ॲट
एनी कॉस्ट
लेखक - अभिराम भडकमकर
स्पर्धा
ही प्रत्येक ठिकाणी असते, मग ती जंगलात असो वा
सध्याच्या या सिमेंटच्या जंगलात! या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला
धावावंच लागतं. कधी यश मिळवण्यासाठी, तर कधी स्वतःचं
अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी. पण जंगल कोणतंही असो, तुम्ही
बेसावध असला तर घात लावून बसलेला शत्रू तुमच्यावर कधी झडप घालील, हे सांगता येत नाही. आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी सावध
राहूनच पुढची वाटचाल करावी लागते. यशाच्या शिखरावर असणाऱ्यांना तर यश मिळवून देखील
शांत बसवत नाही. कारण त्यांच्यासाठी ते यश टिकवून ठेवणे हे महतत्त्वाचे असते.
त्यांना यश हे 'ॲट एनी कॉस्ट' हवं
असतं. स्पर्धेच्या या खेळाची गोष्ट सांगणारे पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो
आहे.लेखक अभिराम भडकमकर लिखित 'ॲट एनी कॉस्ट'!
३७३
पानांच्या या पुस्तकाच्या कथेचा नायक विकास याच्या अवतीभवती पुस्तकाची कथा फिरते. विकास
हा छोट्या पडद्यावरील; म्हणजेच टीव्ही मालिकांचा
प्रसिद्ध निर्माता आहे. त्याच्या चांगल्या चाललेल्या मालिकांना चॅनल अचानक थांबवते
आणि दुसरीच एखादी मालिका सुरु केली जाते. अचानक मिळालेल्या या पिछाडीने विकास न
खचता परत उभा राहतो. त्याच्या डोक्यामध्ये आता एक वेगळीच कल्पना जागा घेते आणि
त्याचा वापर करून तो एक नवी मालिका उभी करतो, 'अच्छा तो
हम....' वरवर दिसायला हा एक रिऍलिटी शो वाटतो. पण चॅनलचा
टीआरपीचा खेळ सुरु होतो आणि त्याला एक वेगळाच रंग चढतो. ज्यामध्ये धनंजय; ज्याच्यावर ही मालिका बनवली जाते, तो मात्र यामध्ये
भरकटत जातो. धनंजयला झालेला ब्रेन कॅन्सर, आणि त्याच्या
पुढ्यात राहिलेल्या काही दिवसांच्या आयुष्यावर हा रिऍलिटी शो बेतलेला आहे. धनंजय
ग्रामीण भागातील एक कलाकार आहे. नाटक म्हणजे त्याच्यासाठी सर्व काही विसरायला
लावणारं जग! ज्यामध्ये तो त्याचा आजार सुद्धा विसरत आहे. धनंजयच्या आजाराचे भांडवल
करून विकास आपल्या यशाचा मार्ग शोधातो आहे, तर चॅनेलच्या
मुख्य पदावर असणारी संयुक्ता आपले चॅनेलमधील सर्वोच्च स्थान टिकवु पहाते आहे.
लेखकाने
पुस्तकाच्या मुख्यकथे सोबत एखाद्या चॅनलमध्ये चालणारे राजकारण,
टीआरपी वाढवण्यासाठी केले जाणारे विचित्र उपाय आणि स्पर्धेच्या जगात
टिकुन राहण्यासाठी चाललेली प्रत्येकाची धडपड, या विविध
विषयांवर भाष्य केले आहे. पुस्तकाच्या कथेमध्ये खूप व्यक्तिरेखा आहेत आणि प्रत्येक
व्यक्तिरेखेचे आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आहे, जे
लेखकाने उत्तम प्रकारे चित्रीत केले आहे. त्याचप्रमाणे कथेमधील अरविंद ही
व्यक्तिरेखा! अरविंद नाट्य क्षेत्रातील मोठा दिग्दर्शक. तो फक्त
नाट्यक्षेत्रापर्यंत सीमित आहे. एका रंगकर्मीसाठी नाटक हेच सर्वस्व असतं. तो
दिग्दर्शित करत असलेलं एक नाटक सोडून तो या 'अच्छा तो हम'
या सिरियलचा सहाय्यक दिग्दर्शक होतो. नाट्यकलेपासून दूर होऊन तो
मालिकेच्या मार्केटच्या जगात प्रवेश करतो. जसजसा अरविंद या छोट्या पडद्यासाठी काम
करू लागतो, तसतसं त्याला या छोट्या पडद्याची पोकळी समजू
लागते. सुरुवातीला तो स्वतःला या सर्वांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण
सरतेशेवटी तो सुद्धा या दलदलीमध्ये अडकतो आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन करतो.
छोट्या
पडद्यावरील या मालिका आणि त्यामध्ये काम करणारी पात्रं ही प्रेक्षकांच्या घरची
सदस्य होऊन जातात. मालिका बघणारा प्रेक्षक त्या पात्रांना आपल्या जीवनाचा एक भाग
बनवतात. बरोबर घड्याळाच्या ठोक्यावर हातातील, घरातील,
बाहेरची, नोकरीची कामे संपवून मालिका सुरु
होण्याच्या अगोदर टीव्ही समोर येऊन बसतात. मालिकेचा एक जरी भाग चुकला, किंवा एक दिवस जरी मालिका बघायला मिळाली नाही, तर या
प्रेक्षक राजाला आपल्या आयुष्यातील एक दिवस चुकल्यासारखा वाटतो. या सर्व गोष्टी
लेखक अभिराम भडकमकर यांनी पुस्तकामध्ये उत्तम प्रकारे अधोरेखित केल्या आहेत.
पुस्तकामध्ये
कलाक्षेत्रातील प्रत्येक घटकावर; अभिनय, दिग्दर्शन, लेखक, निर्माते,
यांवर परखडपणे भाष्य केले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकाला
त्याच्यासोबत धरून ठेवते. पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन यांनी केले आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. जर तुम्ही अभिनय आणि
कला क्षेत्राशी संबंधित असला, तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच
वाचले पाहिजे. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे आणि प्रत्येक वाचकाने वाचावे असे
हे पुस्तक लेखक अभिराम भडकमकर लिखित-
ॲट
एनी कॉस्ट!.