तात्पर्य
लेखक - अवधूत डोंगरे
'मुलं म्हणजे देवाघरची फ़ुलं. प्रत्येकलहान मूल अत्यंत निरागस आणि निष्पाप असते. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्यांना खूप प्रश्न पडत असतात. कधी या प्रश्नांची उत्तर त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून मिळतात तर कधी शाळेतून. पण काही प्रश्नांची उत्तरे जेव्हा त्यांना मिळत नाहीत तेव्हा ते स्वतः त्या प्रश्नांची उत्तर मिळवतात. त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रत्येक गोष्टींमधलं 'तात्पर्य' शोधून काढतात. त्यांनी शोधलेलं तात्पर्य हे कधी कधी इतकं विशाल असतं की त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेचं आश्चर्य वाटतं. आणि हा कधी कधी त्यांनी काढलेले अंदाज चुकातातही. पण अंदाज चुकला म्हणून ती कधी थांबत नाहीत. नवीन गोष्ट,नवीन प्रश्न,नवीन उत्तर,नवीन अंदाज,नवीन तात्पर्य. तुमच्या लहानपणी तुम्ही सुद्धा असच प्रत्येक गोष्टींमधील तात्पर्य शोधत होता ना...?
नमस्कार मंडळी, आज एक असं पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला
आलो आहे,की जे वाचल्यावर तुम्हाला वाटेल की,हे तर लहान मुलांचं पुस्तक आहे मग आम्ही का वाचावं ? किंवा तुम्ही म्हणाल की हे तर बालसाहित्य आहे. तर मंडळी मी म्हणेन की कुठलच साहित्य हे बालसाहित्य नसतं. जो
ते ज्या पद्धतीने वाचतो,एखाद्याला ज्या पद्धतीने त्याच आकलन
होतं त्यावरून ते साहित्य कोणत आहे, ते तो ठरवेल. मी बोलत आहे लेखक अवधूत डोंगरे लिखित 'तात्पर्य' या पुस्तकाबद्दल. २००८-0९ या कालावधीमध्ये 'साधना' साप्ताहिकात छापून आलेल्या,दोन ते तीन पानाच्या छोट्या छोट्या ९
गोष्टी असणारं हे पुस्तक फक्त ४० पानांचं आहे. पाचवी-सातवीतल्या मुलांच्या या गोष्टी आहेत. म्हणजे त्या वयामध्ये
प्रत्येक मुलाला प्रश्न पडत असतात. प्रत्येक गोष्टींमागची कारणं ते शोधत असतात. कुतुहलापोटी पडणारे प्रश्न,त्यामधून काढलेलं तात्पर्य,असं ते वय असतं. चावत असणारा डास बघत बसणे,लाजाळूच्या झाडांची पाने स्पर्श होताच मिटणारी, ही झाडे जर सजीव असतात तर ती नक्कीच माणसांसारखा विचार करत असतील किंवा
त्यांचे स्वभाव कसे असतील,जसा प्रत्येक माणूस वेगळा तसे प्रत्येक
झाड वेगळे त्यांचे स्वभाव वेगळे. अशा गोष्टींमध्ये त्यांनी केलेले अंदाज आणि शोधलेली उत्तरंही योग्यच वाटतात. पण कधी कधी त्यांचे अंदाज चुकतात,सांगता येण्यासारखं तात्पर्य मिळत नाही,अशाही कथा या
पुस्तकामध्ये आहेत. पण प्रत्येक कथा भन्नाट आहे,मनाला स्पर्श करून जाणारी आहे. आपल्याला आपल्या बालपणींच्या आठवणींचं दर्शन
घडवणारी आहे. पुस्तक वाचायला सुरूवात केल्यावर ते कधी संपत हे समजतही नाही. जेव्हा पुस्तक वाचून संपते
तेव्हा वाचक नकळत आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून जातो, हा मला आलेला अनुभव आहे.
पुस्तकाचे प्रकाशन 'साधना प्रकाशन' यांनी केले आहे.या पुस्तकामधील अजून एक
विशेष गोष्ट म्हणजे यातील चित्रे. प्रत्येक गोष्टीला अनुरूप असणारी ही चित्रे आणि पुस्तकाचे मुखपृष्ठगिरीश सहस्रबुद्धे यांनी साकारलेली आहेत. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि
प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक. लेखक अवधूत डोंगरे लिखित 'तात्पर्य'.
श्रीजीवन तोंदले