Sunday, December 26, 2021

सामाजिक प्रबोधनाचा दगडी मक्ता


दगडी मक्ता

                            

                          लेखक - रमेश अंधारे.

 

मानवाच्या समृद्धीचा मार्ग हा त्याने केलेल्या प्रगतीच्या माध्यमातून असला तरी ती प्रगती त्याने मिळवलेल्या शिक्षणातून आहे. शिक्षण ही अशी मशाल आहे जी गुलामगिरीच्या, जाती-धर्माच्या अंधारातून वाट काढत उज्वल भविष्याच्या उगवतीची वाट दाखवणारे दिशा दर्शक आहे. शिक्षणामुळे कोणा एकाची प्रगती नसते तर त्यांच्या सोबतच्या सर्वांची प्रगती होते. विजयाचे शिखर गाठण्यासाठी शिक्षणाच्या पायऱ्या सदैव मदत करतात. पण शिक्षणामुळे आलेल्या शहाणपणाचा वापर उत्तम आणि आदर्श समाज घडवण्यासाठी करणे तितकेच महत्वाचे आहे.जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाला गुलामगिरीच्या खाईतून बाहेर काढले तसेच.याच गोष्टीवर भाष्य करणारे पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला अली आहे. लेखक रमेश अंधारे लिखित दगडी मक्ता.

३५० पानांच्या या पुस्तकाची भाषा सुरवातीला वाचकाला अवघड वाटते पण जस जसे आपण वाचत जाऊ तसे त्या भाषेचे वाचकाला आकलन होते. पुस्तकांमधील भाषा, त्यामधील काही म्हणी आणि पाथरवटी बोली भाषेमुळे वाचक पुस्तकाकडे खेचला जातो. कथेचा नायक उमा ढाले याच्या भोवती पुस्तकाचे कथानक घडत आहे. वटफळी गावामध्ये राहणार कोंडू हा पाथरवट समाजातील एक. हा समाज दगडावर घाव घालून त्याचे जाते-पाटे, बांधकामासाठी लागणारे घडविचे दगड बनवणारा हा समाज. कोंडूचे संपूर्ण आयुष्य जात्या-खलबत्यामध्ये दळले,कांडले गेले. जी फरफट आपली झाली ती आपल्या मुलाची उमाची होऊ नये म्हणून त्याचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी झटत राहतो. शिक्षण हे एक असं वरदान आहे जे माणसाला समृद्ध करते. कथेचा नायक उमा स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसमृद्ध होतो तर त्याच्यासोबत त्याच्या समाजातील सर्व लोकांची मदत करून त्यांना समृद्धीच्या मार्गाकडे घेऊन जातो. जातपंचायतीच्या जाचक त्रासामुळे अंधारात गेलेल्या समाजाला उमा जातपंचायती विरुद्ध लढून बाहेर काढतो. लेखक रमेश अंधारे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जाती- जातीमधील, गावा- गावातील राजकारण, गरीबी, गावातील यासमस्या यासोबतच शेती, उद्योग, शिक्षण आणि पारदर्शक राजकारण, मिळालेली सत्ता ही लोकांच्या उज्वल भविष्यासाठी कशी वापरावी याविषयी त्यांनी सखोल भाष्य केले आहे. बहुजन हितकारिणी पक्षाच्या माध्यमातून उमा राजकारणामध्ये प्रवेश करतो. आणि मिळालेल्या पदाचा वापर हा लोककल्याणासाठी करतो. कथेमध्ये उमाच्या आयुष्यात काही छोटी-मोठी वादळे येतात त्यातून तो स्वतःला नीट तारून नेतो. यासर्वां प्रवासामध्ये त्याला साथ मिळते ते त्याच्या पत्नी अंजलीची.उमाचा हा संपूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी नक्कीच हे पुस्तक वाचले पाहिजे.

धन-दौलत, सोनं, चांदी, जमीन हे ऐश्वर्या तुमच्याकडे असेल तर ते कोणीही तुम्हाला लुबाडून, तुमच्याकडून ओरबाडून सहज घेऊ शकते. पण जर तुमच्याकडे शिक्षण असेल तर कोणीही कितीही प्रयत्न केला तरी ते तुमच्याकडून घेऊ शकत नाही. आणि जर तुम्ही शिक्षणाने समृद्ध झाला असाल तर तुमच्या आणि तुमच्या समाज्याच्या प्रगतीसाठी तुम्ही त्याचा योग्य वापर करू शकता. याची शिकवण आपल्याला आदरणीय शाहू, फुले, आंबेडकर यांनी दिली. त्यांनी सांगितलेल्या याच गोष्टीचे आपण आचरण केले तर लेखक रमेश अंधारे यांनी या पुस्तकांच्या माध्यमातून सांगितलेला समाज आपण नक्की उभारू शकतो. असे मला वाटते.

पुस्तकाचे प्रकाशन पद्मगंधा प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक!

लेखक रमेश अंधारे लिखित दगडी मक्ता.


https://www.instagram.com/tv/CVDZEIfoX2_/?utm_medium=copy_link


https://youtu.be/5VIjOdHZY1w


आम्हाला Instagram वर Follow सुद्धा करा आमचा Insta ID आहे shri_pustakexpress

 

Sunday, December 12, 2021

भावनिक नात्यांचं सायड

 



सायड

                            लेखक - रवींद्र पांढरे

 

जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट नश्वर असते, हा सृष्टीचा नियमच आहे. बियाणे मातीमध्ये रुजते, त्याला कोंब येतो, त्याचे छोट्या रोपट्यामध्ये रूपांतर होते, ते बहरू लागते आणि मग कालांतराने त्यांची पानझड होते. असेच काहीसे मानवी जीवनाचे आहे. माणसाच्या आयुष्यात कितीही सुखाचे क्षण आले, तरी कधी ना कधी परत त्याला त्या दुःखाच्या क्षणांचा सामना करावाच लागतो. प्रत्येक बहराच्या नशिबी पानगळ ही लिहिलेली असते. याच गोष्टीला समर्पक असणारे पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो आहे. मी बोलत आहे लेखक रवींद्र पांढरे लिखित 'सायड' या पुस्तकाबद्दल!

१३७ पानाच्या या पुस्तकाची कथा जामनेरी बोलीतील आहे. 'सायड' या शब्दाचा अर्थ दोन शेतकऱ्यांनी एकमेकांच्या मदतीने मिळून आपल्या शेतीची मशागत करून घेणे, असा होतो. ग्रामीण भागामध्ये अशी देवाणघेवाण ही सुरूच असते. कधी ती औत फाट्याची असते, तर कधी माणुसकीची, तर कधी नात्यांची, भावनिक आधाराची देवाण घेवाण सुरूच असते. कथेचा नायक यशवंत कासाबयोच्या घरासोबत सायड करतो. यशवंता एक सधन शेतकरी; पण संसाराचे सुख त्याच्या पदरी नाही! कासाबयो या म्हातारीचा दत्तक घेतलेला तरुण मुलगा आजारामुळे अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळे म्हातारीसमोर शेताची आणि सोबतच या लेकाच्या संसाराची काळजी आहे. कासाबायोची सून शांता आणि यशवंता हे दोघे या सायडच्या निमित्ताने जवळ येतात. यशवंताला शांतीकडून बायकोचे आणि शांतीला यशवंताकडून नवऱ्याचे सुख मिळत जाते. पण सरते शेवटी त्या दोघांना एका वास्तवाला सामोरे जावे लागते, ज्यामुळे दोघांच्यामधे एक दरी निर्माण होते.

पुस्तकातील कथेमध्ये अजिंठ्याच्या लेण्यांचे वर्णन आणि तेथील सृष्टीवैभवाचे दर्शन आपल्याला वाचायला मिळते. अत्यंत योग्य शब्दांमध्ये लेखकाने हे वर्णन मांडले आहे, ज्यामुळे वाचकाला या पुस्तकाच्या माध्यमातून अजिंठा लेणीचेच दर्शन होते. कथेमध्ये यशवंता आणि सायबू या समदुःखी मित्रांची मैत्री मांडतेवेळी लेखकाने या दोघांमधील संवादाच्या माध्यमातून संसारामध्ये बायकोचे किती अविभाज्य महत्त्व आहे, हे खूप छान पद्धतीने मांडले आहे. बायको शिवाय घर नाही आणि बायको शिवाय संसार नाही. बायको हा नवऱ्याच्या मनाचा आधार असतो. नवरा कितीही खंबीर असो! त्याला साथ देणारी त्याची हक्काची पार्टनर बायको ही लागतेच. अशा पद्धतीचे लिखाण या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते.

ग्रामीण साहित्य हे नेहमी वाचकाला आपल्याकडे आकर्षित करते ते त्याच्या कथेमुळे, सभोवतीच्या परिसराच्या वर्णनाने आणि त्याच्या भाषेमुळे! या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे या पुस्तकाची जामनेरी बोली, ज्यामुळे वाचनामध्ये गोडी निर्माण होते. जामनेरी बोलीचा लहेजा, बोलण्याचा ढंग वाचकाच्या तोंडी येतो. त्यामुळे वाचक पुस्तकाकडे ओढला जातो.

पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी केले आहे. वाचकांना अशा प्रकारची उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून रोहन प्रकाशन सदैव प्रयत्नशील असतात. रोहन प्रकाशन यांची वेगळी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या पुस्तकाची ओळख वाचकांना व्हावी म्हणून निर्माण केलेल्या मुद्रा! उदाहरणार्थ- सायड या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मोहर ही मुद्रा बघायला मिळते. मोहर या मुद्रेचा अर्थ असा, की मोहर या मुद्रे अंतर्गत फिक्शन आणि ललित साहित्य येते. अशा प्रकारच्या अन्य काही मुद्रा आहेत. समाजरंग- ज्यामध्ये सामाजिक विषय, व्यक्तिरंग- ज्यामध्ये आत्मचरित्र, आणि किशोर- ज्यामध्ये किशोर वयातील वाचकांसाठीचे साहित्य येते. रोहन प्रकाशनाच्या या वेगळेपणामुळे वाचकांच्या मनात ते आपली जागा निर्माण करत आहेत. वाचकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करण्यामध्ये संपूर्ण टीमचे मनापासून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या या वाटचालीस आमच्या शुभेच्छा. पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी केले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक!

लेखक रवींद्र पांढरे लिखित 'सायड'

 

जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा

https://rohanprakashan.com/product/saayad/

रोहन प्रकाशन यांच्या इतर दर्जेदार पुस्तकांसाठी आणि माहितीसाठी  click करा. 

https://rohanprakashan.com/