Sunday, March 31, 2024

अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचे डोळे खाड्कन उघडणारे पुस्तक

 



संभ्रम

                                                   लेखक - अनिल अवचट

 

 

असं म्हणता कि "जिथं विज्ञान संपत तिथून अध्यात्म सुरु होतं..... " पण हेच अध्यात्म जास्त झालं तर त्याचं रूपांतर व्यसनात होतं. या अध्यात्माच्या वल्गना करत, त्याचे महत्व अति रंजकपणे मांडून काही लोकं मोठी होतात. लोकांना उपदेश करू लागतात. आपला भारत देश हा व्यक्ती पूजक देश आहे. एखाद्या व्यक्तीला इथे डोक्यावर घ्यायचं म्हंटलं कि समाजातील प्रत्येक स्थरातील लोक एकत्र येतात, त्याच्या नावाच्या अति रंजक कथा रचून त्या व्यक्तीच व्यक्ती महत्व वाढवतात. मग त्या व्यक्तीला देवपण जरी मिळालं तरी चालेल. एक वेळ देव कमी पडतील पण या व्यक्तीचे महात्मे खूप दूरवर पोहचते. ते साधेसुदे मनुष्य न राहता ते गुरु म्हणून प्रसिद्धीला येतात. मग त्या गुरूंचे पुढे काय काय होते हे जास्त खोलात जाऊन सांगायची गरज नाही..... याच विषयावर थोडं पुढं जाऊन लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम हे पुस्तक करत. मंडळी मी बोलत आहे, पत्रकार,लेखक अनिल अवचट लिखित 'संभ्रम' या पुस्तकाबद्धल.

१६८ पानांचे, समाजाचे डोळे खाड्कन उघडणाऱ्या या पुस्तकामध्ये एकूण १२ लेख आहेत. हे सर्व लेख बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या आपल्या भारतीय समाजाला लागलेल्या रोगा विषयी भाष्य करतात. यासर्व १२ लेखांची मांडणी तीन प्रकरणांमध्ये केली आहे. ज्यामुळे या पुस्तकाचा संपूर्ण विषय आणि त्याचे विशलेषण सोप्या पद्धतीने होते .

प्रकरण क्र. १ अंधश्रद्धेचे गुरु. या प्रकरणामध्ये एकूण ४ लेख आहेत. ज्यामध्ये रजनीश, न्यायरत्न विनोद, सदानंद महाराज या बाबा लोकांचे त्यांच्या भक्तांवर असणाऱ्या प्रभावावर भाष्य केले आहे. या प्रकरणांच्या माध्यमातून लेखकाने या बाबा लोकांच्या रोजच्या भरणाऱ्या दरबाराविषयी, त्यांच्या उच्च राहणीमाना विषयी, ते अचानक कसे प्रकटले हे त्यांच्या भक्तांद्वारे रचलेल्या भाकड कथांविषयी आणि तिथे चालणाऱ्या गोष्टींविषयी भाष्य केले आहे. या प्रकरणाचे विश्लेषण करतेवेळी मला नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या How to become a Cult Leader या डॉक्युमेंटरी सिरीज ची आठवण येते. या  Cult Leader म्हणजेच हे बाबा, गुरु, स्वामीजी वगैरे वगैरे.... या leaders च्या प्रभावाखाली त्याचे अनुयायी इतके वाहत जातात की त्याच्या आज्ञेचे अनुपालन करण्यासाठी ते काहीही करू शकतात. त्या बदल्यात या अनुयायी मंडळींना स्वर्गप्राप्ती, मोक्ष या सारखे बक्षिसे हे बाबा लोक देतात. पण लोकांनी आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर केला तर ते या बाबा लोकांपासून दूर राहून आपले सुखी आयुष्य जास्त सुखकरपणे जगू शकतात.

प्रकरण क्र. २ अंधश्रद्धांचे केंद्र. या प्रकरणामध्ये एकूण ५ लेख आहेत. काळूबाईची जत्रा,समर्थांच्या पादुका,साईबाबांची शिर्डी,मीरा दातारचा दर्गा, वारकऱ्यांचे अधिवेशन. या लेखांच्या माध्यमातून लेखकाने या ठिकाणच्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर भाष्य केले आहे. अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असतात, मग ते व्यक्ती असोत वा  एखादे स्थळ. लोकांचा एक गोड गैरसमज असतो कि त्याच ठराविक ठिकाणी जाऊन देवाची पूजा केली तर देव प्रसन्न होतो. मग तो देव उंच शिखरावर असू व समुद्राच्या तळाशी. पण याठिकाणी होणारे कारभार आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले तर आपल्याला लगेच समजून येईल की देव देवळात नसून तो माणसात आहे. अंधश्रद्धांच्या या प्रत्येक केंद्रावर होणाऱ्या प्रत्येक घडामोडींचे विश्लेषण लेखकाने या प्रकरणाच्या माध्यमातून केले आहे.

प्रकरण क्र. ३ अंधश्रद्धांचे बळी. या प्रकरणामध्ये एकूण ३ लेख आहेत. पुष्पमालेची दीक्षा, देवदासी एक, देवदासी दोन. आपल्या समाज्याच्या प्रत्येक स्थरावर, प्रत्येक जातीमध्ये आपल्याला अंधश्रद्धांचे बळी सापडतात. शिकलीसवरली लोकं सुद्धा याचे बळी ठरले आहेत. जैन सामाज्यामध्ये अल्पवयीन मुलींना संन्यासीदीक्षा दिली जाते. डोक्यात जट निघाली, कुटुंबावर वाईट वेळ आली, काही तरी अनिष्ट झाले तर त्याचे प्रायश्चित म्हणून घरातील अल्पवयीन मुलींना यल्लमास सोडले जाते. यासर्व अंधश्रद्धांचे बळी ठरलेल्या गोष्टींचा लेखकाने या प्रकरणातून वेध घेतला आहे.

अंधश्रद्धेमुळे होणारी हानी लक्षात घेता त्यातून शक्य तितक्या लवकर मुक्त होणं गरजेचं आहे. मुक्त होण्यासाठी खुप काही कष्ट लागणार नाहीत. गरज आहे ती फक्त बुद्धी तर्क आणि विवेक वापरून प्रत्येक गोष्टीची सत्यासत्यता आणि विश्वासार्हता तपासून बघण्याची. प्रत्येक घटनेची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा करुन बघितल्यास त्यामागील विज्ञान आणि कार्यकारणभाव समजून घेता येतो. वर्षा होणे किंवा वीज कडाडणे ह्यामागील वैज्ञानिक कारण जोपर्यंत ज्ञात नव्हतं तोवर त्यामागे कुणीतरी देवी देवता आहेत अशी लोकांची समजूत होती. परंतु आता विज्ञानाने पाऊस पडणे, विजांचा कडकडाट होणे, भूकंप ज्वालामुखी, वादळ इत्यादी नैसर्गिक घटनांमागे काय विज्ञान आहे हे शोधून काढलं. तेव्हापासून सर्वसाधारण माणसांनाही ते विज्ञान कळायला लागलं. सत्य कळताच गैरसमजूती आपसूकच गळून पडतात. देवीचा कोप म्हणून समजले जाणाऱ्या काही आजारांची काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या मनावर जबरदस्त दहशत होती. पण विज्ञानाने त्या आजारांची कारणे शोधून काढलीत. उपचार शोधून काढलेत. आणि त्या आजारांचं निर्मूलन करण्यासाठी लस तयार केली तेव्हापासून ते आजार समूळ नष्ट झालेत. त्यामुळे आता आपल्याला त्या आजारांची भीतीही वाटत नाही. त्याप्रमाणेच आपण जर प्रत्येक घटनेची विज्ञान आणि विवेकाच्या कसोटीवर तपासणी करु शकलो तर प्रत्येक अंधश्रद्धेतून आणि भयातून मुक्त होणं शक्य होईल.

पुस्तकाच्या प्रकाशन केले आहे, मॅजेस्टिक पब्लिकेशन हाऊस यांनी. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकातील चित्रे सुभाष अवचट यांनी केली आहेत.या पुस्तकाविषयी बोलण्यासारखे खूप आहे. पण सध्याचे वातावरण बघता, कधी कोणाची, कोणत्या गोष्टी मुळे भावना दुखावली जाईल हे सांगता येत नाही. ज्याने अंधश्रद्धेच्या गर्देत अडकलेल्या लोकांचे डोळे उघडतील. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे आणि प्रत्येक वाचकाने, प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, अनिल अवचट लिखित

संभ्रम !

Sunday, March 17, 2024

रोजच्या आयुष्यात वीज खेळवणारा वैज्ञानिक

 



निकोला टेस्ला

(रोजच्या आयुष्यात वीज खेळवणारा वैज्ञानिक)

 

                                      लेखक - सुधीर फाकटकर.

 

माणसाच्या दैनंदिन जीवनात पूर्वी तीन मूलभूत गरजा होत्या. अन्न, वस्त्र आणि निवारा. माणूस जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत गेला तसे त्याच्या गरजांमध्येही वाढ आणि बदल होत गेला; पण अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांमध्ये चौथी गरज वाढली आणि ती गरज खूपच महत्वाची झाली. ती गरज म्हणजे वीज. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विजेची इतकी सवय झाली आहे; की वीजेशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करताच येत नाही. वीज ही मानवाच्या वापरा मध्ये सहज सुलभ व्हावी म्हणून खूप शास्त्रज्ञांनी त्यामध्ये संशोधन केले. या विद्युत शक्तीचे दोन प्रकार पडतात ते म्हणजे ए.सी आणि डी.सी. घरगुती वापरासाठी, व्यावसायिक वापरासाठी जास्त करून ए.सी विद्युत शक्तीचा जास्त प्रमाणात वापर होतो. वाचक हो घाबरू नका मी काही इथे ती विद्युत शक्ती कशी निर्माण होते हे सांगणार नाही आहे. तर या ए.सी विद्युत शक्ती आणि विद्युत चुंबकीय लहरी यामध्ये होणारे बदल या विषयांमध्ये सखोल संशोधन करून तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या थोर वैज्ञानिक निकोला टेस्ला यांच्या बद्दल मी बोलत आहे. जी.एम.आर.टी खोदड वेधशाळेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून काम करणारे सुधीर फाकटकर लिखित निकोला टेस्ला हे चारित्र्य घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे.

१८६ पानांच्या या पुस्तकाची सुरवात निकोला टेस्ला यांच्या जन्मापासून होते. ऑस्ट्रिया-हंगेरी मधील गॅस्पिक मध्ये निकोला टेस्ला यांचा जन्म झाला. टेस्ला यांच्या जन्माची आगळीवेगळी कहाणी आहे. निकोलाची आई जॉर्जिया ही अशिक्षित होती पण निकोलाला तिच्या कडून व्यहारज्ञानाचे भरपुर शिक्षण मिळाले. वडील मिलुटीन चर्चमध्ये धर्मगुरूची नोकरी करायचे. निकोलावर लहानपणा पासून त्याच्या आईचा जास्त प्रभाव दिसून येतो. लहानपणा पासून हुशार असणारा निकोला शिक्षणात सुद्धा तितकाच हुशार होता. सुरवाती पासूनच हुशार असणाऱ्या निकोलला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात विशेष आवड होती. उच्च शिक्षणासाठी त्याने इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग मधून शिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील मिलुटीन यांच्याकडे वेगळाच हट्ट धरला. त्याचा तो हट्ट पूर्णही झाला. उच्च शिक्षण घेते वेळी हुशार असणाऱ्या निकोलाला अपयशाला तोंड द्यावे लागले. त्याची गाडी भरकटली ती पुन्हा परत मार्गावर यायला वेळ लागला पण या सर्वात त्याला आपल्या प्रिय व्यक्तीला गमवावे लागले. पुन्हा सापडलेल्या मार्गावर चालताना निकोला यांना खूप संघर्ष करावा लागला आणि याच संघर्षातून त्यांनी निर्माण केला यशाचा महामार्ग. रोजच्या आयुष्यात वीज खेळणाऱ्या या वैज्ञानिकाने संपूर्ण जग उजळून टाकण्यासाठी खूप मोठे योगदान दिले.

या सगळ्याची सुरवात न्यूयॉर्क मधून झाली.थोर संशोधक एडिसन यांच्या कंपनीत निकोला विद्युत अभियंता म्हणून काम करत होता. एडिसन यांनी निकोलासोबत एक वेगळीच चेष्टा केली. स्वाभिमानी असणारे निकोला यांनी एडिसन यांची कंपनी सोडली. ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. पुढे घडणाऱ्या प्रचंड मोठ्या इतिहासाची ती सुरवात होती. राखेतून पुन्हा भरारी घेणाऱ्या निकोला यांनी यशाचे उंच उंच शिखर पार केले. त्यांचा हा जीवनपट लेखकाने सुंदर पद्धतीने या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे.

लेखकाने फक्त निकोला यांचे चरित्र या पुस्तकामध्ये मांडले नसून, विद्युत शक्तीचा आरंभ, त्याचा इतिहास, चुंबकीय शक्ती या सर्व गोष्टींची माहिती लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून दिली आहे ज्यामुळे निकोला टेस्ला यांच्या कार्याची सखोल माहिती आपल्याला मिळते. माझे शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग मधून झाले असल्यामुळे मला हे पुस्तक विशेष भावले. ज्या गोष्टींचा मी विद्यार्थी दशेत अभ्यास केला होता त्यासर्वांची या पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा उजळणी झाली.

या पुस्तकाविषयी खूप बोलण्यासारखे आहे पण इथे मी थांबतो. सरतेशेवटी मी एवढच सांगेन की संपूर्ण जग उजळू टाकणारे निकोला टेस्ला ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य संशोधनासाठी झोकून दिले ते आम्हा सर्व अभियंत्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे राजहंस प्रकाशन यांनी. प्रत्येक अभियंत्याने, प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक. अभियंते सुधीर फाकटकर लिखित.....

निकोला टेस्ला

रोजच्या आयुष्यात वीज खेळवणारा वैज्ञानिक