Sunday, February 28, 2021

जंगलाचे संपूर्ण विश्व उलगडणारे पुस्तक 'झुंड'झुंड

                                        लेखक - दत्ता मोरसे

 

या आधी जंगल सफरी खूप केल्या. ट्रेकिंगच्या माध्यमातून गड-किल्ले,डोंगर-दऱ्या आणि जंगलातलं जग अनुभवयाला मिळालं. पण आज एक असं पुस्तक वाचायला मिळालं ज्यामधून जंगलातील अनोख विश्व अनुभवायला मिळालं. ज्यामध्ये जंगलातल्या प्रत्येक प्राण्याचे विश्व अत्यंत सूक्ष्म पद्धतीने वाचायला मिळाले. जंगलामधील कूस बदलणाऱ्या निसर्गाचे रूप अनुभवायला मिळाले. लहान प्राण्यांची मोठ्या प्राण्याने केलेल्या शिकारीचा थरार वाचल्यावर,जंगलामधील प्राण्यांची सुरु असलेली स्वतःच्या अस्तित्वाची लढाई समजून येते.

नमस्कार मंडळी, आज मी वर उल्लेख केल्याप्रमाणे जंगलाचे जग उलडणारे पुस्तक लेखक दत्ता मोरसे लिखित 'झुंड'ही कादंबरी तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आम्ही लेखक दत्ता मोरसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे जंगलाशी असलेले नाते,त्यांच्या 'डिस्कवरी मराठी' ह्या YouTube चैनेल वरील व्हिडिओ बघून त्यांचे आणि जंगलाचे असणारे अतूट नातेलक्षात आले. Man vs. wild म्हणावा असे हे लेखक दत्ता मोरसे सर.

आता जरा पुस्तकाविषयी बोलतो. १०४ पानाच्या या पुस्तकामध्ये गव्याच्या दोन कळपांमधील संघर्षाची लढाई सांगितली आहे. भुंड्या आणि रंग्या या दोन गव्यांची झुं आणि त्यांची आपापल्या काळपावर असलेली सत्ता आणि त्यांच्या या संघर्षाने संपूर्ण जंगल विश्व थरारून जाते. पुस्तकाच्या सुरवातीला भुंड्या आणि रंग्या या दोघांची झुंझचे लेखकाने केलेले चित्त थरारक वर्णन डोळ्यासमोर उभे रहाते. लेखकाचा गव्यांविषयीचा अभ्यास मोठा आहे. गव्यांच्या प्रत्येक हालचाली,जडण-घडणीतील  सूक्ष्म तपशील लेखकाने पुस्तकामध्ये दिला आहे. प्राण्याचे एकमेकांवर अवलंबून असणारे विश्व,विविध आवाज काढून धोक्याची इशारत देण्याचे प्रकार यावरून या भिन्न जातीच्या प्राण्याचे एकमेकांशी असलेले नाते  समजून येते.

हे पुस्तक फक्त जंगलामधील प्राण्याचे विश्व फक्त  सांगत नाही,तर त्यांच्या माणसाकडून होणाऱ्या शिकारीवरसुद्धा भाष्य करते.लेखकाने शिकारीचे केलेले चित्तथरारक वर्णन विशेष कौतुकास्पद आहे. मध्यंतरी पुण्याच्या कोथरूड भागामध्ये एक गवा आला होता,पुढे माणसांच्या गर्दीत आपल्या सगळ्या अंगाचा भार धरणीवर टाकत तो जंगलातला जीव माणसांच्या गर्दीतून कायमचा निघून गेला..... त्याचा  दुर्दैवी अंत का झाला याचे उत्तर आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते. विकासाची भूक माणसाला इतकी लागली की ती मिटतच नाही. ही भूक इतकी वाढली आहे की त्यासाठी माणूस वन्यप्राण्यांच्या हद्दीत शिरकाव करत आहे. त्यामुळे हे प्राणी स्वतःच्या अस्तित्वटिकवण्याच्यालढाईत सैरभैर होऊन,आपल्या घरात येत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे,प्राण्यांना त्यांचे हक्काचे जंगल मिळालेच पाहिजेअशी भावना हे पुस्तक वाचल्यावर प्रकर्षाने मनात येते.

आता प्रश्न पडेलकी  हे कोणी करायचे तर,उत्तर सोप्पं आहे मित्रांनो, नुसती झाडे लावून भागणार नाही तर ती जोपासली पाहिजे,जंगले जपली पाहिजेत,जेव्हा जेव्हा जंगल पिकनिकच्या नावावर फिरायला जाऊ तेव्हा तिथे स्वच्छता राखू, प्लॅस्टिकच्यापिशव्या,वस्तू तिथे टाकणार नाही आणि ज्वलनशील गोष्टी जंगलांपासून जेवढ्या लांब ठेवू तेवढी जगले सुरक्षित राहतील. चला तर मग करा जंगलाच्या संवर्धनाचे आणि सुरक्षिततेचे संकल्प करूया.

पुस्तकांचे प्रकाशन 'दर्या प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकामधील रेखाटने प्रा.सुधीर गुरव यांनी साकारली आहेत त्यामुळे वाचनामध्ये अजून रंजकता येते. प्रत्येकाने वाचावे आणि प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक, जंगलाचे संपूर्ण विश्व उलडणारे पुस्तक लेखक दत्ता मोरसे लिखित 'झुंड'.जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्याचे असेल तर ९८९०४४१२१२ या नंबर वर संपर्क करा.


 

Sunday, February 7, 2021

मराठी सिनेसृष्टीतील ज्युबिली स्टार ज्यांनी सलग नऊ चित्रपट हिट देऊन Guinness Book of World मध्ये आपल्या नावाची नोंद करणारे दादा कोंडके.

 एकटा जीव

                                         - दादा कोंडके

                                                          शब्दांकन : अनिता पाध्ये.

 

आपल्या सामाजामध्ये काही अशा असामान्य व्यक्ती होऊन गेल्या आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या अखंड इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यांचे हे व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावी करतं,त्याच्या जडण-घडणीच्या प्रवासातून आपल्याला आपल्या जगण्याचा मार्ग मिळतो. अशाच काही प्रभावशाली व्यक्तींच्या आत्मचरित्राची मालिका आम्ही आमच्या 'पुस्तकएक्सप्रेस' या ब्लॉगवर घेऊन आलो त्याच मालिकेतले दुसरे पुस्तक  तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत

आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये असे काही अवलिया कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाने, आपल्या दिग्दर्शनाच्या जोरावर रसिकांचे मन जिंकले. रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. मराठी सिनेसृष्टीतील पहिले सुपर स्टार ज्यांनी सलग नऊ चित्रपट हिट देऊन Guinness Book of World मध्ये आपल्या नावाची नोंद केली. अशाच  हरहुन्नरी कलाकाराचा प्रवास सांगणारे पुस्तक; अभिनेता,लेखक,दिग्दर्शक दादा कोंडके यांचे आत्मचरित्र 'एकटा जीव' हे पुस्तक घेऊन आम्ही आपल्या भेटीला आलो आहे. ३९४ पानाच्या या पुस्तकामध्ये दादांच्या विनोदी अभिनेता,यशस्वी दिग्दर्शक,यशस्वी चित्रपट निर्माता या प्रवासाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी वाचायला मिळतात.

कृष्णा खंडेराव कोंडके. जन्म १९२८. खंडेराव कोंडके यांच्या घरी जन्मलेलं हे अपत्य पुढे जाऊन मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये एक मागून एक हिट सिनेमे करेल असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं. कारण जन्मापासून जगण्याचा संघर्ष दादांच्या नशिबाला चिकटला तो शेवट पर्यंत सोबत राहिला. लहानपणापासून दादा अतिशय खोडकर आणि दंगेखोर. त्यांच्या या गुणाने ते आपल्या आईला सतत भंडावून सोडत. सतत बडबड्या आणि विनोदी स्वभावामुळे दादांची मित्र मंडळी सतत वाढती असायची.  मुंबईमधील भोईवाडा परिसरात दादा लहानाचे मोठे झाले. पुढे आई-वडिलांचे छत्र हरवल्यावर दादा मुंबईत एकटे राहू लागले. अनधिकृत दारू विक्री,दूध चोरणे या पासून ते मारामारी करणे असे आणि किती तरी उद्योग दादांनी केले. पुढे सेवादलात काम करू लागले. सेवादलामध्ये गाणी म्हणणे,कलापथकामध्ये दादांनी त्याच्या तरुणपणात काम केलं. पुढे सेवादलातून बाहेर पडून स्वतःची दादा कोंडके आणि पार्टी सुरु करून.  "विच्छा माझी पुरी करा" या लोकनाट्याद्वारे दादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजू लागले.

विच्छा च्या माध्यमातून दादांची खूप लोकांशी ओळख झाली, त्यामध्ये एक नाव आवर्जून घेतल पाहिजे ते म्हणजे आशा भोसले यांचं. पुढे आशाबाईंनी दादांची ओळख भालजी पेंढारकर यांच्याशी करून दिली. बाबांनी  "तांबडी माती" मध्ये दादांना संधी दिली. तिथून त्यांचा सिनेमा क्षेत्रातला प्रवास सुरु झाला. म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी असते,तसंच तांबडी माती हा सिनेमा दादांच्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी होता ज्याला यश मिळाले नाही. या अपयशाने खचलेल्या दादांना आधार दिला तो त्यांचे गुरु बाबा (भालजी पेंढारकर) यांनी. बाबांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी फक्त सिनेमेच बनवले नाही तर संपूर्ण सिनेमा तंत्र दादांना शिकायला मिळाले. भालजी पेंढारकर दादांना आपला मुलगा मानत. हे बाप मुलाचं नातं इतकं मोठं होतं की बाबा दादांना स्वतः सोबत घेऊन एका ताटात जेवण करत. या पुस्तकामध्ये दादांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमाची जडण-घडण कशी झाली हे लिहिले आहे यामुळे त्यावेळच्या मराठी सिनेमाची आणि सिनेमा तंत्राची माहिती मिळते. या क्षेत्रामध्ये दादांच्या जवळ आलेल्या प्रत्येक व्यक्ती विषयी दादांनी लिहिले आहे. यासर्वांमध्ये आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे शिवसेनाप्रमुख ,हिंदूह्रदय सम्राट, कै. बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांसोबत असलेलं घट्ट नातं दादांनी या पुस्तकाच्या माध्यमातून उलघडले आहे. काही व्यक्तींविषयी दादांनी परखडपणे आपले मत व्यक्त केले आहे.  असो. दादांचे प्रत्येक सिनेमे जसे भन्नाट विनोदी होते तसेच त्यांचे हे आत्मचरित्र एकदा वाचायला सुरु केलं की ते एका बैठकीत पूर्ण करावेसे वाटते. सेन्सॉर बोर्ड विषयी दादांनी केलेलं लिखाण वाचतेवेळी हसून हसून पोटात दुखत. सेन्सॉर बोर्डला दादा 'शेंसार बोर्ड' म्हणतात. सिनेमा व्यतिरिक्त दादांनी त्यांच्या शिकारीच्या आवडीविषयीसुद्धा सांगितले आहे. शिकारीमधील गंमती जमती,थरारक अनुभव दादांनी पुस्तकामध्ये मांडले आहेत.

जस जसे आपण पुस्तकांच्या शेवटाकडे येतो तसतस पुस्तकाच्या सुरवातीला दादांनी या पुस्तकाचे शीर्षक 'एकटा जीव' हे का निवडले हे समजून येते. दादांच्या स्वभावाचा त्यांच्या जवळच्या लोकांनी खूप फायदा घेतला. आई-वडील,काका-काकूयांचे छत्र हरवल्यावर दादा एकटे पडले,पोरके झाले ते आयुष्याच्या अखेरी पर्यंत एकटेच राहिले.....

पुस्तकांमध्ये दादांच्या कार्यकाळामधील काही छायाचित्रे दिली आहेत. पुस्तकाच्या शेवटी दादांनी केलेल्या प्रत्येक सिनेमाची माहिती दिली आहे. मराठी सिनेमा क्षेत्रातील एक अवलिया तारा दादा कोंडके याचे हे आत्मचरित्र्य सर्वांना जगण्याची,संघर्ष करण्याची दिशा दाखवेल यात शंकाच नाही. पुस्तकाचे प्रकाशन 'मंजुळ पब्लिकेशन हाऊस' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अक्षर कमल शेडगे यांनी केले आहे. मराठी,हिंदी,इंग्रजी वृत्तपत्रे,मासिकांमधून लेख लिहिणाऱ्या लेखिका अनिता पाध्ये यांनी या पुस्तकाचे शब्दांकन उत्तम प्रकारे केले आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला त्यांनी त्यांची दादांसोबत झालेली ओळख आणि हे पुस्तक लिहिण्याची सुरूवात कशी झाली हे सांगितले आहे.  या पुस्तकाच्या आत्तापर्यंत १० आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. प्रत्येकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे एका लोकप्रिय व्यक्तीचे आयुष्य सांगणारे लोकप्रिय पुस्तक पुस्तक 'एकटा जीव'.