बाळूच्या अवस्थांतराची डायरी
लेखक - किरण गुरव
२०२१ चा साहित्य अकादमी पुरस्कार
प्राप्त कथा संग्रह. १४७ पानांच्या या कथासंग्रहामध्ये ३ कथा आहेत.
पहिली कथा आहे, बाळूच्या अवस्थांतराची डायरी.
दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास
होऊन, उच्चशिक्षणासाठी बाळूला होस्टेलला
सोडण्यासाठी गावाहून घरची सगळी मंडळी कोल्हापूरला येतात.
रंकाळ्याच्या एस.टी स्टॅन्ड पासून ते शासकीय अभियांत्रिकी
कॉलेजच्या हॉस्टल पर्यंतचा त्यांचा प्रवास या कथेमध्ये आहे.
बाळू हा या कथेचा केंद्र बिंदू आहे आणि
त्याच्या प्रथम पुरुषी निवेदनातून या प्रवासा दरम्यानच्या छोट्या-मोठ्या गोष्टी
तपशीला सह लेखकाने मांडल्या आहेत. ज्यामुळे कथा खूपच रंजक झाली आहे.
गावच्या वातावरणात वाढलेला बाळू, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शैक्षणिक प्रगती करत करत
आता महाविद्यालयीन शैक्षणिक जगात अवस्थांतरीत होताना बाळूचं काही तरी मागं राहून
गेलं आहे किंवा त्यानं काहीतरी कायमचं गमावलं आहे, यासर्वांचा प्रवास या कथेमध्ये आहे. या कथेचे वेगळेपण किंवा लेखक
किरण गुरव यांच्या कथांमध्ये, कथानुरूप आजू-बाजूच्या परिसराचे वर्णन, वातावरणातील बदल यासोबतच कथेतील पात्रांचे त्या परिसराशी, वातावरणाशी असलेली एकसंधता.
यामुळे कथा भन्नाट आणि वाचनीय होते.
या संग्रहातील दुसरी कथा आहे, इंदुकलर : चरित्र,काळ आणि निर्मिती यांची अन्वेषणकथा.
ही कथा इंदुलकर नामक काल्पनिक
व्यक्तीची आहे. प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे एक कथा
असते. त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आणि प्रत्येक प्रसंगानुरूप
त्याला वेगवेगळी माणसं भेटतात किंवा त्याच्या रोजच्या कार्यक्षेत्रात त्याचा
नेहमीच्या माणसांसोबत राबता असतो. याच घटकांची आणि घटनांची गुंफण त्याचे
आयुष्य कथेमध्ये रूपांतरित करतात. इंदुलकरांची कथा ही त्यांच्या
नेहमीच्या दिनचरीयेने सुरु होते. लेखनाने इंदुलकरांची कथा तीन
भागांमध्ये मांडली आहे. ऑफिसकथा, घरकुटुंबकथा आणि स्वप्नकथा. या कथा वास्तव आणि काल्पनिकतेची सरमिसळ
असणारी आहेत.
तिसरी कथा आहे, बाजार दि मार्केट. ही कथा विशेष मनाला भावली. याचे कारण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, गारगोटी, भोगावती, मुरगूड या ठिकाणचे होणारे आठवडी बाजार मी पाहिले आहेत. आजू-बाजूच्या खेड्यातील, पाडयावस्तीतील लोक या आठवडी बाजारावर खरेदीसाठी आणि विक्री साठी अवलंबून असतात. एका कोपऱ्यावरच्या मोऱ्यांच्या दुकानापासून या संपूर्ण बाजाराची मांडणी, तिथे घडणारे छोटे मोठे प्रसंग या कथेमध्ये मांडले आहेत. या आठवडी बाजाराचं इतंभूत वर्णन लेखकाने या कथेच्या माध्यमातून केलं आहे. ही कथा वाचतेवेळी निश्चितच वाचकाला त्याच्या गावातील आठवडी बाजार आठवेल यात शंखा नाही.
किरण गुरव यांची कादंबरी जुगाड असो वा
श्रीलिपी, राखीव सावल्यांचा खेळ या कथासंग्रहातील
कथा असोत या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी शब्दात व्यक्तीचे व्यक्तिचित्र ते
उभं करतात. सध्या सोप्प्या भाषेतलं त्याचं लिखाण
कायम वाचकांना भुरळ घालत आहे. माणसाच्या जगण्यातील प्रामाणिकपणाचे
नितळ प्रतिबिंब या कथा संग्रहातील तीनही कथांमध्ये लेखकाने मांडलेले दिसून येते.
या पुस्तकाचे प्रकाशन शब्द प्रकाशन
यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ रियेश पाटील यांनी
केले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि आपल्या संग्रही असावे असे हे कथा संग्रह, किरण गुरव लिखित बाळूच्या
अवस्थांतराची डायरी.
👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete