Sunday, July 18, 2021

भीतीदायक भविष्याची सूचना देणारे पुस्तक. ऑन द बीच लेखक - नेव्हिल शूट



ऑन द बीच


लेखक - नेव्हिल शूट

                अनुवाद - लेखिक नंदा खरे.

 

 

मानवाला प्रगतीशील होण्याचे वरदान मिळाले. नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून मानवाने स्वतःची आणि पर्यायाने समाजाची, देशाची प्रगती घडवली, या प्रगतीमधून संघर्ष केव्हा निर्माण झाला याचे त्याला भान उरले नाही. हा संघर्ष इतका उफाळून आला की त्याने युद्धाचे स्वरूप धारण केले. काही प्रगतीशील देशांनी देशाभिमानासाठी शेजारील देशावर बॉम्ब टाकून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला आणि या युद्धाचे परिणाम निष्पाप लोकांना भोगावे लागले. दुसरे महायुद्ध याचे उत्तम उदाहरण आहे. सुप्रसिद्ध कादंबरीकार, स्टोरीटेलर नेव्हिल शूट यांची १९५६ मध्ये प्रकाशित झालेली, अनेक दशकं बेस्ट सेलर म्हणून गाजलेली 'ऑन द बीच' ही कादंबरी घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो आहे. भीतीदायक भविष्याची सूचना देणारी ही कादंबरी नेव्हिल शूट याच्या शेवटच्या पुस्तकांपैकी एक म्हणावी लागेल.

१९६ पानांच्या या पुस्तकाची कथा उत्तर गोलार्धामधील दोन देशांमध्ये भडकलेल्या अणुयुद्धाच्या परिणामाची आहे. यामध्ये उत्तर गोलार्धातील देश संपून जातात. हळूहळू तो किरणोत्सर्ग दक्षिणेकडे सरकू लागतो. दरम्यान या संकटामधून सुखरूप वाचला जातो तो स्कॉर्पियन या अमेरिकन पाणबुडीचा कॅप्टन टावर्ज आणि त्याचे सहकारी. ते आपली पाणबुडी घेऊन दक्षिण गोलार्धात म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये येतात.  पुढच्या सहा महिन्यात किरणोत्सर्ग ऑस्ट्रेलियाला येऊन धडकणार याची माहिती त्यांना मिळते. युद्धाचे परिणाम हे ऑस्ट्रेलियाला दिसत असतात. या सहा महिन्याच्या काळात टावर्ज याची ओळख लेफ्टनंट कमांडर पीटर, मेरी, म्वारा, ऑसबोर्न याच्याशी होते. इतर अमेरिका आणि इतर उत्तर गोलार्धामधील देशांशी जिथे कोणी जिवंत आहे अशा देशांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु असतो. दरम्यान सीऑट्रल या देशांमधून काही रेडिओ संदेश येत असल्याची माहिती मिळते. तिथे कोणीतरी अजून जिवंत आहे आणि ते मदतीसाठी संदेश पाठवत आहेत आणि त्यांच्या शोधासाठी स्कॉर्पियन निघते. या शोध मोहिमेमध्ये काही विलक्षण प्रकार घडतात, आणि ते कोणते हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.

माणसाला आपल्या मृत्यूची कल्पना मिळताच तो स्वतःला वाचविण्याचा अतोनात प्रयत्न करतो. आपला मृत्यू निश्चित आहे हे जेव्हा त्याला समजते तेव्हा तो त्याला कठोर मनाने सामोरा जातो. तसेच जसजसे आपण या पुस्तकाच्या कथेच्या शेवटाकडे येतो,तसे आपल्याला काही मन पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी वाचायला मिळतात. किरणोत्सर्ग ऑस्ट्रेलियामध्ये येऊन पोहचतात. किरणोत्सर्गाचा वाढत्या परिणामाने लोकांचे आरोग्य खालावत जाते. आजाराने लोक हळूहळू मृत्यूच्या जवळ जात असतात,पण हा येणारा मृत्यू अत्यंत वेदनादायक असतो. त्याच्या पासून सुटका मिळावी आणि आपले मरण सुलभ व्हावे म्हणून काही लोकं त्या लाल डबीतील गोळ्या घेऊन मृत्यूला शरण जातात, तर काही त्या त्रासदायक, वेदनादायक मृत्यूला सामोरे जातात. शेवटी उरत तर फक्त रिकामं शहर. जिथे सर्व गोष्टी आहेत, उंच उंच इमारती, हॉटेल्स, मैदाने, पाणी, वीज सर्व काही आहे पण हे सर्व भोगण्यासाठी माणूस नाही.....

पुस्तकाचे प्रकाशन 'मनोविकास प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. या अफलातून कादंबरीचा अनुवाद लेखिका नंदा खरे यांनी केला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये नंदा खरे यांनी त्यांची या कादंबरी विषयीची ओढ  व्यक्त केली आहे. प्रत्येकाने वाचावे आणि प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे भीतीदायक भविष्याची सूचना देणारे पुस्तक लेखक नेव्हिल शूट लिखित 'ऑन द बीच'.

 

Sunday, July 4, 2021

जंगलातील संघर्षाची मनोरंजक कहाणी सांगणारे पुस्तक



सत्तांतर

                                

                   लेखक  - व्यंकटेश माडगूळकर

 

 

संघर्षजन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्राण्याला संघर्ष हा करावाच लागतो. कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी, तर कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठीकधी सत्ता मिळवण्यासाठी, तर कधी मिळालेली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, अन्नासाठी, जगण्यासाठी, जगवण्यासाठी. संघर्ष हा सर्वत्र आहे. मग तो माणसांच्या जंगलात असो वा प्राण्यांच्या. संघर्ष हा कधीच संपत नाही. सदैव सर्वकाळ संघर्ष प्रवाहित असतो. असेच जंगलातील संघर्षाची कथा सांगणारे एक पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो आहे.

६२ पानांच्या या पुस्तकाची कथा वानरांच्या वर्तनासंबंधीच्या निरीक्षणावर आणि निष्कर्षावर आधारित आहे. लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्याही कादंबरीला प्रस्तावना नसते पण सत्तांतर ही कादंबरी याला अपवाद आहे. लेखकाने कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये या पुस्तकाचे उद्दिष्ट सांगितले आहे. आजपर्यंत वानरांवर झालेल्या संशोधांमधून ज्या ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, उदा. आईला पिणाऱ्या पोरांची नराकडून हत्या होणे,वानरांचे रोजचे जगणे,पाणी पितेवेळी घेतली जाणारी खबरदारी,दोन गटातील युद्ध, वेगवेगळे आवाज काढून जंगलातील प्राण्यांना सावध करणे या आणि इतर सर्व गोष्टी ज्या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून आणि लेखकाने स्वतः केलेल्या निरीक्षणातून आणि त्यांना आलेल्या अनुभवातून या पुस्तकाची कथा तयार झाली आहे. याबद्धल लेखकाचे विशेष कौतुक वाटते, कारण लेखक व्यंकटेश माडगूळकर हे लोकप्रिय कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. माणसांच्या वागण्याचा,स्वभावाचा त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. माणसांमधील साधेपणा हळवेपणा ते अगदी तरलतेने त्यांच्या लिखाणामध्ये मांडतात.  या सर्व गोष्टींमुळे त्यांनी लिहिलेली कथा असो वा कादंबरी अगदी रंजक होते. लिखाणाची भाषा सुद्धा सरळ आणि साधी सोपी  ज्यामुळे वाचक त्या कथेशी त्या कादंबरीशी जोडला जातो. सदरील कादंबरी जरी वानरांच्या जीवनावर असली तरी वर नमूद केलेली सर्व वैशिष्ठे या पुस्तकांमध्ये अनुभवायला मिळतात.

दोन टोळीमधील युद्ध आणि त्यासोबत जंगलामधील इतर प्राण्यांचे एकमेकांवर अवलंबून असणारे जीवन. या सर्व गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. त्यासोबतच वानरांवर संशोधन केलेल्या शास्त्रज्ञांची आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे आणि माहिती या पुस्तकांमध्ये आहे. शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन लेखकाने कथा स्वरूपामध्ये या पुस्तकात मांडले आहे. त्यामुळे वाचनात रंजकता येते.

पुस्तकाचे प्रकाशन 'मेहता पब्लिकेशन हाऊस' यांचे आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. पुस्तकामधील चित्रे लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी स्वतः रेखाटली आहेत. चित्रांमुळे कथेमध्ये जिवंतपणा येतो. जंगलातील संघर्षाची मनोरंजक कहाणी सांगणारे पुस्तक लेखक व्यंकटेश माडगूळकर लिखित सत्तांतर.