Sunday, July 4, 2021

जंगलातील संघर्षाची मनोरंजक कहाणी सांगणारे पुस्तकसत्तांतर

                                

                   लेखक  - व्यंकटेश माडगूळकर

 

 

संघर्षजन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्राण्याला संघर्ष हा करावाच लागतो. कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी, तर कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठीकधी सत्ता मिळवण्यासाठी, तर कधी मिळालेली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी, अन्नासाठी, जगण्यासाठी, जगवण्यासाठी. संघर्ष हा सर्वत्र आहे. मग तो माणसांच्या जंगलात असो वा प्राण्यांच्या. संघर्ष हा कधीच संपत नाही. सदैव सर्वकाळ संघर्ष प्रवाहित असतो. असेच जंगलातील संघर्षाची कथा सांगणारे एक पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो आहे.

६२ पानांच्या या पुस्तकाची कथा वानरांच्या वर्तनासंबंधीच्या निरीक्षणावर आणि निष्कर्षावर आधारित आहे. लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या कोणत्याही कादंबरीला प्रस्तावना नसते पण सत्तांतर ही कादंबरी याला अपवाद आहे. लेखकाने कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये या पुस्तकाचे उद्दिष्ट सांगितले आहे. आजपर्यंत वानरांवर झालेल्या संशोधांमधून ज्या ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, उदा. आईला पिणाऱ्या पोरांची नराकडून हत्या होणे,वानरांचे रोजचे जगणे,पाणी पितेवेळी घेतली जाणारी खबरदारी,दोन गटातील युद्ध, वेगवेगळे आवाज काढून जंगलातील प्राण्यांना सावध करणे या आणि इतर सर्व गोष्टी ज्या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून आणि लेखकाने स्वतः केलेल्या निरीक्षणातून आणि त्यांना आलेल्या अनुभवातून या पुस्तकाची कथा तयार झाली आहे. याबद्धल लेखकाचे विशेष कौतुक वाटते, कारण लेखक व्यंकटेश माडगूळकर हे लोकप्रिय कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. माणसांच्या वागण्याचा,स्वभावाचा त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. माणसांमधील साधेपणा हळवेपणा ते अगदी तरलतेने त्यांच्या लिखाणामध्ये मांडतात.  या सर्व गोष्टींमुळे त्यांनी लिहिलेली कथा असो वा कादंबरी अगदी रंजक होते. लिखाणाची भाषा सुद्धा सरळ आणि साधी सोपी  ज्यामुळे वाचक त्या कथेशी त्या कादंबरीशी जोडला जातो. सदरील कादंबरी जरी वानरांच्या जीवनावर असली तरी वर नमूद केलेली सर्व वैशिष्ठे या पुस्तकांमध्ये अनुभवायला मिळतात.

दोन टोळीमधील युद्ध आणि त्यासोबत जंगलामधील इतर प्राण्यांचे एकमेकांवर अवलंबून असणारे जीवन. या सर्व गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. त्यासोबतच वानरांवर संशोधन केलेल्या शास्त्रज्ञांची आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे आणि माहिती या पुस्तकांमध्ये आहे. शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन लेखकाने कथा स्वरूपामध्ये या पुस्तकात मांडले आहे. त्यामुळे वाचनात रंजकता येते.

पुस्तकाचे प्रकाशन 'मेहता पब्लिकेशन हाऊस' यांचे आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. पुस्तकामधील चित्रे लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी स्वतः रेखाटली आहेत. चित्रांमुळे कथेमध्ये जिवंतपणा येतो. जंगलातील संघर्षाची मनोरंजक कहाणी सांगणारे पुस्तक लेखक व्यंकटेश माडगूळकर लिखित सत्तांतर.


 

2 comments:

  1. Thanks for sharing .good review.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much. for more book review please follow us on Instagram (shri_pustakexpress) and Facebook (Pustakexpress)

      Delete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.