Sunday, July 19, 2020

महात्मा गांधी हे द्वेष करण्यासाठी नाही आहेत तर त्यांनी शिकवलेली सुंदर जीवनमूल्ये आत्मसात करण्यासाठी आहेत.






गांधी का मरत नाही ?


लेखक- चंद्रकांत वानखडे

 

माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग म्हणजे पुस्तकं. पुस्तकांमुळे माझं आयुष्य समृद्ध झाले. खऱ्या अर्थाने मी विचारांनी,बोलण्याने,स्वभावाने आणि मनाने समृद्ध झालो ते फक्त पुस्तकांमुळे. आता पर्यंत खूप पुस्तकं वाचली. त्यामधून खूप काही शिकायला मिळाले. प्रत्येक गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची दृष्टी प्राप्त झाली. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात,एक चांगली आणि दुसरी वाईट. पण बघणारा कोणत्या हेतूने बघतोय आणि त्याचा हेतू चांगला आहे की वाईट त्यावर हेठरते.आपल्या भारत देशाला खूप मोठा इतिहास आहे. मग तो पौराणिक असो राजकीय वा शूरवीरलढ्वय्यांचा.भारतीयस्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बघितला तर तो खूप मोठा आहे. २०० वर्षाहून अधिक काळ आपण इंग्रजांशी झगडा केला आपल्या स्वातंत्र्यासाठी. या स्वातंत्र्य  प्राप्तीच्या लढ्यामध्ये आपल्या देशाला अनेक महापुरुष मिळाले. ज्यांनी वेळ प्रसंगी आल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिली.त्यांची ही असीम देश भक्ती आज आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, सुखदेव, राजगुरु, लोकमान्य टिळक, स्वा.सावरकर, सरदार पटेल,नेहरू जेवढी नावे घेऊ तेवढी कमीच आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यामधील या सर्व महापुरुषांमध्ये एक नाव खूप महत्वाचे आहे. ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी,राष्ट्रपिता गांधी......

नमस्कार मंडळी,आज एक असं पुस्तक घेऊन आलो आहे; जे तुम्हाला सांगेलकी प्रत्येक गोष्टीच्या जरी दोन बाजू असल्या तरी.(वर नमूद केल्याप्रमाणे चांगली आणि वाईट). पण हे पुस्तक तुम्हाला सांगेल की लोक आपल्या स्वार्थी वृत्तीमुळे,आपल्या वाटेमध्ये कोणी येत असेल तर त्याला बाजूला करण्यासाठी त्याच्या विषयी वाईट गोष्टी आपल्या कुजबुज मोहिमेद्वारे समाजामध्ये पसरव्याच्या आणि त्याची बदनामी करायची.आत हे सर्व पहिल्या पासून गांधींच्या वाट्याला आलं आहे.यासर्वांच्या पलीकडे जाऊन खरे महात्मा गांधी जाणून घ्यायचे असतील तर चंद्रकांत वानखडे लिखित गांधी का मरत नाही ? हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

१६६ पानांच्या या पुस्तकामधून मोहनदास करमचंद गांधी यांचा राष्ट्रपिता गांधी, महात्मा गांधी पर्यंतचा प्रवास लेखकाने अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. सूटाबूटातील बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी ते पंचातले महात्मा गांधी हा प्रवास जगाला थरारून सोडणार आहे.  स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज पर्यंत गांधीजींची बदनामी करणाऱ्या लोकांचा लेखकाने समाचार घेतला आहे. पुस्तक वाचायला सुरवात करण्याआधी पुस्तक वाचकाला आकर्षित करते ते त्याच्या प्रस्तावनेमुळे. लेखकाने सुरवातीलाच म्हंटले आहे की"स्वातंत्र्य रेड़ीमेड पदरात पडलेल्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे." आणि हे खरे आहे;माझ्यासारखे जे स्वातंत्र्य रेडीमेड घेऊन जन्माला आले त्यांना क्रांती,चळवळ,आंदोलन आणि वेळ प्रसंगी लाठ्यासुद्धा खाव्या लागतात हे माहिती नसेल. पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक हे पुस्तक लिहिण्याचे उद्दिष्टं  स्पष्ट करतो.

चित्तपावन ब्राम्हणाच्या हातून ब्रिटिशांनी सत्ता मिळविली तर ती सत्ता चित्तपावन ब्राह्मणांनीच परत मिळवली पाहिजे व भोगली पाहिजे. गांधीपूर्वीच्या भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्याची परिस्थिती अशी होती. गांधी काही पहिल्यापासून थोरपुरुष म्हणून जन्माला आले नव्हते. एक सामान्य व्यक्ती, बॅरिस्टर होऊन भारतात परतलेला,वकिलीतील पडेल ते काम करणारे, उदा. मसुदा लेखनाचे काम. पण मोहनदास करमचंद गांधींचे महात्मा गांधी झाले ते १९१५ साली दक्षिण आफ्रिकेतून परत आले तेव्हा. स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्यामध्ये उडी घेत गांधींनी स्वातंत्र्याची व्याख्याच बदलली. स्वातंत्र्य कशासाठी व कोणासाठी तर या देशातल्या शेवटच्या माणसासाठी,शेतकऱ्यांसाठी,कष्टकऱ्यांसाठी व त्यांच्या सुखासाठी. ही त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या. आता त्यांची ही व्याख्या काही लोकांना पटली नाही आणि ते काही लोक म्हणजे कोण हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

गांधी मुस्लिमधार्जिणे होते,सुभाषचंद्र बोस आणि गांधी हाडवैरी होते या आणि मजबुरी का नाम महात्मा गांधी, गांधींची बकरी काजू आणि बदाम खातेटकल्या, भेकड या आणि अशा किती तरी वाक्यांनी आणि गोष्टींनी गांधींची बदनामी केली गेली अशा सर्वगोष्टींचा लेखक चंद्रकांत वानखडे यांनी समाचार घेतला आहे आणि ज्या ज्या सत्य गोष्टी आजपर्यंत लोकांसमोर आणल्या गेल्या नाही त्या सर्व उदाहरादाखल लोकांसमोर मांडल्या आहेत.

या पुस्तकाबद्दल लिहू तेवढं कमी आहे,कारण गांधी नावाचं विश्व वढं मोठं आहे की ते कितीही भरून घ्यावं म्हंटलं तरी कमीच पडणार. महात्मा गांधी कोण्या एका जातीचे झालेच नाहीत ते फक्त सामान्य लोकांचे झाले. कारण त्यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या स्पष्ट होती;  लेखक एका प्रश्नाने कायम अस्वस्थ होतो,गांधींची हत्या १९४८ मध्ये झाली.  हत्येच्या मागची कारणे फाळणी आणि इतर दिली गेली पण १९३४ च्या दरम्यान पुण्यात त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. तेव्हाच गांधी हत्या झाली असती तर...? त्या लोकांनी गांधी हत्येची काय कारणे दिली असती ?

 गांधींचा द्वेष करणाऱ्यांनी जर नि:पक्षपातीपणे गांधींची विचारसरणी समजून घेतली असती तर स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान किती महत्वाचे आहे हे समजले असते आणि गांधींनी शिकवलेली सुंदर जीवनमूल्ये त्यांना आत्मसात करता आली असती.

पुस्तकाचे प्रकाशन 'मनोविकास प्रकाशन' यांनी केले आहे.पुस्तकाचे मुखपृष्ठ गिरीश सहस्रबुद्धे यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे आणि प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक,लेखक चंद्रकांत वानखडे लिखित गांधी का मरत नाही ?  

 


श्रीजीवन तोंदले


Sunday, July 12, 2020

विस्थापितांच्या जगण्यामरण्याचं रिंगाण




रिंगाण

                    

                            लेखक - कृष्णात खोत

 

 

विकास. विकास होणं म्हणजे नेम काय ? म्हणजे तुमची विकासाची व्याख्या काय आहे ? कधी करून बघितली आहे तुम्ही ? आधीच्या काळी मानवाला अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गोष्टी मिळाल्या म्हणजे झाला विकास असं होतं. पण कालानुरूप वातावरणामध्ये, निसर्गामध्ये जसे बदल होत गेले त्यापेक्षा जास्त माणसाच्या गरजांमध्ये झपाट्याने बदल होत गेले. अन्न,वस्त्र,निवारा या गोष्टींच्या पुढे जाऊन माणसाच्या गरजा वाढत गेल्या. आत्ताच्या काळामध्ये अन्न,वस्त्र,निवारा यांच्या पुढे जाऊन माणसाच्या गरजा वाढल्या त्या म्हणजे वीज,पाणी,इंधन,मोबाईल,इंटरनेट,wifi ह्या आणि अजून किती तरी. बर या गोष्टी आपल्याला मिळाल्या म्हणजे झाला आपला विकास हो ना.....? पण कधी आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं आहे का, की विकास हा कोणाच्या तरी छाताडावर पाय देऊनच झालेला असतो..?

आपण गाव-शहरात  राहणारी माणसं वर नमूद केलेल्या गोष्टी या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या मिळाल्या की झाला आपला विकास असं समजत असतो. आपल्या मोबाईलचं चार्जिंग उतरू नये, आपल इंटरनेट बंद पडू नये म्हणून आपल्याला वीज हवी आहे  आणि ती पण  without load shedding, आपली शेती सतत फुलत राहावी म्हणून आपल्याला पाणी हवं ते पण मुबलक. लोकसंख्या वाढली त्यासोबत माणसाला राहण्यासाठी घर हवे ते पण मस्त आणि टुमदार, त्यासाठी आपण आपल्या अवतीभोवतीच्या जमिनीवर ताबा घेतला, पण या पुढे जाऊन, आपली भूक भागली नाही म्हणून आपण आपला मोर्चा जंगलांकडे वळवला. डोंगर-कपाऱ्या,दऱ्या-खोऱ्यात,जंगलांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांना आपण सोडलं नाही त्यांच्या घरात आपण घुसलो, त्या जंगली प्राण्यांसोबत,निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या माणसांनापण आपण सोडलं नाही. आपल्या विकासासाठी त्यांच्यासुद्धा छाताडावर पाय दिला आणि त्यांच्या आयुष्याची कायमची होरपळ केली. विकासासाठी धरण बांधले आणि या लोकांना आपण त्यांच्या हक्काच्या घरातून पळवून लावलं....आपल्या विकासासाठी ज्यांच्या आयुष्याची ससेहोलपट आपण केली ती माणसे आज कुठे आहेत याचा शोध घेतला आपण...?त्यांचं दुःख जाणून घेतलं आपण....?

 नमस्कार मंडळी, आज जे पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे, ते वाचल्यावर एखाद्याला आपलं गाव आणि त्याच्या भोवतालचा परिसर किती महत्वाचा आहे हे समजेल. त्यासोबतच पाण्याच्या एका थेंबाचे महत्वसुद्धा समजेल. आपल्याला मिळालेल्या पाण्यामध्ये,विजेमध्ये किती लोकांचे जीव,आयुष्य होरपळलेले आहेत याची जाणीव होईल. मी बोलत आहे लेखक कृष्णात खोत लिखित 'रिंगाण' या पुस्तकाविषयी. विकासाच्या नावावर उभारलेल्या धरणापायी जे धरणग्रस्त बांधव कायमचे विस्थापित झाले, त्या विस्थापितांच्या आयुष्यावर पुस्तकाची कथा आहे. पुस्तकामध्ये या विस्थापितांच्या पदरी आलेलं दुःख लेखक कृष्णात खोत यांनी अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडले आहे. सरकारने पुनर्वसनाच्या नावाखाली या लोकांना त्यांच्या लोकांपासून वेगळं करून, जणू त्यांचे तुकडे केले आणि वेगवेगळ्या गावामध्ये फेकून दिले. या विस्थापित लोकांना त्या गावातील लोकांनी कधीच आपलं म्हंटल नाही, त्यांना नेहमी उचले म्हणून हिणवलं, तर कधी त्यांच्या पोरी-बाळींवर वाईट नजर ठेवली,वढंच काय तर त्यांचं मेलेलं मढसुद्धा त्यांच्या स्मशानामध्ये जाळू दिलं नाही. या आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या विस्थापितांच्या वाट्याला आल्या त्यासर्व गोष्टी लेखकाने पुस्तकामध्ये मांडल्या आहेत. जे वाचून प्रत्येक ओळीवर,प्रत्येक पानावर वाचकाचे मन अक्षरशः हळहळते. १६३ पानाच्या या पुस्तकाच्या कथेचा नायक देवप्पा. हा पण एक विस्थापितच पण सरकारने जेव्हा गाव सोडायला भाग पडले तेव्हा गाव सोडते वेळी त्याने त्याची म्हैस (मुदिवाली) बिनकामाची म्हणून तिथेच सोडून दिली. त्या म्हशीच्या आठवणीने तो तिला परत आणण्यासाठी त्याच्या गावी जातो. म्हशीच्या शोधात देवप्पा आपल्या गावी,त्या जंगलात पोहचतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देतो. त्याच्या त्यासर्व आठवणी,त्याच्या गावाचा परिसर, ते जंगल, तिथल्या निसर्गाच्या, प्राण्यांच्या गोष्टी लेखक कृष्णात खोत यांनी खूप छान प्रकारे मांडल्या आहेत. ज्यामुळे वाचक पुस्तकाकडे आकर्षित होतो. पुस्तकाची भाषा ग्रामीण आहे. या ग्रामीण स्पर्शामुळे लेखकाचे त्याच्या मातीशी किती घट्ट नातं आहे हे समजून येते. आपली सोडून दिलेली म्हैस परत आणायला गेलेला देवप्पा, म्हैस पकडण्याच्या नादात एका वेगळ्याच प्रकाराला सामोरा जातो. आणि तो प्रकार वाचल्यावर मनाला अत्यंत वेदना होतात. हे पूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.

पुस्तकाचे प्रकाशन 'शब्द पब्लिकेशन' यांनी केले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असणारी म्हैस वाचकाचे लक्ष वेधून घेते. असे हे मुखपृष्ठ सरदार जाधव यांनी साकारले आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे आणि प्रत्येक वाचकाने वाचावे असेहे पुस्तक लेखक कृष्णात खोत लिखित 'रिंगाण'.

 

 

श्रीजीवन तोंदले