Sunday, November 8, 2020

एका जरी सुखी संसारामध्ये व्यसनमुक्तीचा दिवा प्रज्वलित झाला तरी सार्थक झाले....

 मुक्तांगणची गोष्ट

 

                                                                    लेखक - अनिल अवचट

 

 

एखादी संस्था उभारणे आणि ती नावारुपाला आणणे कठीण काम असते. हे काम अजून कठीण तेव्हा होत, जेव्हा त्याविषयामधील जास्त माहिती आपल्याजवळ नसते. संस्थेसाठी लागणारी जागा,निधी आणि ते कुठून मिळणार याची जोडणी असेल तरच संस्था उभी राहू शकते आणि टिकू शकते. आताच्या घडीला हा विषय वेगळा नाही  पण तेव्हाच्या वेळी हा विषय खूपच वेगळा होता. यासारख्या विषयावर काम करणारी एखादी संस्था असते असा प्रश्न लोकांना पडला होता.

नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आलॊ आहे लेखक अनिल अवचट यांनी लिखाणबद्ध केलेला त्याच्या संस्थेचा प्रवास म्हणजेच 'मुक्तांगणची गोष्ट'. मुक्तांगण ही संस्था व्यसनमुक्ती केंद्र आहे. आता व्यसन म्हणजे फक्त दारूचं नव्हे तर त्यामध्ये ड्रग्ज,सिगारेट,गांजा यांसारख्या व्यसनांचाही समावेश होतो. या व्यसनांच्या आहारी जाऊन कित्येक लोकांनी आपल्या सुखी आयुष्याची वाताहत केली आहे,स्वतःची आयुष्य उध्वस्त केली आहेत,असं स्पष्ट म्हंटलं तरी चालेलआणि अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. मुक्तांगण ही संस्था सुरु करावीयाला कारण ठरली ८५ साली घडलेली एक घटना. ती घटना वाचल्यावर आपल्याला समजून येते की ही संस्था निर्माण करायची गरज का होती.मग संस्था सुरू केली तरी ती चालवायची कशी किंवा उपचार पद्धती कशी असावीया विषयीचे पुरेसे ज्ञान आपल्याकडे नाही, या अडचणीने न थांबतावा डगमगता आपण पेशंटकडूनच ते समजून घेऊ आणि त्यांच्याकडूनच शिकू हा फंडा अमलात आणला गेला.पेशंटकडून शिकायचं आणि त्याच्यावर उपचार करायचे याच पद्धतीने या संस्थेचं काम आजतागायत सुरु आहे. मुक्तांगण ही संस्था उभारण्यासाठी खूप लोकांची मदत झाली. त्यामध्ये एका दांपत्याचे नाव आवर्जून घेतले पाहिजे ते म्हणजे पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांचं. पु.ल.देशपांडे यांनी जेव्हा मुक्तांगणला देणगी दिली तेव्हा ते म्हणाले होते की"एका जरी घरी व्यसनमुक्तीचा दिवा लागला,तरी माझ्या देणगीचे सार्थक झाले असे मी समजेन." आणि खरंच त्यांच्या देणगीचे सार्थक झाले कारण कितीतरी लोकं मुक्तांगणमुळे व्यसनमुक्त झालीआणि पूर्ववत निर्व्यसनी आणि आनंदीआयुष्य जगू लागली.

मुक्तांगणची गोष्ट या पुस्तकातून लेखकाने म्हणजेच बाबांनी या संस्थेचाआत्ता पर्यंतचा प्रवास,त्यांना आलेले चांगले वाईट अनुभव,संस्थेमध्ये होणारे उपचार मग ते कोणत्या प्रकारे केले जातात,त्याचा पेशंटवर कसा परिणाम होतो,पेशंट या संस्थेमध्ये जेव्हा उपचारासाठी येतो तेव्हा त्याला कोणती कामे करावी लागतात. संस्थेमधील कामे हे तेथील पेशंटचं करतात उदा.स्वच्छता,जेवण.... इथून पेशंटचा स्वावलंबनाचा प्रवास कसा सुरु होतो,संस्थेमध्ये होणारे कार्यक्रम याविषयी बाबांनी सखोल लिहिलं आहे. व्यसन मग ते कोणतही असो सिगारेट,ड्रग्ज,दारू यासारख्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांचे आयुष्य कसेउध्वस्त झाले, त्यांच्या या व्यसनाचा घरच्या लोकांना किती त्रास होतो, त्याचा घरातल्या लहान मुलांवर कसा परिणाम होतो याबद्दल लिहिताना काही पेशंटच्या हकिगतीसुद्धा बाबांनी पुस्तकामध्ये मांडल्या आहेत.त्या वाचल्यावर समजून येते की एका व्यसनापायी संपूर्ण कुटुंब कसे उध्वस्त होते.

वर उल्लेख केल्या प्रमाणे पु.ल,देशपांडे  देणगी देतेवेळी जे उद्गारले होते त्याला जोडून लेखक अनिल अवचट (बाबा) म्हणतात की"हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणाऱ्या एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसला तर सार्थक झालेअसे समजेन." यापुढे जाऊन मलासुद्धा असे म्हणावेसे वाटते की मी लिहिलेला या पुस्तकाचा परिचय वाचून एखाद्याने हे पुस्तक वाचले आणि त्याच्यावर इच्छीत परिणाम झाला आणि तो व्यसनांपासून दूर राहिला तर माझं हे पुस्तक वाचणं आणि हा परिचय लिहिणं सार्थक झालं असं समजेन.

पुस्तकाचे प्रकाशन 'समकालीन प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुभाष अवचट यांनी केले आहे. हे पुस्तक तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही सुरु करणार असाल आणि इच्छित ध्येय गाठायचं असेल. सुरवातीला काही वाईट अनुभव येतील त्यामधून योग्य निर्णय घेऊन कशी वाटचाल करायची या संधर्भात सुद्धा आपल्याला मदत करते. प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक अनिल अवचट (बाबा) लिखित 'मुक्तांगणची गोष्ट.'जरूर वाचा.