा फरपट होत असते. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्याला याची जाणीव सर्वात शेवटी होते. याच मानसिकतेची एक विदारक कहाणी सांगणारे पुस्तक घेऊन मी आलो आहे. मंडळी मी बोलत आहे लेखक डॉ.एस.एल.भैरप्पा लिखित 'तडा' या कादंबरीविषयी.

२८६ पानांच्या या कादंबरीची मूळ भाषा कन्नड आहे आणि त्याचा मराठी अनुवाद लेखिका सौ.उमा.वि.कुलकर्णी यांनी केला आहे. पुस्तकाचे कथानक जयकुमार-मंगला आणि ईला-विनय या व्यक्तिरेखांवर आधारित आहे. जयकुमार हा एक व्यावसायिक आहे त्याची मध्यम आकाराची कंपनी आहे. जयकुमार आणि त्याची पत्नी वैजयंती या दोघांनी मिळून ही कंपनी उभारलेली असते. पुढे एका अपघातामध्ये वैजयंतीचा मृत्यू होतो आणि जयकुमार एकटा पडतो. पत्नीच्या मृत्यूनंतर काही वर्षाने जयकुमार त्याच्या ऑफिसमधील त्याची पी.ए मंगलाकडे ओढला जातो. वैवाहिक जीवनातील शरीर सुख त्याला मंगलाकडून मिळू लागते. पण पुढे जाऊन त्याच्या हातून एक चुकीची गोष्ट घडते ज्याने त्याच्या संपूर्ण आयुष्याला तडा जातो.

 मंगला ही एक कर्तृत्वान स्त्री जी तिच्या महाविद्यालयीन जीवनापासून स्वतःच्या पायावर उभी राहून शिक्षण पूर्ण करून  जगणारी स्वावलंबी स्त्री.  पण सुरवातीच्या काळामध्ये ती अशा काही लोकांच्या आहारी जाते आणि तिथून तिच्या नैतिक आयुष्याला तडा जातो जो तिच्या संपूर्ण आयुष्यात तिला परत सांधता येत नाही आणि ती त्यामध्येच अडकून पडते.

 दुसरी कथा आहे ती विनय आणि ईला यांची. विनय हा एका मोठ्या कंपनी मध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहे. साधं सरळ आयुष्य जगणाऱ्या विनयला नोकरीमध्ये  बढती मिळून तो दिल्लीला निघून जातो.आपल्या होणाऱ्या प्रगतीमध्ये आपल्यासोबत आपल्या पत्नीने इलाने यावे अशी त्याची इच्छा असते पण सुरवातीपासून स्वतंत्र आणि मुक्त रहाणारी, पाश्चात्य संस्कृतीची ओढ असणारी आणि प्रचंड आणि फुटकळ स्त्रीवादीपणा मिरवणारी ईला पती सोबत जाण्यास नकार देते. दोघांचे वैवाहिक जीवन दुरावते आणि इथे त्यांच्या संसाराला तडा जातो आणि तो कधीच परत सांधला जात नाही.

 आपल्या देशामध्ये बायकांसाठी कायदाचे झुकते माप आहे. याच गोष्टीचा गैरफायदा आपल्या समाजामधील काही लोकं, संघटना स्वतःच्या फायद्यासाठी किंवा एखाद्याला कायमची अद्दल घडवण्यासाठी कायद्याचा स्वतःच्या सोयीने वापर करतात. या पुस्तकातील दोन्ही गोष्टींमधून समजून येते की याच कायदाचा कशा पद्धतीने चुकीचा वापर झालेला आहे. स्त्रीवादी म्हणून मिरवणाऱ्या आणि स्त्री चळवळीच्या नावाखाली समस्त पुरुष जात वाईट आहे आणि त्यांनी नेहमी स्त्रियांवर अन्याय केला आहे या गैरसमजाखाली वावरणाऱ्या काही व्यक्तिरेखा या पुस्तकामध्ये आहेत. कथेमधील नायक जयकुमार हा अशाच संघटनांना बळी पडतो. त्याची झालेली वाताहत वाचून मन सुन्न होते. सरते शेवटी त्याच्या या अवस्थेला सर्वस्वी तोच जबाबदार आहे हे वाचकाला समजून येते.

पुस्तकाच्या शेवटी शेवटी मूळ कथेमध्ये काही अन्य कथा मिसळल्या आहेत ज्यामुळे वाचनात थोडासा रसभंग होतो. बाकी पुस्तकामधील मूळ दोन कथा या एकमेकांसोबत जोडल्या आहेत हे पुस्तकाच्या शेवटी समजून येते. या पुस्तकाची कथा ही वाचकालाच नव्हे तर सर्वाना बोध देणारी आहे. कितीही स्वतंत्र आणि मुक्त आयुष्य जगायचे असेल तरी सर्व प्रथम त्या स्वातंत्र्याचा, त्या मुक्तीचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि एखाद्या गोष्ठीची चटक लागली तर त्यावर स्वतःला आवर घालता आला पाहिजे. या गोष्टी जर आपल्याला जमल्या नाहीत तर आपल्या नैतिक आयुष्याला तडा जाणे साहजिक आहे. आणि  एकदा का तडा गेला की तो.......

पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. या सुंदर पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखिका सौ.उमा.वि.कुलकर्णी यांनी अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये केला आहे. पुस्तक वाचतेवेळी वाचकाला कुठेही हे अनुवादित पुस्तक आहे याचा भास किंवा जाणीव होत नाही.  प्रत्येक अभ्यासू वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक डॉ.एस.एल.भैरप्पा लिखित 'तडा'. पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. या सुंदर पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखिका सौ.उमा.वि.कुलकर्णी यांनी अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये केला आहे. पुस्तक वाचतेवेळी वाचकाला कुठेही हे अनुवादित पुस्तक आहे याचा भास किंवा जाणीव होत नाही.  प्रत्येक अभ्यासू वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक डॉ.एस.एल.भैरप्पा लिखित तडा.


 

Sunday, October 3, 2021

तिसरा डुळा, मानवी समाजातील अप्रकाशित लोकांवर प्रकाश टाकणारा....





तिसरा डुळा

 

लेखक - किरण येले  

           

 खूप दिवसांनंतर एक भन्नाट असा कथा संग्रह वाचायला मिळाला. या कथा संग्रहामधील प्रत्येक कथा सुरस आहे. विशेष कौतुक म्हणजे लेखकाच्या भोवती घडणाऱ्या घटनांचे, त्याच्या आयुष्यामध्ये आलेल्या व्यक्तींचे बारीक निरीक्षण करून त्या सर्वांना कथेच्या स्वपरुपामध्ये एकत्र आणून त्याची उत्तम मोट बांधली आहे. या आधी लेखकाने लिहिलेला कविता संग्रह वाचला होता, अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये मांडणी केली असली तरी प्रत्येक ओळ ही काळजाला भिडणारी. मंडळी मी बोलत आहे, कवीकथाकारनाटककार किरण येले यांच्याबद्दल. त्यांनी लिखाणबद्ध केलेला कथासंग्रह 'तिसरा डुळा' या कथासंग्रहाबद्दल आज मी लिहिणार आहे.

१९२ पानांच्या या कथा संग्रहामध्ये ७ कथा आहेत. ज्या survival of fittest या सृष्टीच्या नियमावर आधारलेल्या आहेत. या सर्व कथा त्या लोकांच्या आहेत जे समाजाच्या एका कोपऱ्यामध्ये आहेत. ज्यांच्यावर कधीच प्रकाश पडलेला नाही.  ती सर्व लोकं या आधी लेखकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेली आहेत किंवा येऊन गेलेली आहेत, त्या सर्वांचे तपशीलवार वर्णन लेखकाने केले आहे. अशा प्रकारे या सात कथांनी हा कथासंग्रह बनला आहे. जो अक्षरशः वाचकाच्या मनाचा ठाव घेतात,वाचकाला त्याच्या सोबत धरून ठेवतो. 

धार्मिक दंगल म्हणजे दोन धर्मांतील मूर्ख अनुयायांत झालेली दंगल या पंच लाईनवर आधारीत काही कथा या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात, मग त्यामध्ये हारून फ्रेम वर्क्स, “इस्साक पक्का हिंदू होता, असुविधा के लिये खेद है, जावेद जिवंत आहे. या कथा त्या लोकांच्या आहेत जे आपल्या समाजामध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आपल्या समाजातील काही लोक अजून त्यांना आपलं म्हणायला तयार नाहीत. कथा वाचून पूर्ण झाल्यावर आपल्याला वर नमूद केलेल्या विषयाचे गांभीर्य समजून येते. तसेच इतर कथा म्हणजे झुंबर, प्रॉपर्टी एक्सिबिशन, तिसरा डुळा या कथांचा विषयसुद्धा भन्नाट आहे.

ज्या कथेच्या नावावरून या कथासंग्रहाचे नाव आहे ती कथा म्हणजे 'तिसरा डुळा'. ही कथा माझ्या खूप जवळची आहे. कथेचा नायक म्हादू हा एक छोटा मुलगा आहे ज्याची भगवान शिवावर खूप भक्ती आहे, तो भगवान शिवांना आपला मित्र मानतो आहे. देवाला शंकर असं एकेरी नावाने बोलावलं तर त्याला राग येतो. असीम भक्ती असणारा हा छोटा म्हादू त्याला ही भक्ती त्याच्या बापाकडून ज्याला तो जगड्या म्हणून हाक मारतो. त्याची आई मंगळी तिला सुद्धा तो आई न म्हणता मंगळी म्हणून हाक मारतो आहे. गाव गावांमध्ये होणाऱ्या जत्रांमध्ये भगवान शिवांची चित्र काढून,दोरीवरचे खेळ करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब. एक प्रसंग असा घडतो ज्यामध्ये जगड्याचा मृत्यू होतो आणि मंगळी समोर म्हादूला घेऊन पुढचे आयुष्य कसे व्यथित करायचे असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा तिला एक कल्पना सुचते, येणाऱ्या जत्रेमध्ये म्हादुला भगवान शिवांचे सोंग घेऊन,नाच करायला लावायचा आणि त्यातून पुढच्या आयुष्याचा रोजगार करायचा. आपण भगवान शिवांचे सोंग घ्यायचे या कल्पनेनेच म्हादू हरकून जातो. महादेवाप्रमाणे आपल्याला ही तिसरा डोळा असावा असे त्याला वाटते. तिसरा डोळा उघडून वाईट गोष्टी नष्ट कराव्या असं त्याला वाटत असतं. पुढे एक अशी घटना घडते की त्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते.

कथा संग्रहामधील प्रत्येक कथा अप्रतिम आहे आणि वाचून पूर्ण झाल्यावर आपण त्या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करून विचार करू लागतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ आपल्याला या पुस्तकाकडे खेचून घेते. ते मुखपृष्ठ साकारले आहे सतीश भावसार यांनी. पुस्तकांचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन यांनी केले आहे.प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक कवी,कथाकार,नाटककार किरण येले लिखित 'तिसरा डुळा'.