आहे मनोहर तरी
लेखिका - सुनीताबाई देशपांडे
असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. हे आपल्याला इतिहसापासून चालत आलेल्या अनेक उदाहरणांवरून दिसूनही येत. याचच आणखी एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील रसिकांचे आराध्य दैवत पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे. पण अशा थोर व्यक्तिमत्वाबरोबर संसार करताना, त्यांच्या कार्यात सर्वतोपरी मदत करताना स्वतःच स्वतंत्र अस्तित्व हरवण्याचा धोकाही तितकाच मोठा असतो. सुनीताबाई मात्र याला अपवाद ठरल्या. पु.लं सारख्या थोर आणि प्रसिद्ध माणसासोबत सहजीवन व्यतीत करताना त्यांनी स्वतःच स्वतंत्र अस्तित्व आवर्जून जपलं आणि याच त्यांच्या अस्तित्वाची कथा सांगणारे पुस्तक म्हणजे 'आहे मनोहर तरी'.
'आहे मनोहर तरी' या पुस्तकाच्या लेखिका जरी स्वतः सुनीता देशपांडे असल्या तरीही त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे नमूद करतात की, 'हे पुस्तक म्हणजे काही माझे आत्मचरित्र नाही.' आयुष्याच्या उत्तरार्धात ज्या आठवणी त्यांच्या स्मरणात राहिल्या, ज्या घटनांना, प्रसंगांना त्यांना लिखित स्वरूप द्यावेसे वाटले अशा सगळ्या संमिश्र आठवणींना दिलेला उजाळा म्हणजे हे पुस्तक.
‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात सुनीताबाईंनी अशा सर्व कटू-गोड आठवणी लिहिल्या आहेत, ज्यामुळे त्या माणूस म्हणून घडत गेल्या, ज्यामुळे त्यांना जीवनाकडे बघण्याचा नवा आणि समर्पक दृष्टिकोन मिळाला. पु.लंमुळे त्यांच्या आयुष्यात आलेली माणसे, त्यांच्याकडून आलेले अनुभव, त्यांनी केलेले समाजकार्य, सुप्रसिद्ध लेखकाची पत्नी म्हणून मिळणारा मान-सन्मान आणि त्याच बरोबर याबिरुदाखाली हरवत जाणारी स्वतःची स्वतंत्र ओळख आणि त्याच दुःखही त्यांनी व्यक्त केलं आहे.
सुनीता देशपांडे या स्वतः एक स्वतंत्र विचार असणारी, कवितांची आवड असणारी, उत्तम अभिनयगुण अंगी असलेली, कलेची जाण आणि आवड असलेली, गृहकृत्यदक्ष स्त्री होत्या, पण स्वेच्छेने त्यांनी पु.लं साठी स्वतःचे करियर बाजूला ठेऊन पु.लंना त्यांच्या कामात संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर नेटाने सर्व शक्तीनिशी पार पाडला.
या २३९ पानांच्या पुस्तकात अनेकदा सुनीताबाईंच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलच्या तक्रारी वाचनात येतात, पण 'माझा बऱ्याचदा तक्रारीचा सूर लागतो. असे म्हणून ही बाब त्या स्वतःच मान्य करतात आणि यावरूनच पुस्तकाच्या 'आहे मनोहर तरी' या शीर्षकाची समर्पकता लक्षात येते. पु.लं विषयीच्या तक्रारी मांडताना त्यांच्याशिवाय जगण्याची निरर्थकताही त्या स्पष्ट करतात. पु.लं मधील 'मूलपण' जस त्यांना स्पर्शून गेलं तसेच या मूलपणामुळे त्यांना हवा असलेला मित्र या नात्यातून न मिळाल्याची खंतही त्या व्यक्त करतात. पु. लं च आणि त्यांच्या पत्नीचं अनोखं नातं जाणून घेण्यासाठी प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावं अस हे पुस्तक आहे.
सुनीताबाईंनी या पुस्तकात स्वतःच्या गुणांबरोबरच स्वतःचे स्वभावदोषही सांगितले आहेत. आयुष्यात केलेल्या चांगल्या कामांबरोबरच हातून झालेल्या चुकांचीही प्रांजळपणे कबुली दिली आहे. त्यांचा हा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. जुन्यापिढीच्या असूनही 'लग्न म्हणजे कृत्रिम बंधन.' ही आणि अशा प्रकारची आधुनिक विचार मांडणारी विधाने वाचकाला विचार करायला भाग पाडतात.
पुस्तकाचे प्रकाशन 'मौज प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ बाळ ठाकूर यांनी केले आहे. सुप्रसिद्ध लेखकाच्या गृहिणी आणि खऱ्या अर्थाने सहचारिणी असलेल्या पत्नीचा 'जीवन म्हणजे काय..?' या प्रश्नाचं उत्तर शोधणारा प्रवास अनुभवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा!!!
अपूर्वा सपकाळ
पुणे
खुप सुंदर परिचय आहे .पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल.
ReplyDeleteधन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.
Deleteव्वा! अपूर्वा ताई खूपच सुंदर परिचय लिहिला आहेस.
ReplyDeleteपरिचय वाचून पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली.
धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.
Deleteअप्रतीम 💯
ReplyDeleteधन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.
Deleteमस्त
ReplyDelete��������..पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल
ReplyDelete👌🏻👌🏻..पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल
ReplyDeleteछान लिहलंयस अपूर्वा! :)
ReplyDelete