Monday, September 5, 2022

गोष्ट एका नदी जगलेल्या नदीष्टची...............

 



नदीष्ट

 

                          लेखक - मनोज बोरगावकर.

 

 

माणसाचे आयुष्य हे चाकोरीबद्ध असते. नेहमीच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टीच माणसाचे  आयुष्य चालवत असतात. चाकोरीबद्ध झालेल्या जगण्यात एक प्रकारेच साचलेपण आलेले असते. याच साचलेपणाला दूर करण्यासाठी, या चाकोरीतुन बाहेर पडण्यासाठी आपण काही तरी वेगेळे करू पाहतो. आपल्या नेहमीच्या रुटिंग मधून थोडा वेगळं काढून आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करतो. उदा. गाणं गाणे, फिरायला जाणे, पोहणे, सायकलिंग करणे, नाटक-सिनेमा बघायला जाणे, ट्रॅकिंगला जाणे, पुस्तक वाचणे या आणि अशा किती तरी गोष्टी ज्याच्या माध्यमातून आपण मुक्त होत असतो. कोण याला छंद म्हणत असतो तर कोणी याला गरज म्हणत असतो. याच गोष्टी सतत करणाऱ्याला नादिष्ट सुद्धा म्हणतात. मी आज असेच एक पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. ज्याचा विषय असाच आहे. मी बोलत आहे नादिष्ट नाही तर नदीष्ट  मनोज बोरगावकर लिखित नदीष्ट या पुस्तकाबद्द्दल.

१६६ पानांच्या या पुस्तकाच्या सुरवातीलाच लेखक मनोज बोरगावकर हे नदीष्ट का आहेत, त्यांना हा पोहण्याचा नाद का आणि कसा लागला हे एका सुंदर उदाहरणाने ते सांगतात. म्हणजे नदी आणि आईचा गर्भ. आईच्या गर्भाच्याशी नदीच्या डोहाचे केले वर्णन मनाला स्पर्श करते. या एका संदर्भाने लेखक नदीसोबत किती जोडलेला आहे हे समजून येते. लेखक रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातील साचलेपण दूर करण्यासाठी नदीवर नियमितपणे पोहायला जात असतो. नदीमध्ये पोहणे त्याला समृद्ध करत असते. लेखकाचे विशेष कौतुक करावेसे वाटते, कारण नदीचे आणि नदीच्या किनाऱ्यावरील परिसराचे केलेले वर्णन मनाला स्पर्श करून करते. सतत वाहत असणाऱ्या नदीच्या किनाऱ्यानेच उदात्तपण आणि संस्कृती वसत गेली. पण आपण नदीपासून दुरावत गेलो आणि आपले उदात्तपणही हरवले गेले हे लेखकाचे मत आजच्या युगाला तंतोतंत जुळणारे आहे. लेखक गोदामाईच्या उदरातील आणि परिसरातील प्रत्येक गोष्ट नव्याने अनुभवतो आणि त्याच गोष्टी त्याला समृद्ध करत गेल्या. याच गोदामाईच्या किनाऱ्यावर लेखका काही व्यक्तीसुद्धा भेटल्या. नकळतपणे त्यासर्व व्यक्ती लेखकाच्या जीवनाचा एक भाग झाल्या. त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची एक करुण कथा ऐकत आणि त्यांचे आयुष्य समजावून घेत लेखक त्यांच्या सोबत नदी प्रमाणे वाहत राहिला.

तृतीयपंथी असणाऱ्या सगुणाच्या नशिबी आलेले भोग, तर नकळत केलेल्या चुकीच्या कृत्यामुळे प्रायश्चित म्हणून स्वीकारलेलं आयुष्य जगणारा भिकाजी यांच्या करुण कथा वाचून मन हळहळते. यासोबतच नदीत मासे पकडणारा बामणवाड, लहान वयापासूनच साप पकडणारा सर्पमित्र प्रसाद, लेखकाला ज्यांनी नदी कशी पार करावी आणि नदीच्या खोल डोहात कसे अलगत शिरावे याचे धडे देणारे दादाराव, नदी किनाऱ्यावरच्या सर्व गोष्टींची इतंभूत माहित ठेवणार कल्लुभाईया, मंदिरातील पुजारी जो लेखकाच्या मर्जीने नाही तर त्याच्या इच्छेवर नायकाला चहा देणारा, हे सर्व लोक नदीच्या निमित्याने लेखकाशी जोडले जातात. यासर्वांची गोष्ट लेखकाने वाचकांच्या समोर ठेवली आहे जी वाचकांना मोहित करते.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या नेहमीच्या रुटिंग मधून थोडा वेळ काढून स्वतःला समृद्ध करेल अशा काही गोष्टी केल्या पाहिजे. साचलेपणाने आयुष्य जगणे सोडून मुक्तपणे आयुष्याकडे पाहिले पाहिजे. मुक्तपणे आयुष्य जगले पाहिजे. आयुष्याकडे नव्या नजरेने बघत येईल. या पुस्तकाचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ नयन बाराहाते यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे आणि प्रत्येकाची संग्रही असावे असे हे पुस्तक  मनोज बोरगावकर लिखित नदीष्ट!

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.