Sunday, August 2, 2020

जेष्ठ साहित्यिक आणि थोर सामाजिक कार्यकर्ते, लेखक डॉ.भीमराव गस्ती त्यांच्या संघर्षांची गाथा सांगणारे पुस्तक.





बेरड

                                 लेखक - भीमराव गस्ती

 

 

पिढ्यान् पिढ्या होत असलेल्या अन्याया विरोधात आवाज उठवणं आणि त्यासाठी एखादी संघटना उभा करून न्यायासाठी,आपल्या हक्कासाठी, आपल्या लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रम राबवणे,चळवळ उभी करणे ही काही साधी गोष्ट नसते.ज्या लोकांच्या हक्कांसाठी लढा द्यायचा,त्याच लोकांनी आपल्या जीवावर उठायच; मग हा उभारलेला लढा कोणासाठी आणि कशासाठी...?

 

नमस्कार मंडळी, आज एका संघर्षांची गाथा सांगणारे पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. हा संघर्ष एका लढवय्याचा आहे. हा लढवय्या आपल्या जातीवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढला. पण प्रसंगी त्याच्या वाट्याला निराशा आली,तर कधी ज्यांच्यासाठी तो लढला तेच त्याच्या जीवावर उठले. मी बोलत आहे जेष्ठ साहित्यिक आणि थोर सामाजिक कार्यकर्ते, लेखक डॉ.भीमराव गस्ती यांचे आत्मचरित्र 'बेरड' या पुस्तकाविषयी. ही कथा आहे, बेरड जातीमध्ये जन्मलेल्या भीमराव गस्ती यांची आणि त्यांच्या शोषित आणि दुर्बल जातीवर होणाऱ्या अन्यायाची. त्यांच्या जातीतील लोकांना प्रतिष्ठा मिळावी, त्यांच्याकडे माणुसकीच्या नात्याने सर्वांनी बघावं म्हणून भीमराव गस्ती यांनी दिलेल्या लढ्याची,पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध पुकारलेल्या एकाकी लढ्याची आणि या लढ्यामध्ये त्यांना आलेल्या अनुभवांची. त्यांचे या प्रवासातील अनुभव,वाट्याला आलेल्या यातना या  पुस्तकाचं वाचन करताना वाचकाला अंतर्मुख करतात.

 

 बेरड या जातीला खूप जुना इतिहास आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवाई ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा या लोकांचा सहभाग होता. स्वामिनिष्ठ असणाऱ्या या जातीतील लोक, इंग्रज सरकारच्या अत्याचाराला, त्यांच्याकडून होणाऱ्या अतोनात छळाला कंटाळून हे लोक जंगलामध्ये वास्तव्यास आले. पोटाची भूक मिटवण्यासाठी हे लोक छोट्या छोट्या चोऱ्या करू लागले. पुढे त्यांच्याकडे चोर-दरोडेखोर म्हणूनच लोक बघू लागले.दारिद्र्याने होरपळलेल्या या लोकांच्या आयुष्याला पोलिसांकडून होणारे अत्याचार जन्मापासूनच लागले. हीच गोष्ट लेखकाच्या वाट्याला आली. शाळेत नेहमी कुठेही चोरी झाली की भीमराव गस्ती यांनाच शिक्षा व्हायची. त्यांच्यावर होणारे हे अत्याचार ते निमूटपणे सोसत होते. कधी हरामखोर तर कधी दरोडेखोर म्हणून त्यांना हिणवले जायचे.

 

हैद्राबादवरून उच्च शिक्षण पूर्ण करून परतलेले लेखक गस्ती यांच्या समोर एक घटना घडते. आपल्या जातीतील लोकांना कायम स्वरूपी काम मिळावे म्हणून ते आंदोलन करतात. आणि इथून त्यांच्या समाजकार्याची वाटचाल सुरु होते. बेरड लोकांची संघटना उभी करून आपल्या लोकांच्या हक्कासाठी ते संघर्ष करतात. एखादी संघटना उभी करणे,ती चालवणे, त्यासोबत आपल्या समाजाच्या मागण्या विविध परिषदांच्या मार्फत लोकांसमोर मांडणे हे काही सरळ सोपे काम नव्हते. पण लेखक डॉ.भीमराव गस्ती यांनी एकट्यानेहा सर्व संघर्ष केला. समाज्याच्या प्रत्येक स्तरावरून त्यांना विरोध झाला. हा विरोध अगदी त्यांच्या जातीतील लोकांनी सुद्धा केला. पण शिक्षणाने आणि थोर मंडळींच्या विचारांनी समृद्ध झालेले लेखक गस्ती यांनी विरोधाला विरोध कधीच केला नाही. त्यांनी नेहमी स्वतःचा वेगळा मार्ग शोधला आणि आपल्या समाजामध्ये जनजागृतीचे काम चालू ठेवले. त्यामध्ये प्रामुख्याने बेरड समाजातील लोकांना अंधश्रद्धा,रूढी परंपरायांच्या दलदलीतून बाहेर काढले,देवदासी प्रथा बंद व्हावी यासाठी सुद्धा त्यांनी चळवळ सुरू केली.

 

MSC Electronics शिक्षण झालेल्या लेखक डॉ. भीमराव गस्ती यांनी DRDO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून कामही केले होते. अशा या उच्चशिक्षित अवलियाने आपल्या बेरड समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. पण या सगळ्यात त्यांचे त्यांच्या घराकडे,आई-वडिलांकडे,संसाराकडे दुर्लक्ष झाले. त्यांना आलेले काही अनुभव वाचताना मन अक्षरशः पिळवटते. पोलिसांकडून झालेला छळ हा वाचकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि डोळ्यातून नकळत पाणी येते. पुस्तकाच्या शेवटी एका बेरड तरुणाच्या निर्घृण खुनाची कथा लेखकाने सांगितली आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी लेखकाने केलेला आटापिटा आणि त्यांना आलेले अनुभव वाचून मन सुन्न होते.

 

पुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशनने' केले आहे. राजहंस प्रकाशनाचे नाव घेताच वाचकाला आपोआपच पुस्तकाच्या उत्तम दर्जाची शाश्वती मिळते. वाचकांना उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून ते नेहमीच प्रयत्नशील असतात. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकांमधील चित्रे अनिल दाभाडे यांनी साकारलेली आहेत. एका संघर्षाची गाथा सांगणारे हे पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे पुस्तक साहित्यिक,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,लेखक डॉ. भीमराव गस्ती लिखित 'बेरड'.


No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.