Sunday, May 9, 2021

शेत-शिवारातल्या गोतावळ्याची गोष्ट

 
गोतावळा

                                   

                                       लेखक - आनंद यादव

 

नमस्कार मंडळी, आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे, लेखक आनंद यादव लिखित गोतावळाही कादंबरी. लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्र मालिकेमधील घरभिंतीहे पुस्तक वाचले होते, ज्यामध्ये ते ज्या मालकाची शेती फाळ्याने करत होते ते शेत, शेतमालक विकून टाकतो आणि यादव यांचे शेत निघून जाते. या गोष्टीचा सखोल परिणाम आनंद यादव यांच्या वडिलांवर  होतो, आणि याच विषयी लेखकाने घरभिंतीया पुस्तकामध्ये लिहिलं होतं. यातूनच गोतावळाही कादंबरी निर्माण झाली आणि हीच  आहे गोतावळा या कादंबरीची पार्श्वभूमी .

१४५ पानाच्या या पुस्तकाची संपूर्ण कथा ही कथेचा नायक नारायण (नारबा) सांगत आहे. पुस्तकाचे शीर्षक वाचून कोणालाही वाटेल की गोतावळा म्हणजे एखाद्या कुटुंबाची गोष्ट असेल, हो. पण या कुटुंबात फक्त माणसं नसून त्यामध्ये गायी,म्हशी,शेळ्या,बैल,कुत्रे,कोंबड्या,शेत-शिवार आणि शेतीची अवजारे या सर्वांचा समावेश आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसलं कुटुंब ? तर मंडळी, हे कुटुंब त्या प्रत्येक शेतकऱ्याचे असतं  जो शेतीला आपले आयुष्य मानतो. त्याच  शेतकऱ्यांपैकी एक  म्हणजे आपल्या कथेचा नायक नारबा जो काळ्या आईची अत्यंत मायेने सेवा करतो. शेतामध्ये वाढणाऱ्या पिकासोबतच त्याचा त्याच्या सवंगड्यांवर तितकाच जीव असतो. त्याचे हे सवंगडी म्हणजे वर उल्लेख केलेले प्राणी आणि अवजारे.नारबाहा शेतामध्ये काम करणारा शेतगडी आहे. शेतामधील प्रत्येक घडणारी गोष्ट तो सांगत आहे, त्याचा संपूर्ण दिनक्रम वैरणी घालणे,शेण काढणे,मोटा धरणे,उसाला पाणी पाजणे अशी आणि किती तरी शेतीची कामे तो करत आहे. या सोबतच त्याचं त्याच्या मळ्यामधील जनावरांवर खूप जीव आहे. नारबा त्याची आणि त्याच्या मळ्याची गोष्ट सांगत आहे; पण त्याच्या सांगण्यामध्ये एक नाराजीचा सूर दिसून येतो. हा सूर त्याच्या एकटेपणाचा आहे.

राहण्याची,खाण्या-पिण्याची सगळी सोय करतो आणि लग्न लावून देतो या बोलीवर मालकाने नारबाला त्याच्या शेतात कामाला आणलेलं असत. बाकीच्या गोष्टी मालक पूर्ण करतो पण लग्नाची गोष्ट कित्येक वर्ष मालक पूर्ण करत नाही. या कारणामुळे नायकाचा सूर हा तक्रारीचा आणि मालकावरच्या नाराजीचा आहे. मळ्याचा मालक हा एक सधन आणि प्रगतीची कास धरणारा शेतकरी आहे. काळासोबत आपण बदलले पाहिजे आणि कालानुरूप शेती केली पाहिजे यावर त्याचा भर आहे. यासाठी मळ्याचा मालक मळ्यातील सर्व जनावरे हळूहळू विकून टाकतो आणि नवीन ट्रॅक्टर घेतो. मळ्यातील एक एक जनावर जाऊ लागते तसे नारबाचे हळवे रूप वाचकांना दिसून येते. पुस्तकामध्ये असे काही क्षण आहेत जे वाचून मन हळवे होते.

लेखक आनंद यादव यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचे संपूर्ण लहानपण शेतीच्या कामांमध्ये गेले. त्यामुळे  शेतीमधील,मळ्यामधील त्यांना माहिती असलेल्या सर्व गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. पुस्तकाची भाषा पश्चिम महाराष्ट्रातील रांगडी कोल्हापुरी मराठी आहे. त्यामुळे ही कादंबरी अधिक रंजक झाली आहे.पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंगयांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केले आहे. प्रत्येकानी वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे, अशी ही कादंबरी लेखक आनंद यादव लिखित गोतावळा2 comments:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.