Sunday, March 17, 2024

रोजच्या आयुष्यात वीज खेळवणारा वैज्ञानिक

 



निकोला टेस्ला

(रोजच्या आयुष्यात वीज खेळवणारा वैज्ञानिक)

 

                                      लेखक - सुधीर फाकटकर.

 

माणसाच्या दैनंदिन जीवनात पूर्वी तीन मूलभूत गरजा होत्या. अन्न, वस्त्र आणि निवारा. माणूस जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत गेला तसे त्याच्या गरजांमध्येही वाढ आणि बदल होत गेला; पण अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांमध्ये चौथी गरज वाढली आणि ती गरज खूपच महत्वाची झाली. ती गरज म्हणजे वीज. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विजेची इतकी सवय झाली आहे; की वीजेशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करताच येत नाही. वीज ही मानवाच्या वापरा मध्ये सहज सुलभ व्हावी म्हणून खूप शास्त्रज्ञांनी त्यामध्ये संशोधन केले. या विद्युत शक्तीचे दोन प्रकार पडतात ते म्हणजे ए.सी आणि डी.सी. घरगुती वापरासाठी, व्यावसायिक वापरासाठी जास्त करून ए.सी विद्युत शक्तीचा जास्त प्रमाणात वापर होतो. वाचक हो घाबरू नका मी काही इथे ती विद्युत शक्ती कशी निर्माण होते हे सांगणार नाही आहे. तर या ए.सी विद्युत शक्ती आणि विद्युत चुंबकीय लहरी यामध्ये होणारे बदल या विषयांमध्ये सखोल संशोधन करून तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या थोर वैज्ञानिक निकोला टेस्ला यांच्या बद्दल मी बोलत आहे. जी.एम.आर.टी खोदड वेधशाळेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून काम करणारे सुधीर फाकटकर लिखित निकोला टेस्ला हे चारित्र्य घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे.

१८६ पानांच्या या पुस्तकाची सुरवात निकोला टेस्ला यांच्या जन्मापासून होते. ऑस्ट्रिया-हंगेरी मधील गॅस्पिक मध्ये निकोला टेस्ला यांचा जन्म झाला. टेस्ला यांच्या जन्माची आगळीवेगळी कहाणी आहे. निकोलाची आई जॉर्जिया ही अशिक्षित होती पण निकोलाला तिच्या कडून व्यहारज्ञानाचे भरपुर शिक्षण मिळाले. वडील मिलुटीन चर्चमध्ये धर्मगुरूची नोकरी करायचे. निकोलावर लहानपणा पासून त्याच्या आईचा जास्त प्रभाव दिसून येतो. लहानपणा पासून हुशार असणारा निकोला शिक्षणात सुद्धा तितकाच हुशार होता. सुरवाती पासूनच हुशार असणाऱ्या निकोलला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात विशेष आवड होती. उच्च शिक्षणासाठी त्याने इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग मधून शिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील मिलुटीन यांच्याकडे वेगळाच हट्ट धरला. त्याचा तो हट्ट पूर्णही झाला. उच्च शिक्षण घेते वेळी हुशार असणाऱ्या निकोलाला अपयशाला तोंड द्यावे लागले. त्याची गाडी भरकटली ती पुन्हा परत मार्गावर यायला वेळ लागला पण या सर्वात त्याला आपल्या प्रिय व्यक्तीला गमवावे लागले. पुन्हा सापडलेल्या मार्गावर चालताना निकोला यांना खूप संघर्ष करावा लागला आणि याच संघर्षातून त्यांनी निर्माण केला यशाचा महामार्ग. रोजच्या आयुष्यात वीज खेळणाऱ्या या वैज्ञानिकाने संपूर्ण जग उजळून टाकण्यासाठी खूप मोठे योगदान दिले.

या सगळ्याची सुरवात न्यूयॉर्क मधून झाली.थोर संशोधक एडिसन यांच्या कंपनीत निकोला विद्युत अभियंता म्हणून काम करत होता. एडिसन यांनी निकोलासोबत एक वेगळीच चेष्टा केली. स्वाभिमानी असणारे निकोला यांनी एडिसन यांची कंपनी सोडली. ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. पुढे घडणाऱ्या प्रचंड मोठ्या इतिहासाची ती सुरवात होती. राखेतून पुन्हा भरारी घेणाऱ्या निकोला यांनी यशाचे उंच उंच शिखर पार केले. त्यांचा हा जीवनपट लेखकाने सुंदर पद्धतीने या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे.

लेखकाने फक्त निकोला यांचे चरित्र या पुस्तकामध्ये मांडले नसून, विद्युत शक्तीचा आरंभ, त्याचा इतिहास, चुंबकीय शक्ती या सर्व गोष्टींची माहिती लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून दिली आहे ज्यामुळे निकोला टेस्ला यांच्या कार्याची सखोल माहिती आपल्याला मिळते. माझे शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग मधून झाले असल्यामुळे मला हे पुस्तक विशेष भावले. ज्या गोष्टींचा मी विद्यार्थी दशेत अभ्यास केला होता त्यासर्वांची या पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा उजळणी झाली.

या पुस्तकाविषयी खूप बोलण्यासारखे आहे पण इथे मी थांबतो. सरतेशेवटी मी एवढच सांगेन की संपूर्ण जग उजळू टाकणारे निकोला टेस्ला ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य संशोधनासाठी झोकून दिले ते आम्हा सर्व अभियंत्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे राजहंस प्रकाशन यांनी. प्रत्येक अभियंत्याने, प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक. अभियंते सुधीर फाकटकर लिखित.....

निकोला टेस्ला

रोजच्या आयुष्यात वीज खेळवणारा वैज्ञानिक


4 comments:

  1. छान लिहिलय!
    अजिंक्य कुलकर्णी

    ReplyDelete
  2. छान लिहिलय!

    अजिंक्य कुलकर्णी

    ReplyDelete
  3. थोडकंच पण उत्तम 👌🏻👌🏻

    ReplyDelete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.