Sunday, May 30, 2021

अतिशय सखोल अभ्यास करुन लिहिले गेलेले आणि म्हणूनच संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.




लज्जागौरी

                लेखक - रा.चि. ढेरे

 

आपला देश हा विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. त्याला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा आहे. आपल्या देशाचा धार्मिक पौराणिक इतिहास खूप मोठा आणि परिपूर्ण आहे. इतिहासामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे, प्रसंगांचे, व्यक्तींचे संशोधन खूप लोकांनी, संस्थांनी केले आहे. पण पौराणिक गोष्टींचे संशोधन करणारे आणि त्यातही देवीदेवतांच्या इतिहासाचे, त्यांच्या संधर्भात सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींचे, त्यांचे विविध भागात सापडल्या जाणाऱ्या मूर्तींचे, उपासनांचे संशोधन आणि योग्य विश्लेषण करणाऱ्या व्यक्तीमध्ये आवर्जून नाव घ्यावे असे व्यक्तिमत्व म्हणजे मराठी इतिहास संशोधक, लेखक रा.चि. ढेरे.

 देवीदेवतांच्या विषयावर संशोधन हा विषय तसा चाकोरी बाहेरचा. तुम्ही केलेले संशोधन लोकांना पटले नाही तर विनाकारण वाढ ओढवून घेण्याचे प्रसंग घडतात. पण लेखक रा.चि. ढेरे हे याबाबतीत अपवाद ठरतात. त्यांनी तुळजाभवानी, महाक्ष्मी, दत्त, विठोबा, खंडोबा, गणपती या आणि अशा अनेक देवीदेवतांवर संशोधन करून आपले मत मांडले. पुर्ववैदिक मातृसत्ताक समाज आणि तत्कालिन समाजाने लैंगीकता आणि निसर्ग याची घातलेली सांगड या गोष्टींवर भाष्य करणारे 'लज्जागौरी' हे पुस्तक घेऊन आज तुमच्या भेटीला आलो आहे.

या २७२ पानांच्या पुस्तकामध्ये दक्षिण भारतामध्ये उत्खननातून सापडलेल्या आदिशक्तीच्या विविध मूर्तींची माहिती, पुरातन काळातील इतिहास, त्यांची केली जाणारी उपासना आणि त्या उपासनेचा हेतू, आदिशक्तीची विविध रूपे आणि त्याच्या उपासनेत आणि नावांमध्ये असणारे साम्य या आणि अशा  बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्रामधील काही भाग आणि त्यासोबत दक्षिण भारत, उत्तरपूर्व भारतामध्ये उत्खन्ना दरम्यान सापडलेल्या आदिशक्तीच्या मुर्ती ज्या नाभी पासुन खालचा भाग असणाऱ्या आणि काही योनी रूप असलेल्या आहेत. विश्वासर्जनाची देवता म्हणून त्यांची सर्व भारत देशामध्ये उपासना केली जाते. त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी या मुर्ती सापडल्या त्या ठिकाणचा पुरातन इतिहास आणि त्यांच्या नावाचे अर्थ यासर्वांची अभ्यासपूर्व मांडणी लेखकांनी या पुस्तकामध्ये केली आहे.  

जोगुलांबा, एल्लम्मा, रेणुका आणि भूदेवी याचे एकमेकांशी असणारे साम्य, त्याच्या पुरातन इतिहासामध्ये असणारी जमदग्नी, परशुराम आणि रेणुका यांची कथा या साऱ्याचा जोड देऊन आदिशक्तीच्या या विचित्र मूर्तीचे विश्लेशन लेखकांनी उत्तम प्रकारे केले आहे. देवीच्या उपासनेत कवडीचे (कवडीची माळ त्यामधील कवडी ) असणारे स्थान आणि कवडीचा योनीसदृश्य आकार याची माहिती आणि त्याचे विश्लेशन यामुळे वाचनामध्ये रंजकता येते. यासोबत दख्खनचे कुलदैवत श्री क्षेत्र जोतिबा याचा संपुर्ण इतिहास, त्याच्या नावाची फोड म्हणजे जोतिबा हे नाव कसे पडले, त्याचे उपासक आणि उपासना, त्याच्या आसपासच्या सर्व देवी-देवतांची मंदिरे, त्याच्या इतिहास, जोतिबा आणि यमाई यांच्या विवाहाची कथा, जोतिबा आणि खंडोबा यांचे एकमेकांशी असणारे साम्य, यासोबत जोतिबा देवाशी निडीत असणाऱ्या सर्व गोष्टींचे विश्लेशन लेखकाने किती अभ्यासपूर्वक लिहिले आहे हे समजते.

जोतिबा सोबतच मातंगी,एल्लम्मा,रेणुका आणि परशुराम यांचा इतिहास,उपासक आणि उपासना याची सर्व माहिती आपल्याला अभ्यासू दृष्टीने मिळते. आपल्या देशांच्या काही भागांमध्ये वारुळाची सुद्धा पूजा केली जाते. वारुळ हे भूमीचे-भूमीच्या सर्जनेंद्रियाचे प्रतीक मानले जाते आणि वारुळाला गर्भाशयाचे प्रतीक सुद्धा मानले जाते, आजही वारूळ रूपात किंवा कामाख्या मंदिरात योनि स्वरूपात तिची पुजा केली जाते; विशेष म्हणजे जीथे शक्तिपिठ आहे, देवीचे  मंदिर आहे तिथे वारूळ असतेच. विविध रूपांनी नटलेले संपूर्ण विश्व मानवीजीवन स्वतःची कूस उसवून जिने निर्माण केले ती आदिशक्ती, जगन्माता, उत्तान मही पृथ्वी, अदिती, रेणुका यांचा पुरातनकाळा पासूनचा संपूर्ण इतिहास अभ्यास पूर्वक मांडणीने सांगणारे असे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे प्रकाशन पद्मगंधाप्रकाशन यांनी केलेले असून पुस्तकाचे मुखपृष्ठ रविमुकुल यांनी केले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लज्जागौरी मातेचा शिरा पासून खालचा भाग असणाऱ्या मूर्तीचे छायाचित्र आहे. मुखपृष्ठावर असलेली प्रतिमा लज्जगौरीची म्हणजेच प्रकृती / पृथ्वि जी  नवसुर्जनासाठी तयार आहे. तिची  पुजा शेतपेरणी आधी, लग्नाआधी सुफल प्राप्तिसाठी करतात. ही  रोमन संस्कृतीमधील प्रजनन देवता व्हिनस सारखी आहे. अतिशय सखोल अभ्यास करुन लिहिले गेलेले आणि म्हणूनच संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि  प्रत्येक अभ्यासू व्यक्तीच्या आणि वाचकाच्या संग्रही असावे असे हे  लेखक रा. चि.ढेरे लिखित लज्जागौरी!


 

2 comments:

  1. Kasla bhari parichay ..ekdam vachavese vatatey..
    Added to wishlist

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. तुम्ही इतर पुस्तकांचे परिचय इथे वाचू शकता. follow us on Instagram

      Delete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.