धूळमाती
लेखक - कृष्णात खोत
धन्य आहेत ते लोक ज्यांची आपल्या मातीशी नाळ
जोडलेली असते. या लोकांमध्ये येतात ते आपले शेतकरी बांधव. शेतकऱ्याचे त्याच्या या
मातीवर,त्यांच्या या काळ्या आईवर आदिम प्रेम असते. माणसापेक्षा मातीला खूप जाण
असते हे शेतकऱ्याला माहिती असतं. आपल्या जमिनीमध्ये उगवणाऱ्या पिकाचा,त्याच्या अवती-भोवती वाढणाऱ्या झाडांचा एवढेच काय तर त्याच्या जमिनीमध्ये
उगवणाऱ्या प्रत्येक तणाची माहिती त्याला असते. उगाचच का त्यांना 'काळ्या
आईची लेकर','भूमीपुत्र' म्हणतात. आता ती
जमीन त्याच्या स्वतःची असो वा फाळ्याने त्याने
कोणाची तरी जमीन घेतली असेल. (फाळ्याने
जमीन घेणे म्हणजे दुसऱ्याच्या जमिनीवर
शेती करायची आणि ठरल्या प्रमाणे त्यामधून येणारे उत्पन्न वाटून घ्यायचे.)
नमस्कार मित्रहो, आज असच एक पुस्तक
घेऊन आलॊ आहे,जे सांगेल
की शेतकऱ्याचं आणि त्याच्या जमिनीचे नाते किती घट्ट असते. ते पुस्तक म्हणजे आमच्या कोल्हापूरचे लेखक
कृष्णात खोत यांनी लिहिलेली कादंबरी 'धूळमाती'. लेखक
कृष्णात खोत यांची 'गावठाण'ही कादंबरी खूप लोकप्रिय आहे. त्याच तोडीचीही कथा,गावच्या मातीला
तिथल्या परिसराला जवळून स्पर्श करणारी. कथेचा नायक राजू त्याचे वडील,आई,मोठा भाऊ आणि गावातील
इतर व्यक्ती यांच्या मध्ये घडणारी कथा पन्हाळ्याच्या परिसरातील आहे. नायकाच्या वडिलांनी गावातील एका जमीनदाराची जमीन फाळ्याने घेतलेली असते. या
जमिनीशी त्याच्या वडिलांचे आणि त्याच्या कुटुंबाचे नाते जणू आपल्या घरचाच एक भाग आहे असे असते. आपल्या
शहरामधील प्रत्येक भागाला एक विशिष्ट नाव असते. हे नाव एखाद्या थोर व्यक्तीचे असते
किंवा एक विशिष्ट नाव. पण थोडं यापेक्षा वेगळा प्रकार गावाकडे असतो. तिथे असणाऱ्या
जमिनींना आणि भागांना नावे हे तिथे असणाऱ्या झाडांवरून किंवा तिथे असलेल्या
नागाच्या वारुळावरून किंवा त्या जमिनीमध्ये एखाद्या देवाची मूर्ती सापडलेली असेल
तर त्या देवाच्या नावावरून त्या जमिनीला नाव असते.तसेच या पुस्तकाची गोष्ट ज्या
जमिनीवर आधारित आहे त्या जमिनीचे नाव 'नारगुंडीचा माळ' असे
असते. आता हेच नाव का?याची कथाही लेखकाने
उत्तम प्रकारे मांडली आहे. तर ह्या जमिनीचा मालक ती
विकण्याचा विचार करत असतो. गावाकडे अशी प्रथा आहे की जो ही जमीन करत असतो त्याला
ती विकत घेण्याविषयी विचारावे लागते. मग
पुढे या जमिनीचा व्यवहार होते वेळी जो प्रकार घडतो ते वाचल्यावर मन सुन्न होऊन
जाते. शेतकऱ्याचे त्याच्या जमिनीशी किती घट्ट नातं आहे हे या पुस्तकामधून कळून
येते.
१०६ पानांच्या या पुस्तकाची भाषा कोल्हापूरची आहे. त्यामुळे ग्रामीण
भागातील वाचकाला हे विशेष आवडेल आणि शहरी भागातील वाचक या पुस्तकाकडे ओढला जाईल. कोल्हापूरच्या लोकांची एक विशेष
गोष्ट आहे, ती म्हणजे एखादी गोष्ट सांगतेवेळी त्या गोष्टीला धरून एखादा जुना प्रसंग
सांगणे. आणि तसाच प्रकार या पुस्तकामध्ये आहे त्यामुळे वाचनामध्ये रंजकता येते.
मला हे पुस्तक विशेष भावले कारण या कथेचा नायक राजू याच्या वडिलांचे असणारे
निसर्गाशी नाते,जमिनीशी असणारी त्यांची नाळ,प्रांण्यांसोबतची
मैत्री आणि संपूर्ण घराला एकत्र धरून ठेवण्याची कसब. शेतीमधील इतंभूत ज्ञान
ज्याच्या जोरावर कितीही निकृष्ठ जमीन असो ती कसून तिला सुपीक बनवण्याचा चमत्कार त्यांच्या अंगी असतो. त्यांनी लहानपणापासून जी जमीन कसली आणि सुपीक बनवली ती जमिनी
जेव्हा विकत घेण्याची वेळ आली,त्यासाठी त्यांनी केलेली
धडपड वाचल्यावर समजून येते की एका शेतकऱ्यासाठी त्याची जमीन किती मोलाची
आहे. पुस्तकांमधील अजून एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावी अशी आहे,ती म्हणजे
वाक्यांच्या मध्ये मध्ये येणाऱ्या कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये वापरल्या
जाणाऱ्या म्हणी. त्यामुळे वाचनामध्ये ग्रामीण स्पर्श जाणवतो.
पुस्तकाचे प्रकाशन 'मौज प्रकाशन' यांनी केले
आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकांमधील चित्रे बाळ ठाकूर यांनी साकारली आहेत.
पुस्तकांमधील या चित्रांमुळे प्रत्येक प्रसंग जिवंत वाटतो. प्रत्येक वाचकाच्या
संग्रही असावे असे हे पुस्तक. प्रत्येकाने जरूर वाचावे लेखक कृष्णात खोत लिखित 'धूळमाती.'
श्रीजीवन तोंदले
No comments:
Post a Comment
धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.