रंगमंचकला
लेखक - स्तानिस्लावस्की
मराठी अनुवाद - ओंकार गोवर्धन.
कोंस्टेंटिन स्तानिस्लावस्की यांचे मूळ
नाव Alexeyev. अतिशय श्रीमंत घरातील त्यांचा जन्म.
त्यांचे वडील मोठे उद्योगपती होते. Alexeyev चे बालपण अतिशय सुखात गेले. सुरुवाती पासूनच त्यांना कलेची जास्त ओढ
होती. हे पाहता १८७७ आणि १८८१ मध्ये त्यांचा वडलांनी त्यांना थिएटर बांधून दिले.
नट आणि दिग्दर्शक म्हणून स्तानिस्लावस्की यांची सुरुवात याच रंगमंचावर झाली. पुढे
व्यावसायिक नट बनून काम करणे हे त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक दर्जाला तडा देणारे
होतं, म्हणून आपल्या घरच्यांपासून
लपवून त्यांनी स्वतःचे कोंस्टेंटिन स्तानिस्लावस्की हे नाव लावले, १८८४ साली कोंस्टेंटिन स्तानिस्लावस्की
हे त्यांचे रंगमंचीय नाव झाले. जगभरातल्या प्रत्येक रंगकर्मींसाठी स्तानिस्लावस्की
हे एक आदरणीय नाव. अभिनयाविषयीचे मूलभूत कार्यपद्धतीचे चिंतन त्यांनी केले. त्या
पद्धती त्यांनी अभिनयव्यहारात लागू केल्या. स्तानिस्लावस्की यांच्यावर पात्र जगणं
या गोष्टीचा मोठा प्रभाव होता. पात्र जगणं या क्षमतेला आजमावण्यासाठी ते कधी कधी
वेगवेळ्या पात्रांचा वेश करून वावरत असत. रंगमंचीय क्षेत्रात स्तानिस्लावस्की
यांनी अनेक सिद्धांत मांडले. त्यासोबत काही नीतिनियमांचा स्तानिस्लाव्हाकी यांनी नाट्य व्यवहारात कायमच पाठपुरावा केला.
स्तानिस्लावस्की म्हणतात अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून
स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय. रंगमंचावरील सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम यांविषयी केलेले
मार्गदर्शन म्हणजे रंगमंचकला.
नमस्कार मंडळी, मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे, स्तानिस्लावस्की यांनी शब्दध केलले रंगमंचकला (The Art Of The Stage) हे पुस्तक. या पुस्तकाचा सुंदर मराठी अनुवाद केला आहे अभिनेते ओंकार
गोवर्धन यांनी. हे पुस्तक नाट्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे
आहे. १९५ पानांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून
स्तानिस्लावस्की आपल्याला नाट्यव्यवहारातील नीतिनियमांविषयी सांगतात.सुमारे
३१ प्रकरणांच्या माध्यमातून प्रत्येक
कलाकाराने नाट्य क्षेत्रामध्ये आपली वर्तवणूक कशी ठेवली पाहिजे हे साध्या आणि
सोप्या शब्दात सांगतात. स्टुडिओ १,२,३ या प्रकरणांमधून (स्टुडिओ म्हणजे नट
जेथे नाटकाची रोज तालीम करतो, नटांना जिथे प्रशिक्षित केले जाते ती जागा) स्टुडिओ मध्ये कशा
प्रकारचे वातावरण असावे आणि नको असलेल्या पद्धतीचा व्यवहार नटाने आणि शिक्षकाने
कसा टाळावा यावर सुद्धा ते भाष्य करतात.नटाने रंगमंचावर वावरतेवेळी एकाग्रता, हावभाव, संवाद यावर कसे काम करावे या आणि अशा कितीतरी पद्धती ज्या नटांसाठी
उपयुक्त आहेत त्यासर्वांची माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते.
स्वतः नाट्यक्षेत्रामध्ये काम करते वेळी मला या पुस्तकाचा आणि यामधील
प्रत्येक गोष्टींचा खूप फायदा झाला. स्तानिस्लावस्की यांनी नटाचा व्यवहार त्याचे आचरण, नाट्यगृह बाहेर त्याने कसे वागले
पाहिजे यासंदर्भात सुद्धा ते काही घटनांचे संधर्भ देऊन सांगतात. प्रयोगाच्या आधी
नटाने स्वतःची तयारी कशी करावे हे सांगते वेळी त्यांनी काही प्रसिद्ध नटांचे
उदाहरण सुद्धा दिले आहे, ज्याचा उपयोग प्रत्येक कलाकाराला होईल
यात शंका नाही. स्तानिस्लावस्कीची ही अजरामर मार्गदर्शनदीपिका अभिनेते ओंकार
गोवर्धन यांनी मराठीमध्ये आणली त्याबद्दल त्यांचे खूप खूप
कौतुक आणि आभार.पुस्तकाच्या
मनोगतामध्ये ते सांगतात की त्यांच्या
कारकिर्दीच्या टप्प्यावर त्यांची स्तानिस्लावस्किनशी ओळख झाली. माझ्या बाबतीत
सुद्धा मी हेच म्हणेन कारण कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला हे पुस्तक मिळाले
ज्यामुळे मला माझा प्रवास सुखद वाटतो.
आता सरतेशेवटी या पुस्तका संदर्भात एक प्रश्न उरतो की या पुस्तकाचा
वाचक वर्ग कोणता ? तर या प्रश्नाचे उत्तर अभिनेता ओंकार
गोवर्धन यांनी त्यांच्या मनोगतामधून दिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन
यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुनीत वडके यांनी केले आहे. प्रत्येक नाट्य
कलाकाराने वाचावे, प्रत्येक कलाकाराच्या संग्रही असावे
आणि प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक रंगमंचकला.