Sunday, September 6, 2020

मुंबईमधील गिरण कामगारांच्या आयुष्याची झालेली फरफट,त्यांच्या आयुष्याची विदारक कहाणी सांगणारे पुस्तक

 



रिबोट

                                             लेखक - जी.के.ऐनापुरे

 

 मुंबई. या मायानगरीने किती तरी लोकांना वेडं केलं. ही मायानगरी तिच्याकडे येणाऱ्याला स्वप्न दाखवते, तिच्या चंदेरी लखलखीने भुरळ घालते. या चंदेरी-सोनेरी नगरीच्या मायेला भुलून,आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आलेला कधी कायमचा तिचा होऊन जातो ते त्याचे त्यालासुद्धा समजत नाही. मुंबईमध्ये ज्याने पाय ठेवला त्याने आपली स्वप्ने पूर्ण केली, मान-सन्मान मिळवला तर मुंबई त्याची नाही तर गाव नाही,घर नाही, मुंबई पण नाही. वाट्याला फक्त फरफट..... इकडून तिकडे तिकडून इकडे नुसती फरफट....

नमस्कार मित्रानो लेखक जी.के.ऐनापुरे लिखित 'रिबोट' ही कादंबरी घेऊन आज तुमच्या भेटीला आलो आहे. आत 'रिबोट' ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय याचा विचार तुम्ही करत असाल. काहींनी रिबोट या शब्दाचा अर्थ तांत्रिक भाषेतील re-start असाही  लावला असेल. पण मंडळी ते तसं नाहीये. लेखकाने रिबोट या शब्दाचा अर्थ कादंबरीच्या सुरवातीलाच दिला आहे. तो अर्थ वाचल्यावर आणि कादंबरी पूर्ण वाचून झाल्यावर रिबोट हे नाव या पुस्तकाला समर्पक का आहे हे समजून येते. कादंबरी एकदा वाचायला सुरवात केली की पूर्ण वाचल्याशिवायखाली ठेवता येत नाही. संपूर्ण वाचून झाल्यावर एक अनामीक विचारामध्ये गढून जायला होते.

२१९ पानाच्या या कादंबरीमध्ये गिरणगाव आणि बी.डी.डी चाळीच्या संस्कृती आणि तिथल्या विश्वाचे विदारक दृश्य लेखकाने मांडले आहे. संपाच्या निमित्ताने गिरण्यांचा झालेला अंत आणि त्यामध्ये भरडलेला गरीब कामगार वर्गाची व्यथा लेखकाने अत्यंत योग्य पद्धतीने मांडली आहे. गावाकडून मुंबईमध्ये पैसे कमवायला आणि सुखा-समाधानाचे आयुष्य जगायला आलेला कामगार वर्ग संपामुळे मोठंमोठ्या नेत्यांच्या आणि संघटनांच्या राजकारणाला आणि गिरणीमालकांच्या स्वार्थीपणाला बळी पडतो. यासर्व गोष्टींची मांडणी लेखकाने कथेमधील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून केली आहे. संपामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेले काही कामगार मुंबई सोडून आपल्या गावी गेले, पण काही लोकांना मुंबई इतकी मानवली की त्यांना ती सोडविशी वाटेना. मुंबईमध्ये ते असेच भटकत राहिले की त्यांचे गाव नाही.घर नाही.मुंबई पण नाही.मुंबई मधील गणपतीच्या सणाचे वर्णन लेखकाने केले आहे, त्यासोबतच गुन्हेगारीचे वर्णन आणि त्यामुळे कुटुंबांची झालेली वाताहत आणि चाळ संस्कृतीचे वर्णन वाचून मन सुन्न होऊन जाते. वाचणाऱ्याला पुस्तकाचा शेवट अत्यंत क्रूर, किळसवाणा वाटेल पण असा शेवट का व्हावा या विचारामध्ये वाचक नक्की हरवून जाईल. अत्यंत ह्रदयस्पर्शी अशी ही कादंबरी आहे.

पुस्तकाचे प्रकाशन शब्द पब्लिकेशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ बाळ ठाकूर यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावी आणि प्रत्येकाच्या संग्रही असावी अशी कादंबरी लेखक जी.के.ऐनापुरे लिखित रिबोट.

-         

        

       - श्रीजीवन तोंदले


No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.