Sunday, June 13, 2021

भय,गुढ,रोमहर्षक या विषयी वाचण्याची आवड ठेवणाऱ्यांसाठी.

 शाडूचा शाप

 

                                          लेखक - नारायण धारप.

 

त्यांच्या रहस्यमय आणि गूढ लेखनाने त्यांनी वाचकांच्या मनावर वेगळीच भुरळ घातली आहे. आजच्या पिढीसाठी त्यांचं नाव नवीन असेल पण त्यांच्या लिखाणाने एक काळ गाजवला होता. ज्या काळामध्ये दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती तेव्हा सामान्य वाचक त्यांच्या लेखनाची आतुरतेने वाट बघायचा. आजच्या सोशल मीडियाची क्रेझ असलेल्या पिढीलासुद्धा ऐवढीच ओढ लावायची ताकद त्यांच्या लिखाणात आहे. रहस्यमय आणि गूढ लेखनाच्या अव्वल स्थानी असणारे आणि वाचकाला त्यांच्या लेखणीद्वारे शेवटपर्यंत खेळवत ठेवणारे लेखक म्हणजे आदरणीय नारायण धारप.

नारायण धारप यांच्या अशाच रहस्यमय आणि गूढ लिखाणामधील एक कथासंग्रह मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. 'शाडूचा शाप'.१११ पानाच्या या पुस्तकामध्ये एकूण पाच कथा आहेत. प्रत्येक कथा ही भन्नाट आणि अर्थपूर्ण आहे. लेखक नारायण धारप यांचे लिखाण वाचकाच्या मनाचा ठाव घेते. ते वाचकाला कथेसोबत धरून ठेवतात.

 'कुतूहल' माणसाच्या स्वभावाला जडलेला आजार आहे असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण या कुतूहलापोटी माणूस त्याला पडलेल्या विविध प्रश्नांचा,घटनांचा शोध घेतो. त्याच्या मूळापर्यंत किंवा त्याच्या तर्कापर्यंत जाण्याची त्याला खूप उत्सुकता असते. याच विषयाला धरून 'शाडूचा शाप' या कथा संग्रहातील प्रत्येक कथा आहे. 'शाडूचा शाप' या कथेची मांडणी आणि विषय खूप वेगळा आहे.

 जन्माला आलेल्या जुळ्या मुलांपैकी एक मूल मृत जन्माला येतं आणि त्याच्या मृत्यूचे कारण हे की त्याच्या जुळ्या भावानेच त्याला आईच्या गर्भामध्ये मारलेलं असतं. तर आता हा नेमका शाडूचा काय शाप आहे, हे जाणून घेण्यासाठी ही कथा जरूर वाचली पाहिजे.

दुसरी कथा आहे 'जाग'. वर म्हंटल्याप्रमाणे माणूस कुतुहलापोटी कधी कधी चुकीच्या गोष्टी करून जातो आणि नको ते संकट आपल्या पदरी पडून घेतो. कथेचे नायक प्रो.कारखानीस हे याच कुतूहलाच्या मोहाला बळी पडतात. एकदा ते  'चिंची' या गावी एका शिरवाडकर नामक व्यक्तीचा वाडा काही दिवसांसाठी भाड्याने घेतात. आणि याच वाड्यामध्ये एक विचित्र प्रकार त्याच्या सोबत  पुढचा थरार वाचायला मिळतो.

तिसरी कथा आहे, 'आपुले मरण'. एक निवेदक ही कथा सांगत आहे त्याच्या डॉक्टर मित्राला आलेल्या अनुभवाची. सरकारी हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर मित्राची ओळख त्याच्या एका पेशंट सोबत होते. या पेशंटला जेव्हा वेगळ्या वॉर्ड मध्ये भरती करायचे असते तेव्हा तो अशी काही गोष्ट त्या डॉक्टरला सांगतो ज्याने तो संभ्रमामध्ये पडतो. त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा तर त्याला त्याचा डॉक्टरी पेशा मान्यता देत नसतो. कोणती आहे ती गोष्ट...? काय होतं ते रहस्य..?

चौथी कथा आहे,'लक्ष्मी-कांचन',ज्यामध्ये कथेचा नायक आपल्या सेक्रेटरी सोबत लग्न करता यावे म्हणून आपल्या पत्नीला मारण्याची योजना आखतो. अत्यंत शिताफीने  तो हे कृत्य करतो पण पुढे जाऊन असे काही घडते ज्यामध्ये त्याचे संपूर्ण आयुष्य उध्वस्थ होते.

पाचवी आणि शेवटची कथा आहे, 'पुनरपि जन्म पुनरपि...', या कथेसाठी लेखकांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. कारण कथेचा विषय इतका भन्नाट आहे की ज्यामुळे लेखक नारायण धारप यांचे लिखाण समृद्ध का असते हे समजून येते. विचार करा आपला घडून गेलेला भूतकाळ आपल्या चालू असलेल्या वर्तमानामध्ये  येऊन आपल्याला येऊ घातलेल्या भविष्यकाळाविषयी सांगत असेल,आपल्याला सावध करत असेल तर काय होईल. हे आपल्या फायद्याचे आहे ना..? म्हणजे ज्या चुका आपण भविष्यामध्ये करणार आहोत त्याची कल्पना आपल्याला मिळाल्यावर आपण त्या चुका सहज टाळू शकतो. आणि जर का आपण याकडे दुर्लक्ष केले तर....? याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कथेच्या नायकाची, सदाशिव याची जी अवस्था झाली तिचं आपली होईल......

पुस्तकामधील प्रत्येक कथा या निवेदन स्वरूपाच्या आहेत. प्रत्येक कथा कोणी तरी दुसरी व्यक्ती सांगत आहे. पुस्तकाची भाषा,शब्द रचना साधी सरळ आहे. त्यामुळे वाचनामध्ये सहजता येते. प्रत्येक कथा आणि त्याचा विषय अत्यंत भन्नाट असल्यामुळे पुस्तक बाजूला ठेवूस वाटत नाही. पुस्तकाचे मुखपृष्ठ संतुक गोळेगावकर यांनी साकारले आहे. पुस्तकांचे प्रकाशन साकेत प्रकाशन यांनी केले आहे. भय,गुढ,रोमहर्षक या विषयी वाचण्याची आवड ठेवणाऱ्यांसाठी. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक लेखन नारायण धारप लिखित 'शाडूचा शाप'.


No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.