Sunday, May 2, 2021

कलक्षेत्राच्या लाडक्या 'बाईंविषयी'

 



झिम्मा आठवणींचा गोफ

                                       

                                                     लेखिका - विजया मेहता

 

 

आपल्या समाजामध्ये अशा काही असामान्य व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या अखंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यांचे हे व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावि करतं, त्यांच्या जडण-घडणीच्या प्रवासातून आपल्याला आपल्या जगण्याचा मार्ग मिळतो. अशाच काही प्रभावशाली व्यक्तींच्या आत्मचरित्रांचीमालिका आम्ही आमच्या 'पुस्तकएक्सप्रेस' या ब्लॉगवर घेऊन आलेलो आहोत, त्यामालिकेतील पुढील व्यक्ती, ज्यांनी मराठी रंगभूमीची चळवळ वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, दिग्गज नाटकार, कलावंत ज्यांनी घडवले, आपल्या अभिनयाच्या आणि दिग्दर्शनाच्या जोरावर उत्तमोत्तम  नाट्यकृती रंगभूमीवर उभ्या केल्या अशा विजय मेहता म्हणजेच कलक्षेत्राच्या लाडक्या 'बाईंविषयी' आज मी तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे, 'झिम्मा: आठवणींचा गोफ ' हे विजया मेहता यांचे आत्मचरित्र.

४४० पानाच्या या पुस्तकामध्ये लेखिका विजया मेहता यांनी त्यांच्या आयुष्याच्या सर्व आठवणींचा गोफ वाचकांना समोर मांडला आहे. हा गोफ त्या वाचकाला आपल्यासोबत, आपल्यासमोर बसवून सांगत आहेत असा अनुभव हे पुस्तक वाचते वेळी येतो. पुस्तक वाचताना असं प्रकर्षाने जाणवतं की या पुस्तकाची विभागणी चार भागामध्ये सहज सोपी आहे. एक: बाईंचे बालपण; ज्यामध्ये त्या स्वतः बालपणीच्या विजया जयवंत म्हणजे बेबीला डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे संपूर्ण बालपण आणि त्यांच्या आईच्या बायजीच्या आठवणी सांगतात. दोन: तरुण वयातील विजया ज्यांनी नाट्यक्षेत्रामध्ये पदार्पण केलं, नाट्यकलेचे त्यांना मिळालेले प्रशिक्षण आणि त्यासोबत रंगभूमीवरील त्यांचा वावरया विषयीचे  सविस्तर वर्णन वाचायला मिळतं. तीन:बाईंच्या खाजगीआयुष्यातील घडामोडी, ज्याध्ये त्या नाट्यक्षेत्रासोबत घर-संसार सांभाळत आहेत, यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या बऱ्या-वाईट आठवणी पुस्तकामध्ये उलडल्या आहेत. चौथा भाग :बाईंच्या आजवरच्या रंगभूमीवरी कामाविषयी आहे, ज्यामध्ये त्यांनी आजवर केलेल्या प्रत्येक नाटकाचे दिग्दर्शन आणि अभिनय याबद्दलचा अनुभव आहे. हे पुस्तकम्हणजे खर तर नाट्य, अभिनय आणि सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट user manual आहे. कारण बाईंनी केलेल्या प्रत्येक नाटकाविषयी सखोल माहिती यामध्ये मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने दिग्दर्शन करतेवेळी संहितेवर केलेले  संस्कार, नाटकांच्या तालमीचे नियोजन, रंगमंच व्यवस्था, ध्वनी आणि प्रकाश योजना, त्यासोबतच भूमिकेचा शोध कसा घ्यावा या विषयी बाईंनी सखोल माहिती दिली आहे. रंगभूमी हेच आपलं कार्यक्षेत्र आहे असं समजून त्यांनी  प्रत्येक नाट्यकृती अजरामर केली त्यामुळे त्यांच नाट्यक्षेत्रामध्ये अव्वल स्थान आहे. भारतीय रंगभूमीसोबत बाईंनी विदेशी रंगभूमीवर सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली. या विषयी सुध्दा आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळते. नाट्यानुभव सोबतच लेखिका विजया मेहता यांनी अभिनय प्रशिक्षणविषयी सखोल मत मांडले आहे, ज्यामध्ये त्या प्रामुख्याने स्टॅनिस्लॅव्हस्कीच्या अभिनय थिअरीबद्दल सांगतात. त्यांच्या अभिनयामध्ये,दिग्दर्शनामध्ये स्टॅनिस्लॅव्हस्की, आणि त्यांच्या गुरूंचा इब्राहिम अल्काझी आणि अदी मरझबान यांचे प्रतिबिंब दिसून येते.

ज्या वाचकांना नाट्यकलेमध्ये,अभिनयकलेमध्ये रुची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक पर्वणी ठरेल कारण बाईंनी केलेल्या प्रत्येक नाटकाविषयी सखोल विश्लेषण पुस्तकामध्ये आहे. जे एका दिग्दर्शकाला,नटाला मार्गदर्शन म्हणून उपयोगी ठरतं. विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली, सोबतच उत्तम नाटकार, कलावंत घडवले. बाईंच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरी बद्धल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले त्यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री,महाराष्ट्र गौरव,कालिदास सन्मान या आणि इतर पुरस्कार आणि सन्मानांबद्धल  पुस्तकामध्ये माहिती वाचायला मिळते.

पुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुभाष अवचट यांनी साकारले आहे. पुस्तकांमधील छायाचित्रांमुळे बाईंचा आजवरचा  प्रवास जवळून अनुभवता येतो. प्रत्येक रंगकर्मीने आवर्जून वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे  पुस्तक अभिनेत्री,दिग्दर्शिका विजया मेहता लिखित 'झिम्मा आठवणींचा गोफ.'


1 comment:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.