Monday, December 30, 2019

फकिरा               फकिरा

                             लेखकलोकशाहीर अण्णा भाऊ साठेआज एक खास पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. पुस्तक खुपच खास आहे आणि त्याचे लेखक पण खुपच खास आहेत. मराठी साहित्यामधील एक मानाचे पान मानली जाणारी कादंबरी जिला राज्य सरकारने प्रथम पारितोषिक देऊन गौरविले आहे. भोवतेक तुम्ही ओळखलं असेल पण ज्यांनी ओळखलं नाही त्यांच्या साठी सांगतो. मंडळी मी बोलत आहे ती कादंबरी म्हणजे आदरणीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लिहुन अजरामर केलेली कादंबरी म्हणजे फकिरा.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या लेखणीने समाजामध्ये प्रबोधन केले. अण्णा भाऊ साठे यांची शाहिरी कवने आज हि समाजामध्ये प्रबोधनाचे काम करत आहेत. शाहिरांविषयीची एक गोष्ट माझ्या मनाला भावली ती म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे भोगले, जे पाहिलं, ज्या गोष्टी त्यांच्या अजु बाजूला घडल्या, जी माणसं त्यांच्या आयुष्यात आली त्यांच्या वर ओढलेले प्रसंग या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या लिखाणात आणल्या. त्यामुळे त्यांचे लेखन मनाला स्पर्श करून जाते. शाहिरांच्या लेखणीचे वैशिष्ठ म्हणजे घडणाऱ्या घटनेचे आणि त्यामागची परिस्थिती यांचं वर्णन अगदी सध्या भाषेत आणि मार्मिकते ने करतात. कोणतीही गोष्ट जास्त वाढवून नाही तर सोप्या शब्दांनी. शाहीरांचे असे लिखाण वाचले कि न काळत वाचक त्यांच्या लेखणीच्या प्रेमात पडतो. शाहिरांचे असे किती तरी लिखाणे,शाहिरी कवण आहेत जे आज हि वाचले किंवा ऐकले तरी मनामध्ये एक वेगळी स्फुर्ती निर्माण होते. शाहीरांच्या अशाच एक शाहिरीचं नाव इथे मी मुदाम घेतो ती म्हणजे "माझी मैना गावाकडं राहिली". लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लिखाणा विषयी  आणि त्यांच्या विषयी बोलावं तितकं कमीच आहे.

त्यांच्या लिखाणानी समृद्ध झालेली आणि मराठी साहित्य विश्वामध्ये सोनाचे पण ठरलेली कादंबरी म्हणजे फकिरा. कादंबरीची कथा हि स्वतंत्र पुर्व काळातली आहे. अगदी शाहिरांचा नुकताच जन्म झाला होता तेव्हाची. शाहीर जस जसे मोठे होत गेले तेव्हा त्यांनी फकिरा विषयी त्यांच्या घरच्यांकडुन ऐकली होती. ती कथा जेव्हा त्यांनी ऐकली तेव्हा पासुन त्यांचे मन त्यानं गप्प बसु देत नव्हते. हि कथा आपण कागदावर उरवावी असे त्यांना वाटत होते. आणि शेवटी त्यांनी हि कथा कागदावर उतरवली. गरिबांच्या नेत्याला त्यांच्या अवलियाला त्यांनी खरी आदरांजली दिली.
फकिरा हि कादंबरी १४५ पानाची आहे. कथे ची सुरवात गावामधील जत्रेतील मानाच्या जोगणीला पळवण्यावरून होते. फकिराचा बाबा राणोजी आपल्या गावाचं भलं व्हावे, आपल्या गावात दरवर्षी जत्रा भरावी, त्यामुळे गावच्या लोकांना रोजगार मिळेल, गावामध्ये उत्सवाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होईल, म्हणुन जीवावर उदार होऊन शिगावची जोगीण पळवुन आणते वेळी झालेला त्याचा मृत्यु, याचे  वर्णन मनाला स्पर्श करून जाते. आपल्या बापाचा झालेला मृत्यु आणि ज्या शवर्याने तो लढला या सगळ्या गोष्टीचा परिणाम फकीरावर होतो. आपणही आपल्या बापा सारखं गावासाठी काहीतरी करायचं या भावनेने फकिरा वाढत जातो.

आपल्या पतीचा झालेला मृत्यु आणि माघारी आपल्या अंगावर पडलेला संसाराचा गाडा चालवत दोन लहान मुलांना वाढवणारी राधाबाई. राधाबाईचा फकीरावर विशेष जीव. त्या आईच काळीज आपल्या लेकासाठी किती तुटत असत या विषयी वाचते वेळी आई मुलाचं नातं काही वेगळंच असत याची जाणीव होते. शाहिरांनी आपल्या लेखणीतुन या आई मुलाच्या नात्याला कादंबरीमध्ये एक हळुवार स्पर्श दिला आहे आणि तो मनाला स्पर्श करतो. हि कथा एकट्या फकीराची नाही तर दौलती,राहीबाई,साधु,पिरा, सावळा, बळी,घामांडी,हरी खंडू, भिवा ह्या आणि समस्त महार मांग जमातीची हि कथा आहे. स्वतंत्र पूर्वकाळा पासुन महार,मांग जाती वर होणारे अन्याय त्यांचे होणारे हाल, त्यांना मुदामून डावले जाणे,त्यांचे हक्क कडुन घेतले जाणे, त्यांना गाव पासुन आपल्या माणसं पासुन दूरकरणे यासर्व गोष्टी शाहिरांनी अत्यंत मार्मिक पणे लिहिल्या आहेत.

मानाची समजली जाणारी जोगीण ज्यागावात असेल त्या गावाला जत्रा भरवण्याचा हक्क असतो. ती मानाची जोगीण आपल्या बापाने गावासाठी जीवावर उधार होऊन गावाला परत मिळवुन दिली आणि त्यामध्ये त्याने आपला जीव गमावला.आपल्या बापाचे बलिदान आपण वाया जाऊ देणार नाही. याविचारांनी फकिरा आणि सगळा गाव दरवर्षी होणाऱ्या जत्रेमध्ये जोगिणीचे रक्षण करतात. पुढे काही अशा गोष्टी घडतात आणि फकिराचे आणि समस्त महार,मांग जातीचे आयुष्य बदलुन जाते. आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी फकिरा आपल्या साथीदारांसोबत धनदांडग्यांना लुटून आपल्या गोरगरीब जातील जागवणायचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे हलगी वाजवून लुटालूट करणारी हि वाघांची टोळी असते. कादंबरीमधील प्रत्येक परिस्थितीचे वर्णन वाचुन मन हरखुन जाते. कादंबरीमध्ये अशी काही वाक्य आहेत जी वाचते वेळी वेगळीच मज्या येत. उदा. चांदणं दुधासारखं वर्षत होत, अशा प्रकारची किती तरी वाक्य कादंबरी मध्ये आहेत ज्याने शाहिरांच्या लेखणीची ताकद कळुन येत. वाचक त्यांच्या लेखणीच्या प्रेमात पडतो.

कादंबरीची भाषा आमच्या पश्चिम महाराष्ट्राची आहे. त्यामुळे तर कादंबरी आपलीशी वाटते. कादंबरीचे मुखपृष्ठ हे जोशी आर्टस् यांनी केले आहे. कादंबरीचे प्रकाशन गुलाबराव मारुतीराव कारले  सुरेश एजन्सी यांनी केले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावी आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावी अशी कादंबरी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीने अजरामर झालेली कादंबरी फकिरा.- श्रीजीवन तोंदले

Sunday, December 15, 2019

बारोमास

बारोमास

                                लेखक - सदानंद देशमुख


खुप दिवसांनी एक असे पुस्तक वाचले ज्याने विचार करायला भाग पाडले. मला आठवते झाडाझडती हे पुस्तक जेव्हा मी वाचलं होतं तेव्हा त्या पुस्तकाने मला विचार करायला भाग पाडलं होत. आता तसेच एक पुस्तक आज वाचून पुर्ण केलं. या पुस्तकाने तर माझे विचारच बदलुन टाकले. या पुस्तकाची पहिली आवृत्ती २००२ मध्ये प्रकाशित झाली. आज २०१९ साल संपण्याच्या मार्गावरती आहे. तरी हे पुस्तक वाचायला मला खूप उशीर झाला असला तरी पुस्तकांमधील कथेचा विषय हा अजुनही सुरूच आहे आणि तो न संपणारा नाही असेच आहे. मंडळी मी २००४ च्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक सदानंद देशमुख लिखित बारोमास ह्या पुस्तक विषयी बोलत आहे.

 शेतकऱ्याच्या जीवनावर अत्यंत जवळुन प्रकाश टाकणारी हि कादंबरी आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामधील दुःख,त्यांच्या समस्या,त्यांच्या आयुष्यात असणारं थोडं फार सुख. स्वतःच्या पोटाला चिमटे काढुन पोरांच्या पोटाला दोन घास जास्त देऊन त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी आणि आपल्याला या नरकातून बाहेर काढावं. अशी अपेक्षा ठेवणारा शेतकरी. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा डोनेशनच्या अभावी नोकरी न मिळालेली शेतकऱ्यांची मुलं शेवटी शेतीमध्येच येऊन पडतात तर काही दिवसाचा रोजगार मिळावा म्हणुन लग्नाच्या,मुंजीच्या वरातीमध्ये बॅण्ड वाजवत फिरतात. आपलं शिक्षणचं झाला नाही असं स्वतःला समजाऊन नोकरीचा सोड पिच्छा करतात. तर एक बाजुला ज्याच्या कडे डोनेशनचे पैसे आहेत त्यांनी नोकरी मिळवुन शेतीला रामराम ठोकुन शहराची वाट धरली आहे. पेरलं तर उगवत नाही, उगवलं तर ते टिकत नाही आणि टाकलच तर त्याला चांगला भाव मिळत नाही या समसेने शेतकरी आज हि बेजार आहे. त्याच हे दुःख कधीच संपणारं नाही आहे. शेतकऱ्याचा कोणाचं नाही ना निसर्ग,ना सरकार ना आणि कोणी. शेतकरी बिचारा एकटाच त्यांच्या कष्टी आयुष्याचा एकट्याने झगडा देत आहे. आणि अजुनही देत राहील यात काय शंका नाही. वर नमुद केल्या प्रमाणे जरी मला हे पुस्तक वाचायला खूपच उशीर झाला असला तरी शेतकऱ्याच्या समस्या अजुनही त्याच आहेत ज्या २००२ मध्ये किंवा त्याच्या आधी होत्या. अजुनही शेतकऱ्याला कोणाचं वाली नाही ना निसर्ग,ना व्यापारी, ना सरकार. शेतकरी एकटाच.

३६२ पानांची हि कादंबरी.  प्रत्येक पानावर मन हळहळुन टाकणार कथानक. कथेचा नायक एकनाथ आणि त्यांच्या अजुन बाजुची त्याच्या जवळची माणसं आणि त्याच गाव सोनखशी यामध्ये घडणारी कथा लेखकानी अत्यंत सोप्या आणि ग्रामीण भाष्येमध्ये म्हणजेच विदर्भ मराठवाड्याच्या भाष्ये मध्ये मांडली आहे.  शहरांमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये रहाणाऱ्या वाचकाला या कादंबरीची भाषा वाचते वेळी थोडी जाड जाईल, पण आपण जस जसे पुढे वाचत जाऊ तसं ती भाषा वाचकाला आपलंस करून टाकते.

एम.ए.बी.एड चं  शिक्षण घेतलेला एकनाथ तनपुरे प्राध्यापक होण्याचे स्वप्न बघत असतो पण नोकरीच्या ठिकाणी एक लाख रुपयाचं डोनेशन मागितलं जात आणि डोनेशनचे पैसे भरू न शकल्या मुळे आता आयुष्यभर शेतीच करावी लागणार हे त्याला समजत. मुळातच हुशार असणारा एकनाथ आपल्या जवळच्या शेतकी अभ्यासाचा वापर करून घरची शेती फुलवण्याचा अतोनात प्रयत्न करतो पण त्याला कोणाचीच साथ मिळत नाही. ना घरची, ना निसर्गाची, ना सरकारची. एकनाथाचा लहान भाऊ मधु हा पण हुशार १२वी ला विज्ञान विभागातुन उत्तीर्ण झालेला उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी नसलेला. एकनाथ प्रमाणे त्याच्या कडेही नोकरीच्या ठिकाणी पैसे मागितले जातात. नोकरीसाठी पैसे जमवायचे म्हणुन तो गावातील काही तरुणांना सोबत घेऊन, रात्री जमिनी खाली सोने सापडेल म्हणुन रात्रभर एका भोंदू बुवाच्या नादी लागुन जमीन उकरत फिरत रहातो. स्वभावाने मवाळ असलेला मधु पुढे त्याच्याच एका कलागती  मुळे तनपुरे कुटुंबाची वाताहत होते. मुलगा एम.ए.बी.एड आहे, पुढे नोकरी लागेल शहरात येऊन राहील आपली पोरगी सुखात राहील या आशेने अलकाच्या घरच्यांनी तिचा विवाह एकनाथ सोबत लावून देतात. शहरात वाढलेली अलका लग्नानंतर खेडे गावात येते. कुणब्याच्या घरच्या कामाचा रोजचा गाडा ओढुन बिचारी रोज अर्ध मेली होऊन जाते, ती भोगत असलेल्या नरकयातना एकनाथला समजत असतात. नोकरी नाही म्हणुन शेती करावी लागली, शेती मध्ये गती नाही,घरची परिस्थिती सुधारता येत नाही यागोष्टी माहिती असलेला एकनाथ हतबल होऊन अलकाचे होणारे हाल हाताशी पणे बघत रहातो. पुढे त्या दरिद्री घराला आणि नवऱ्याला कंटाळुन आणि मधुने केलेल्या अपमानाने अलका एकनाथला सोडुन जाते आणि त्याला एक नाथ करते. एकनाथांच्या वाट्याला आलेलं दुःख वाचुन मन पिळवटुन जाते.

शेतकऱ्याचे दुःख याच्या समस्या आणि त्याच्या सरकार कडुन नेमक्या काय अपेक्षा आहेत या सर्व गोष्टी लेखकानी अत्यंत अभ्यास पुर्वक मांडल्या आहेत. शेतीमधील बारीक बारीक गोष्टी सुद्धा लेखकानी खुप चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. शेतकऱ्याचे मित्र असणारे त्याचे सोबती बैल,गाय ,म्हशी,कुत्रा,मांजर यासर्वांचे शेतकऱ्याच्या जीवनातील त्यांचं स्थान आणि चंद्री मांजरीच्या ऐंड्री पिऊन झालेला मृत्यू मनाला चटका लाऊन जातो.
या कादंबरी विषयी बोलावं तितकं कमी आहे. आणि लेखक सदानंद देशमुख यांनी कादंबरी ज्या नोट जाऊन थांबवली आहे तिथुन समजत की शेतकऱ्याच्या जीवनाचे भोग हे न संपणारे आहेत. कादंबरी वाचते वेळ मन हळहळुन जाते, नकळत कधी डोळ्यातुन अश्रु गळून पानावर पडले हे समजत नाही.

आजच्या माझ्या पिढीला जी सोशल मीडियावाली आहे तिला नेहमी Adventures, Thrilling करायचं असतं, त्या पिडीला  मला एकच सांगायचं आहे. एकदा शेती करून बघा मग समजेल खरं  Adventures आणि  Thrilling काय असतं. कादंबरीचे  प्रकाशन कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांनी केलं आहे. अत्यंत वाचनीय हि कादंबरी प्रत्येक वाचकाच्या संग्रही असलीच पाहिजेल. जो शेतकऱ्याच्या वेदना समजतो त्याच्या कडे तर हि कादंबरी असलीच पाहिजेल.
लेखक सदानंद देशमुख लिखित बारोमास कादंबरी नक्की वाचा.


श्रीजीवन तोंदले

Sunday, December 1, 2019

४४० चंदनवाडी लेखक - नारायण धारप

४४० चंदनवाडी
                           लेखक - नारायण धारपनमस्कार मित्रहो आज मी तुम्हाला एका रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेल्या कादंबरी विषयी सांगणार आहे. त्यांच्या रहस्यमय आणि गूढ लेखनाने त्यानी वाचकांच्या मनावर वेगळीच भुरळ घातली आहे. आजच्या पिढीला त्यांचं नाव नवीन असले तरी अशा लिखाणानी त्यांनी एक काळ गाजवला होता. मी असं हि ऐकलं आहे कि ज्या काळामध्ये दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चालत नव्हती तेव्हा सामान्य वाचक त्यांच्या लेखनाची आतुरतेने वाट बघायचा. त्याच प्रमाणे मला पूर्ण खात्री आहे कि आजच्या सोसिअल मीडियाच्या पिढीला सुद्धा त्यांच्या रहस्यमय आणि गूढ लिखाणाची ओढ लागेल. रहस्यमय आणि गूढ लेखनाच्या अव्वल स्थानी असणारे आणि वाचकाला त्यांच्या लेखणी द्वारे शेवट पर्यंत खेळवत ठेवणारे  लेखक म्हणजे आदरणीय नारायण धारप (सर).

नारायण धारप(सर) यांच्या अशाच रहस्यमय आणि गूढ कादंबरी मधील एक कादंबरी मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. ती म्हणजे  ४४० चंदनवाडी. मनाला आदिम उत्कंठा लावणारी अशी ही कादंबरी १९८ पानांची आहे. नारायण धारप याच्या कादंबरीची सुरवात हि  नेहमी वाचकांना आकर्षित करते.कारण सुरवातीलाच संकटाची किंवा त्या भयाण गुढ शक्तीची थोडीशी ओळख करून दिली जाते, त्यामुळे वाचक सुरवाती पासुनच कादंबरीशी बांधला जातो. कादंबरीची सुरुवात सुद्धा अशीच आहे. सदावर्ते कुटुंबीयांनी विकत घेतलेल्या ४४० चंदनवाडी ह्या बंगल्यात ते रहायला आल्या पासुन त्यांच्या लहान मुलीला म्हणजेच सुनीताला विचित्र आणि भयानक स्वप्न पडू लागतात. सदावर्ते सुनीताला डॉ.गौतम देशमाने यांच्या कडे घेऊन जातात. मानसोपचार  तंज्ञ असणारे डॉ. गौतम यांना पहिल्याच भेटीमध्ये सुनीता सोबत काहीतरी विचित्र घडत आहे याची उखल होते. त्याप्रमाणे ते सदावर्ते यांना काही दिवसांसाठी त्या बंगल्या पासुन दुर रहाण्याचा सल्ला देतात. खुद्द सदावर्ते आणि डॉ. गौतम यांना सुद्धा त्या बंगल्यामधील स्वयंपाक घराच्या तळ घरातील त्या भयानक आणि गुढ शक्तीचा अनुभव येतो. आणि इथुन कथेला सुरवात होते.

दोन स्वभावाची माणसं  समाजामध्ये  असतात, एक ते जे चाललं  आहे ते चालु देणारी, गोष्टींकडे दुर्लक्ष करणारी आणि दुसरी म्हणजे ती माणसं  जी जे  ते चाललं आहे त्याचा सामना करणारी गोष्टींच्या तळा पर्यंत जाणारी. डॉ.गौतम हे त्या दोन नंबरच्या स्वभावातील व्यक्ती. ४४० चंदनवाडी बंगल्यामधील स्वयंपाक घराच्या तळ घरातील  असणाऱ्या त्या भयानक शक्तीचं मुळ काय आणि अशी कोणती घटना भुतकाळामध्ये घडली ज्याने ती शक्ती तेथे उदयास आली.  अशा पद्धतीने गौतमचा शोध सुरु होतो आणि कादंबरी वाचकाच्या नकळत त्याला तिच्या मुठी मध्ये घेत.

१९३२ मध्ये इनामदार यांनी त्याजागी बांगला बांधला आणि तिथुन थेट २००३ पर्यंत चार ते पाच वर्षाच्या अंतराने तो बांगला तब्बल १५ ते १६ वेळा विकला आणि खरेदी केला गेला.  प्रत्येक मालकाला ती वास्तु फारशी लाभदायी ठरली नाही. गौतम त्या प्रत्येक मालकांना भेटतो त्यांना आलेले  त्या वास्तु मधील अनुभव जाणुन घेतो. गौतमने घेतलेला हा शोध कादंबरीचा मुळ गाभा आहे आणि प्रत्येकाने जरूर वाचावा असा आहे. त्यातुनच गौतमला त्या भयाण आणि गुढ शक्तीची तीव्रता, ताकद समजते. लेखक नारायण धारप यांच्या प्रत्येक कादंबरीचे वैशिष्ठ म्हणजे प्रत्येक कथेमध्ये  असणाऱ्या त्या भयानक आणि गुढ शक्तीचे वर्णन हे  वेगवेगळे असते. त्या शक्तीचे वर्णन वाचते वेळी किंवा कथेमध्ये त्या भयानक शक्तीचे आगमन होणार क्षण वाचतेवेळी अंगावर काटा येतो. अशा प्रकारे लेखक नारायण धारप हे वाचकाला त्यांच्या लेखनात गुंतुन ठेवतात. आणि प्रत्येक क्षणाला पुढे काय होणार अशी उत्सुकता लागुन रहाते. पुढे कथेमध्ये कल्हार नावाचा मांत्रिक आणि वज्रे नावाचे गुरुजी कथेमध्ये येतात. यादोघांना प्राप्त झालेल्या शक्तीचा इतिहास लेखकाने उत्तम प्रकारे मांडला आहे.  डॉ.गौतम आपल्या प्रघालंब बुद्धीच्या जोरावर आणि कल्हार आणि वज्रे गुरुजी यांच्या मदतीने म्हणजेच मानसशक्तीचा,तंत्रशक्तीचा आणि मंत्रशक्तीचा वापरकरून त्या भयानक आणि गुढ शक्तीवर विजय मिळवतो. या विजयासाठी त्याने केलेली मेहनत वाचनीय आहे. आधीच म्हंटल्या प्रमाणे लेखक वाचकाला शेवट पर्यंत त्यांच्या लेखणी द्वारे अक्षरशः धरून ठेवतो.

या कादंबरी मधुन आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने समजुन येते ती म्हणजे माणसाच्या प्रघाल्भ बुध्दिमतये  पुढे आणि आदिम इच्छा शक्ती समोर कोणत्याही असत्य, क्रुर शक्तीचा पराभव होतोच होतो. कादंबरीचे प्रकाशन साकेत प्रकाशन यांनी केले आहे. कादंबरी शेवट पर्यंत वाचकाला धरून ठेवते. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायला हवेच. भय,गुढ,रोमहर्षक या विषयी वाचण्याची आवड ठेवणाऱ्यांसाठी. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावी अशी हि कादंबरी लेखन नारायण धारप लिखित ४४० चंदनवाडी.

-        
         
          श्रीजीवन तोंदले