रणजित देसाई लिखित 'राधेय' ही कर्णाच्या आयुष्याचा वेध घेणारी कादंबरी. कर्ण हे महाभारतातील एक महत्वाचं पात्र. सगळ्यांनाच
कर्णाच्या आयुष्याबद्दल कुतूहल वाटत आणि त्या कुतुहलापोटीच ही कादंबरी वाचनात आली. हे पुस्तक म्हणजे 'कर्णचरित्र' नव्हे तर, आपल्या सगळ्यांच्याच मनात असलेल्या "त्या" एका कर्णाची ही
कहाणी. भावकहाणी. हे लेखकाने कादंबरीच्या सुरूवातीलाच
स्पष्ट केले आहे, आणि ते अगदी तंतोतंत खरे
आहे, याचा प्रत्यय आपल्याला पुस्तक वाचताना पदोपदी येतो..
कर्ण जन्माने जरी कुंतीपुत्र असला तरी तो त्याच्या कर्माने श्रेष्ठ
ठरला.त्याच्या कर्मानेच तो सर्वत्र ओळखला गेला.म्हणूनच त्याला कौंतेय न म्हणता राधेय
असं म्हटलं आहे.सर्वच अभ्यासक,साहित्यिक,जाणकार मंडळी असं म्हणतात
की,कर्ण जर मोठा झाला असता तर तो कुणालाही मानवाला नसता, ह्या वाक्याची गंभीरता वाचताना आपल्याला जाणवत राहते.चांगल्या ठिकाणी मिळालेली हीन वागणूक किंवा वाईट ठिकाणी
मिळालेली चांगली वागणूक यामुळे माणसं घडतात.आता यात कोण चांगलं कोण वाईट हा वादाचा
मुद्दा होऊ शकतो, पण कर्ण हा त्याला जीवनात
आलेल्या अशाच काही चांगल्या वाईट अनुभवांमुळे घडत गेला आहे. आणि म्हणूनच परिस्थितीने कर्णाला घडविले आहे असं वाटतं.
कर्णाचे पराक्रम,त्याची निष्ठा,त्याची मैत्री मग ती कृष्णासोबतची असो किंवा दुर्योधनासोबतची
तो सदैव जपत आला, त्याच बरोबर त्याची तत्वे, झालेले अपमान,त्याच्या चुका आणि त्यासाठीचे प्रायश्चित्त या सगळ्यांना धैर्याने
सामोरा जात राहिला, पुस्तक वाचताना या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.त्याच्या जन्माबरोबच सुरु
झालेल 'जगण्याचं कोडं' तो आयुष्यभर सोडवण्याचा प्रयत्न करीत राहिला, हे पुस्तकातील अनेक प्रसंग वाचताना प्रत्ययास येते. लेखकाने प्रत्येक प्रसंगाचे वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने केले
आहे. प्रत्येक स्थळ, प्रसंग, घटना अक्षरशः डोळ्यांसमोर
उभी राहते.
"स्वयंवराचा दिवस उजाडला. नगराच्या ईशान्येला सभामंडप उभारला होता. प्रवेशद्वारी गगनाला भिडलेले गोपुर उभे केले होते.रत्नांकीत सुवर्णासनांनी, तोरणांनी सभास्थान अलौकिक बनले होते!
अशाप्रकारे स्वयंवर स्थळाचे अत्यंत बारकाईने केलेले चोख
वर्णन असो वा युद्धानंतर कुरुक्षेत्रावरील भीषण परिस्थितीचे वर्णन असो;
"कुरुक्षेत्राची विस्तीर्ण, विशाल रणभूमी उदास, उजाड वाटत होती. आकाशी सूर्य तळपत असूनही त्या भूमीचे तेज ओसरले होते. जय- पराजयाचा अर्थ तर केव्हाच संपला होता. रणांगणावर छाया फिरत होती अतृप्त गिधाडांची!" वाचक ती परिस्थिती तंतोतंत अनुभवतो.
आपल्यातलाच कर्ण जणू त्याची कथा(की व्यथा?) सांगू लागतो, ही आपल्यातल्याच कर्णाची कहाणी आहे, असेच सतत वाटत राहते. त्याची सत्यता-असत्यता तपासायची असल्यास ज्याने त्याने ती नक्कीच तपासावी, ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. वाचताना आपण अनेकदा चरफडतो, चिडतो, हताश होतो, दुःखी होतो, प्रसंगी पेटून उठतो आणि शेवटी शांत होतो , आत्ममग्न होतो.
पुस्तक मिटून आपल्यातल्या कर्णाला मिठीत घेऊन शून्यात बघत राहतो;हेच लेखकाचं आणि या कादंबरीचं मोठेपण आहे.
'मेहता पब्लिशिंग हाऊस' यांनी या कादंबरीचे प्रकाशन केले आहे.कर्णाची भावकहाणी सांगणारी 263 पानांची ही कादंबरी प्रत्येक पुस्तकप्रेमीच्या अवश्य संग्रही असावी अशी आहे.
जाणतेपण ते झपाटलेपण अनुभवायचं असल्यास प्रत्येकाने आवर्जून
वाचावी अशी ही कादंबरी रणजित देसाई लिखित 'राधेय'.
अजिंक्य भोसले
पुणे