Sunday, July 30, 2023

एका सामान्य शिंपिणीची परिस्थितीच्या विरुद्ध दिलेल्या लढ्याची एक असामान्य गाथा..


 


धग

                                                            लेखक - उद्धव ज. शेळके

 

काही माणसं अशी असतात ज्यांच्या आयुष्यात परिस्थिती विरुद्ध झुंजणं तिच्याशी लढा देणे, हे पिढ्यान-पिढ्या चालत आलेलं असतं. जणू हा लढा त्यांची परंपराच बनली आहे. प्रत्येक दिवस अपार कष्ट आणि प्रत्येक रात्र ही उद्याच्या सुखाच्या सोनेरी किरणांची आशा धरणारी असते. एका विस्थापित (विस्थापित म्हणजे कोणत्या तरी प्रकल्पामध्ये स्वतःची जमीन अथवा घर जाऊन झालेले बेघर असं नसून हे उदरनिर्वाहसाठी झालेले विस्थापित) कुटुंबाच्या संघर्षाची कथा सांगणारी कादंबरी, लेखक उद्धव ज. शेळके लिखित " धग "

२१४ पानांची ही कादंबरी वरवर बघायला गेला तर अत्यंत साधी सोप्पी वाटते. कादंबरीची भाषा ही नेहमीची प्रमाण मराठी असली तरी त्याच्यातील बोल हे वऱ्हाडी आहेत. ही वाचायला अवघड नाही. प्रत्येक शब्दांचा अर्थ लगेच समजून येतो. त्यामुळे ह्या कादंबरीचा आशय-विषय वाचकाला आपलंस करून घेतो. कादंबरीची नायिका कौतिक, तिचा पती महादेव आणि त्यांची दोन मुलं भीमा-नाम आणि मुलगी यसोदा. वरवर बघायला गेलं तर एक सामान्य शिंपी कुटुंब. पण ही कथा एका सामान्य शिंपिणीची परिस्थितीच्या विरुद्ध दिलेल्या लढ्याची एक असामान्य गाथा आहे. कौतिक आपल्या पतीने लवकरात लवकर आपला पारंपारिक शिंपी व्यवसाय परत सुरु करावा किंवा निदान छोटेखानी कपड्याचे दुकान तरी सुरु करावे म्हणून स्वतःचे पोठ मारून साठवलेले पैसे देते. त्यासोबतच नवऱ्याने उभा केलेल्या व्यवसायाची ती पहिली गिराइक सुद्धा बनते. जेणे करून आपल्या नवऱ्याने कच न खाता उमेदीने व्यवसाय करावा, पण भरतीच्या गाड्याच्या एका वांढळ बैलाने मान टाकताच जसा गाड्याचा भार दुसऱ्या बैलावर पडतो, तसा नवऱ्याच्या कामचुकार वृत्तीमुळे संसाराचा भार एकट्या कौतिकवर येऊन पडतो. यासोबतच मोठा मुलगा भीमा चुकीच्या संगतीला लागून घरातून परागंध होतो. कौतिक आपला दुसरा मुलगा नामा आणि लहान मुलगी यसोदा यांना घेऊन संसाराचा गाडा वाढत रहाते. तिच्या या लढ्याची धग इतकी आहे कि यामध्ये वाचकाचे मन सुद्धा शेवटी शेवटी होरपळून निघते. पुढे जाऊन कौतिकवर असहाय्य परिस्थिती ओढवते ज्यामध्ये मुलगा नामा भरडला जातो. नामाला शिक्षणाची खूप आवड आहे. खूप शिकावं अशी त्याची इच्छा असते, पण सरते शेवटी परिस्थितीच्या विरुद्धचा हा लढ्या एकट्या कौतिकचा न राहता तो नामाचा होऊन जातो. एक अनामकी आशेच्या किरणाची, एका अनामिक मदतीच्या हाताची तो वाट बघत, शिक्षण सोडून एका हॉटेलमध्ये भांडी घासण्याची नोकरी स्वीकारतो. नामाची झालेली ही अवस्था बघून खरंच वाचकाचे मन हळहळते.......

कादंबरीचे प्रकाशन केले आहे पॉप्युलर प्रकाशन यांनी. पुस्तकाचे मुखपृष्ठ भ.मा. परसवाळे यांनी साकारले आहे. साधी शैली असणारी ही कादंबरी नेहमीच्या विषयांसारखी न वाटता वेगळी वाटते. वास्तवाचे दर्शन घडवणारी ही कादंबरी प्रत्येक वाचकाने जरून वाचली पाहिजे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही जरूर असावी.

एका सामान्य शिंपिणीची परिस्थितीच्या विरुद्ध दिलेल्या लढ्याची एक असामान्य गाथा..

  धग                                                              लेखक - उद्धव ज. शेळके   काही माणसं अशी असतात ज्यांच्या आयुष्यात परिस...