Sunday, February 2, 2025

जुन्यातलं चांगलंही चुरगळून चोळामोळा करून समोर आलेलं एक नवीन वास्तव...रौंदाळा

 



रौंदाळा

                                         

                                   लेखक - कृष्णात खोत

 

 

असं म्हणतात की महाराष्ट्रात दर पाच किलोमीटरवर भाषा बदलते, संस्कृती बदलते, भूगोल बदलतो, वातावरण बदलते, माणसांचे राहणीमान बदलते. पण काही गोष्टी असतात त्या बदलत नाही. ठिकाण जरी वेगळं असलं तरी ती गोष्ट सारखीच असते. मग ते शहर असो वा गाव मग ते कमी लोकसंख्येचं, कमी वस्तीचं छोटसं खेडेगाव का असेना. एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे तिथलं राजकारण. आजच्या घडीला असं कुठलंच गाव किंवा शहर राहिलं नाही आहे; जे राजकारण विरहित असेल. दोन नद्यांचा संगम झाल्यावर एक नदी आपलं नाव, आपलं अस्तित्व विसरून दुसऱ्या नदीत मिसळून जाते; एक दिलाने त्या नदीत एकरूप होऊन जाते आणि प्रवाहित होते. पण माणसं राजकारणात मिसळली की ती काय होऊन जातात हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हे पुस्तक वाचलं पाहिजे. मी बोलत आहे कृष्णात खोत लिखित कादंबरी "रौंदाळ" याविषयी....

२९४ पानांच्या या कादंबरीमध्ये गावागावातील दोन गटांचं राजकारण कोणत्या स्तराला जातं आणि पुढे गावासमोर काय चित्र निर्माण होतं हे लेखक कृष्णात खोत यांनी त्यांच्या चित्रमय शैलीत वाचकांसमोर मांडले आहे. गावातील जुने जाणते राजकारणी आबा पाटील यांनी त्यांच्या काळात गावाला एकत्र बांधून ठेवले होते. गावाला कधीच निवडणुका बघायला मिळाल्या नाहीत, त्यामुळे गाव नेहमी एकत्र राहिलं. प्रत्येकाच्या सुख दुःखात लोकं मिळून मिसळून राहत होती. कालांतराने आबांनी आपले गाव नव्या पिढीच्या हाती दिलं आणि आबांचा मुलगा आप्पा पाटील हा गावचा सरपंच झाला. आबांनी जसे गाव सांभाळले....राखले; त्याप्रमाणेच आप्पा पाटील गावाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रयत्नात तोही कधी राजकारणी होतो हे त्यालाच समजत नाही. तर सोसायटी चेअरमन पांडू पाटील याचा रोख गावची सगळी सत्ता आपल्या हातात कशी येईल यावर असतो. दोन गटांच्या सत्तेच्या खेळात गाव कसा होरपळतो याचे विदारक दर्शन वाचकाला या कादंबरीच्या माध्यमातून होते. कादंबरीमध्ये जरी खूप व्यक्तिरेखा असल्या तरी या कादंबरीच्या कथेचा मूळ नायक "गाव" आहे. कारण गावाच्या केंद्रस्थानी संपूर्ण कथानक फिरत आहे. याच कारणामुळे संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण करे पर्यंत वाचकाला पुस्तक हातावेगळे करता येत नाही.

बदलणाऱ्या राजकारणाचे वास्तवादी दर्शन घडवणाऱ्या या कादंबरीच्या माध्यमातून एक गोष्ट समजून येते; आणि आजच्या घडीला आपल्या आजूबाजूची, आपल्या समाजाची अवस्था बघून समजून येते ते म्हणजे; आजच्या घडीचे राजकारण हे कधीच सरळ रेघ मारल्यासारखे नाहीये. काही लोकांसाठी राजकारण ही चौथी गरज होऊन बसली आहे. अन्न, वस्त्र, निवाऱ्यागतच सहज कुठलं पदरात पडेल काय याचा विचार करणारी लोकं आता आपल्याला आपल्या अवती भोवती,  आपल्या समाजात दिसत आहेत हे ही कादंबरी वाचल्यावर समजून येते.

पुस्तकाचे प्रकाश केले आहे पॉप्युलर प्रकाशन यांनी. प्रत्येक वाचकाने वाचावी आणि प्रत्येकाच्या संग्रही असावी अशी ही कादंबरी कृष्णात खोत लिखित

रौंदाळा!