Saturday, April 12, 2025

अठरापगड जातींच्या पंक्तीत मोटार लाईनमधील माणसांची आगळ्यावेगळ्या एकोणिसावी जात....

 



एकोणिसावी जात

                                                     लेखक - महादेव मोरे

 

 

 आपल्या सामाज्यामध्ये अठरापगड जाती आहेत.त्याचे वेगळे त्या त्या जातीतील लोकांनी टिकवून ठेवले आहे. प्रत्येकाचे वेगळेपण ही त्यांची ओळख आहे. यातूनच त्यांचं वैविध्यपूर्ण आयुष्य घडत आहे. पण आज एक पुस्तक वाचतेवेळी या अठरापगड जातींच्या पलीकडे जाऊन स्वतःचे असे वेगळेपण सांगणारी एक जात आपल्याला दिसून येते. भिकासत्यवाणी आयुष्य जगणारी, काम करणारी, सतत भटकंतीवर असणारी, मिळेलते जेवणारी, मिळेलत्या जागेवर पस्तारी हातरून झोपणारी अशी ही जात म्हणजे ड्रायव्हर-क्लिनर लोकांची. मी बोलत आहे, ग्रामीण कथा आणि कादंबरीकर महादेव मोरे लिखित कादंबरी "एकोणिसावी जात" या विषयी. लेखक महादेव मोरे हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमे रेषेवरील निपाणी या गावचे. महादेव मोरे त्यांच्या लिखाणातून ट्रक ड्रायव्हर, क्लिनर, गॅरेजमध्ये काम करणारे लोक, हॉटेलवाले, शेत मजूर या सारख्या गोष्टीतून उभारनिर्वाह करणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकतात. अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले महादेव मोरे यांनी कधी गॅरेजमध्ये, तर कधी ड्रायव्हर म्हणून काम केले होते. त्याच अनुभवातून एकोणिसावी जात ही कादंबरी लिहिली आहे. पिठाची गिरण चालवत त्यांनी ३८ पुस्तकं लिहिली. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाच्या माध्यमातून ते समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकतात. दिनांक २१ ऑगष्ट २०२४ रोजी त्यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. मोरे यांनी विपुल असं साहित्य लेखन केले आहे.

१५८ पानांच्या या कादंबरीमधील घटनांचा आणि त्यामधील तपशिलांचा कालखंड हा ४०-५० वर्षां पूर्वीचा आहे. कादंबरीचा नायक नारायण, हा लहानपणापासून आईवडिलांचं छत्र हरवलेला. गावच्या स्टॅंडवर फळ विक्रेत्या चाचाच्या टपरीमध्ये तर कधी स्टॅन्डवरच्या बंद गाड्यांमध्ये झोपून. कधी त्याच गाड्या धुणे, पुसणे, गाडयांना शॅइल (लुब्रिकेटिंग), पंक्चर काढलेली इन्नर टायरमध्ये बसवून स्टेपनी करणे, तर कधी त्याच गाडीवर क्लिन्नर म्हणून काम करणे. अशा प्रकारच्या कामातून पैसे मिळवून नारायण स्वतःचा रोजगार चालवत असे. यासोबतच नारायण ड्रायव्हरच्या शेजारी असून तो क्लच कसा दाबतो, गियर कसा टाकतो या गोष्टी बारकाईने बघून, तो गाडी चालवायला शिकतो. पुढे हा नारायण गाड्यांवर ड्रायव्हरची नोकरी करत करत हायवे लाईनवर चालणाऱ्या ट्रॅकवर ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळतो. या त्याच्या प्रवासात त्याला बरे-वाईट अनुभव येतात. त्यातून तो मार्ग काढत त्याचे आयुष्य चालवत असतो. कादंबरीचे पूर्ण कथन जरी नारायण भोवती फिरत असले तरी, लेखक महादेव मोरे यांनी ड्रायव्हर लाईन मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमे रेषेवरील निपाणी या गावचे लेखक महादेव मोरे यांनी याच भागातील संपूर्ण ग्रामीण जीवनाचे दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना घडवले आहे. नारायण जरी फक्त एक ड्रायव्हर म्हणून असला तरी त्याच्या आयुष्यातील येणारे अनुभव वाचकांना आपलेसे वाटू शकतात. ड्रायविंगच काम करत करत नारायणाच्या आयुष्यामध्ये यास्मिनच्या रूपाने प्रेमाचे क्षण सुद्धा येतात. ते क्षण लेखकाने त्यांच्या चित्रदर्शी शैलीमध्ये मांडले आहेत ते अक्षरशःकाळजाला भिडतात. कथेच्या सरते शेवटी नारायणाच्या आयुष्यात एक मोठे वादळ येते त्याने तो हादरून जातो. पण त्याला सावरण्यासाठी त्याच्या या ड्रायव्हर लाईन मधील त्याचे मित्र त्याला मदत करतात.

ग्रामीण जीवनाचे वेगळ्या पद्धतीने अनुभव देणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे, मेहता पब्लिशन यांनी केले आहे. पुस्तकाची कथा आणि वाचनकांना पुस्तकाकडे आकर्षित करणारे मुखपृष्ठ साकारले आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी. अठरापगड जातींच्या पंक्तीत मोटार लाईनमधील माणसांच्या या आगळ्यावेगळ्या एकोणिसाव्या जातीच्या जगाचे वेगळे विश्व लेखकाने वाचकांसमोर उभे केले आहे. या धगधगीत जीवनानुभवाचे चित्रण वाचकांना या कादंबरीकडे आकर्षित करणारे आहे. प्रत्येक वाचकाने वाचावी आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही ही कादंबरी जरून असली पाहिजे. अत्यंत साधं आयुष्य जगलेले, ग्रामीण कथा आणि कादंबरीकर महादेव मोरे लिखित कादंबरी  एकोणिसावी जात !


Sunday, April 6, 2025

चाकोरी बाहेरच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध पावलेल्या, सन्मान मिळालेल्या दशनायकांची गाथा



लोकरंगनायिका

                         

                                            लेखक - डॉ.प्रकाश खांडगे.

 

 

लोकसंस्कृती आणि लोककला हे आपल्या भारतीयसमाजाचे महत्वाचे अंग आहे. लोकसंस्कृती दर्शवते की आपल्या समाजाची संस्कृती ज्यातून आपले निसर्गाशी जोडलेले अतूट नाते आणि त्यामाध्यमातून निसर्गाशी असलेला आपला जिव्हाळा. लोकसंस्कृती ही लोकसाहित्याचा महत्वाचा घटक आहे. यासोबतच लोककला ही समाजातील लोकांच्या जीवनातून आलेली, त्यांच्या परंपरेला दर्शवणारी कला असते. लोककलेच्या माध्यमातून आपल्या समाजातील परंपरांचे सौंदर्य आणि सामर्थ्य पाहायला, अनुभवायला मिळते. याच कलेचे कलाकार म्हणजेच लोककलावंत. ते लोककला जपतात, तिचा प्रसार करतात, त्यांच्यासाठी ही कला एक व्यक्त होण्याचे माध्यम असते. यासोबतच ती कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जाण्याचे काम हे लोककलावंत करत असतात. अशा लोककलावंतांचा इतिहास आणि परंपरा आपल्या भारतात खूप जुनी आहे. लोककलावंतांच्या परंपरेमध्ये आपल्याला स्त्री शक्तीचा प्रमुख भाग सुद्धा बघायला मिळतो. या लोककलेच्या क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमठवणाऱ्या महिला कलावंताची गाथा सांगणारे पुस्तक घेऊन आज मी आलो आहे. मी बोलत आहे पत्रकार, लेखक डॉ.प्रकाश खांडगे यांच्या लोकरंगनायिका या पुस्तकाविषयी.

१७५ पानांच्या या पुस्तकामध्ये लोककलेच्या अंगणातील दशनायिकांची जीवन गाथा आपल्याला वाचायला मिळते. त्यांचा खडतर प्रवास, त्यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा, अवहेलना, शोषण, दारिद्र्य यातून कणखरपणे त्यांनी काढलेला मार्ग. त्याच्या कलेवर त्यांनी केलेले निसीमप्रेम आपल्याला हे पुस्तक वाचून समजून येते.यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर, सुलोचनाबाई चव्हाण, तिजनबाई, धनबाई कारा, पार्वती बाउल, मंजम्मा, गुलाबो सपेरा, गुलाबबाई नौटंकी, राजश्री काळे-नगरकर या दहा महिला कलावंतांची गाथा लेखक डॉ.प्रकाश खांडगे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडली आहे. डॉ.खांडगे हे या प्रत्येक कलावंताच्या सादरीकरणाचे प्रत्येक्षदर्शनी साक्षीदार तर आहेतच पण या कलाकारांची त्याच्या कलेवर असणारी निष्ठा, ध्यास याचा त्यांनी अनुभव घेतला आहे.

यमुनाबाई वाईकर यांचं नाव घेतलं की आठवते बैठकीची लावणी. दर्जेदार अभिनय आणि हस्तमुद्रा यांच्या बळावर, बसून सादर केली जाणारी लावणी म्हणजे बैठकीची लावणी. लावणी हा कला प्रकार महाराष्ट्राची शान आहे. यमुनाबाई वाईकर यांनी स्वबळावर संगीतबारी उभी केली आणि ती गाजवली देखील. यमुनाबाईंचा प्रवास थककरणारा आहे.

विठाबाई नारायणगावकर हे नाव घेताच पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची या ओळी नकळत ओठांवर येतात. विठाबाई यांच्या आयुष्याचा पट एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल असाच आहे. तमाशा या लोकप्रिय लोककलेतील त्या महाराणी आहेत. पण हे अढळ ध्रुवपद मिळवल्यासाठीचा त्याचा जीवन प्रवास वाचकाला अवाक करतो. त्यांच्या मुलाच्या कैलासाच्या जन्माचा प्रसंग आज पर्यंत आपण सिनेमाच्या माध्यमातून खूप वेळा पाहिला आहे. तो प्रसंग कोणता हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. तमाशा या लोककला परंपरेतील विठाबाई नारायणगावकर यांनी तमाशासम्रादनी हे बिरुद हक्काने कमावले.

सुलोचनाबाई चव्हाण यांची वाचकांना विशेष ओळख करून द्याची गरज नाही. त्यांचे नाव निघताच आठवते ती फड सांभाळ तुऱ्याला गं आला ही त्यांची ठसकेबाज लावणी. सुलोचनाबाईंनी फडावरची लावणी चक्क माजघरात नेली. सुलोचनाबाईंच्या गायनाची ऊर्जा रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असे. सुलोचनबाईंची आठवण निघताच आठवते ती त्यांची प्रसन्न मुद्रा आणि त्यांची ठसकेबाज गायकी.

तिजनबाई.पांडवानी ही छत्तीसगडमधील आदिवासी गायन शैली जगभरात लोकप्रिय केली ती लोककलावंत तीजन बाई यांनी. पंडवानी म्हणजे महाभारताच्या कथेचे सादरीकरण. हे सादरीकरण गायन, वादन, अभिनय यांचा त्रिवेणी संगम साधत सादर केली जाते. छत्तीसगढी बोली मध्ये सादर होणारी ह्या पंडवानीची तीजन बाईंनी संपूर्ण जगाला ओळख करून दिली. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या तिजनबाई यांनी पंडवानीची पताका त्यांच्या खांद्यावर सार्थपणे पेलली आणि ही पताका घेऊनच त्यांनी स्त्री शक्तीचा जागरही घडवला.

धनबाई कारा या कच्छच्या रणातील रानवेल. गुजरात मधील लोककला संगीतातील एक अग्रणी नाव. धनबाई कारा गुजरातच्या लोकसंगीताचा, लोकगीताचा, लोकनृत्याचा मानदंड झाल्या. त्यांचा हा प्रवास वाचकांना भारावून टाकणार आहे.

पार्वती बाउल. बाऊल संगीत म्हणजे बाह्य स्वराने अंतर स्वराला दिलेली हाक. या संगीत प्रकारातील एक लोकप्रिय नाव म्हणजे पार्वती बाउल. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात पार्वतीजींनी अत्यंत चिकाटीने आणि मेहनतीने स्वतःचे असे आढळ स्थान निर्माण केले. पार्वती बाउल यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बाउल गान परंपरेची प्रतिष्ठा वाढवलेली आहे. इतकेच काय बाऊल गान संगीताची एक चळवळच त्यांनी पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये आश्रमांद्वारे, आखाड्यांद्वारे उभी केली.

मंजम्मा. मंजुनाथ शेट्टीला लहानपणीच आपल्यातील स्त्री जाणवली, कुटुंबाचा विरोध पत्करून मंजुनाथ असण्याचे ओझे नाकारून त्या मंजम्मा बनल्या. रेणुका देवीचा जग हातात घेऊन, पोटासाठी नाच गाणी नाटके करता करता मंजम्मा यांनी लोककलावंत म्हणून एक लौकिक मिळवला. मंजम्मानी जोगत्यांसाठी, लोक कलावंतांसाठी व्यवस्थेविरुद्ध भांडणही केले आणि जोगती कलावंत म्हणून प्रतिष्ठाही प्राप्त केले.मंजम्मा यांचा जीवनाचा प्रवास हा प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

गुलाबो सपेरा. त्यांच्या समाजात तीन मुली नंतर चौथी मुलगी जन्माला आली तर तिला जिवंत पुरून टाकतात. त्यांचा जन्म तीन बहिणीनं नंतरचा. जन्मताच गावा बाहेर जमीनमध्ये गाढली गेलेल्या गोलाबो, पुढे सगळ्या वाईट प्रथांना पुरून उरल्या. कालबेलिया नृत्यद्वारे गुलाबो सपेरा यांनी आंतरराष्ट्रीय मंच गाजवले. राजस्थानातील कालबेलिया परंपरेचा इतिहास मोठा रंजक आहे. राजस्थानला लोकनृत्याची समृद्ध परंपरा आहे आणि या परंपरांविषयी सखोल माहिती आपल्याला गुलाबो सपेरा यांच्या आयुष्याच्या प्रवासातून मिळते.

गुलाबबाई नौटंकी. महाराष्ट्रामध्ये तमाशा ही लोककला लोकप्रिय आहे, प्रमाणेच उत्तर प्रदेशात नौटंकी ही लोककला तितकीच लोकप्रिय आहे. कलावंताचे अस्तित्व पणाला लावणाऱ्या या कला. नौटंकी या लोककलेत काम करणाऱ्या गुलाब बाई या पहिल्या स्त्री कलावंत आहेत. आपल्या गायनाने, अभिनयाने त्यांनी नौटंकीला लोकप्रियता मिळवून दिली.

जयश्री काळे-नगरकर. वयाच्या तेराव्या वर्षी पायात चाळ बांधून त्यांना बोर्डावर नाचावे लागले. पण आपल्या नशिबाला दोष न देता त्यांनी चाळालाच आपलं आयुष्य, आपलं सर्वस्व मानलं. अगदी आपल्या सुख दुःखाचे सोबतीच मानलं. आपल्या लावणी नृत्याच्या जोरावरती त्यांनी मुलींना लावणी नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कला केंद्र सुरू केली. त्यांच्या या प्रवासात असंख्य अडचणींचा, चढउतारांचा सामना करावा लागला. चित्रपटांच्या पडद्यावर त्या चमकल्याच पण यासोबत त्यांनी आपल्या मुलालाही शिकवून जिल्हाधिकारी बनवलं.

या पुस्तकाचे प्रकाशन पद्मगंधा प्रकाशन यांनी केले आहे. कला क्षेत्रामध्ये आपले स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या या महिला कलावंतांच्या आयुष्यातील संघर्षाचा आढावा मिळतो. चाकोरी बाहेरच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध पावलेल्या, सन्मान मिळालेल्या दशनायकांची गाथा पत्रकार डॉ. प्रकाश खांडगे लिखित लोकरंगनायिका!