Sunday, July 12, 2020

विस्थापितांच्या जगण्यामरण्याचं रिंगाण




रिंगाण

                    

                            लेखक - कृष्णात खोत

 

 

विकास. विकास होणं म्हणजे नेम काय ? म्हणजे तुमची विकासाची व्याख्या काय आहे ? कधी करून बघितली आहे तुम्ही ? आधीच्या काळी मानवाला अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गोष्टी मिळाल्या म्हणजे झाला विकास असं होतं. पण कालानुरूप वातावरणामध्ये, निसर्गामध्ये जसे बदल होत गेले त्यापेक्षा जास्त माणसाच्या गरजांमध्ये झपाट्याने बदल होत गेले. अन्न,वस्त्र,निवारा या गोष्टींच्या पुढे जाऊन माणसाच्या गरजा वाढत गेल्या. आत्ताच्या काळामध्ये अन्न,वस्त्र,निवारा यांच्या पुढे जाऊन माणसाच्या गरजा वाढल्या त्या म्हणजे वीज,पाणी,इंधन,मोबाईल,इंटरनेट,wifi ह्या आणि अजून किती तरी. बर या गोष्टी आपल्याला मिळाल्या म्हणजे झाला आपला विकास हो ना.....? पण कधी आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं आहे का, की विकास हा कोणाच्या तरी छाताडावर पाय देऊनच झालेला असतो..?

आपण गाव-शहरात  राहणारी माणसं वर नमूद केलेल्या गोष्टी या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या मिळाल्या की झाला आपला विकास असं समजत असतो. आपल्या मोबाईलचं चार्जिंग उतरू नये, आपल इंटरनेट बंद पडू नये म्हणून आपल्याला वीज हवी आहे  आणि ती पण  without load shedding, आपली शेती सतत फुलत राहावी म्हणून आपल्याला पाणी हवं ते पण मुबलक. लोकसंख्या वाढली त्यासोबत माणसाला राहण्यासाठी घर हवे ते पण मस्त आणि टुमदार, त्यासाठी आपण आपल्या अवतीभोवतीच्या जमिनीवर ताबा घेतला, पण या पुढे जाऊन, आपली भूक भागली नाही म्हणून आपण आपला मोर्चा जंगलांकडे वळवला. डोंगर-कपाऱ्या,दऱ्या-खोऱ्यात,जंगलांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांना आपण सोडलं नाही त्यांच्या घरात आपण घुसलो, त्या जंगली प्राण्यांसोबत,निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या माणसांनापण आपण सोडलं नाही. आपल्या विकासासाठी त्यांच्यासुद्धा छाताडावर पाय दिला आणि त्यांच्या आयुष्याची कायमची होरपळ केली. विकासासाठी धरण बांधले आणि या लोकांना आपण त्यांच्या हक्काच्या घरातून पळवून लावलं....आपल्या विकासासाठी ज्यांच्या आयुष्याची ससेहोलपट आपण केली ती माणसे आज कुठे आहेत याचा शोध घेतला आपण...?त्यांचं दुःख जाणून घेतलं आपण....?

 नमस्कार मंडळी, आज जे पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे, ते वाचल्यावर एखाद्याला आपलं गाव आणि त्याच्या भोवतालचा परिसर किती महत्वाचा आहे हे समजेल. त्यासोबतच पाण्याच्या एका थेंबाचे महत्वसुद्धा समजेल. आपल्याला मिळालेल्या पाण्यामध्ये,विजेमध्ये किती लोकांचे जीव,आयुष्य होरपळलेले आहेत याची जाणीव होईल. मी बोलत आहे लेखक कृष्णात खोत लिखित 'रिंगाण' या पुस्तकाविषयी. विकासाच्या नावावर उभारलेल्या धरणापायी जे धरणग्रस्त बांधव कायमचे विस्थापित झाले, त्या विस्थापितांच्या आयुष्यावर पुस्तकाची कथा आहे. पुस्तकामध्ये या विस्थापितांच्या पदरी आलेलं दुःख लेखक कृष्णात खोत यांनी अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडले आहे. सरकारने पुनर्वसनाच्या नावाखाली या लोकांना त्यांच्या लोकांपासून वेगळं करून, जणू त्यांचे तुकडे केले आणि वेगवेगळ्या गावामध्ये फेकून दिले. या विस्थापित लोकांना त्या गावातील लोकांनी कधीच आपलं म्हंटल नाही, त्यांना नेहमी उचले म्हणून हिणवलं, तर कधी त्यांच्या पोरी-बाळींवर वाईट नजर ठेवली,वढंच काय तर त्यांचं मेलेलं मढसुद्धा त्यांच्या स्मशानामध्ये जाळू दिलं नाही. या आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या विस्थापितांच्या वाट्याला आल्या त्यासर्व गोष्टी लेखकाने पुस्तकामध्ये मांडल्या आहेत. जे वाचून प्रत्येक ओळीवर,प्रत्येक पानावर वाचकाचे मन अक्षरशः हळहळते. १६३ पानाच्या या पुस्तकाच्या कथेचा नायक देवप्पा. हा पण एक विस्थापितच पण सरकारने जेव्हा गाव सोडायला भाग पडले तेव्हा गाव सोडते वेळी त्याने त्याची म्हैस (मुदिवाली) बिनकामाची म्हणून तिथेच सोडून दिली. त्या म्हशीच्या आठवणीने तो तिला परत आणण्यासाठी त्याच्या गावी जातो. म्हशीच्या शोधात देवप्पा आपल्या गावी,त्या जंगलात पोहचतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देतो. त्याच्या त्यासर्व आठवणी,त्याच्या गावाचा परिसर, ते जंगल, तिथल्या निसर्गाच्या, प्राण्यांच्या गोष्टी लेखक कृष्णात खोत यांनी खूप छान प्रकारे मांडल्या आहेत. ज्यामुळे वाचक पुस्तकाकडे आकर्षित होतो. पुस्तकाची भाषा ग्रामीण आहे. या ग्रामीण स्पर्शामुळे लेखकाचे त्याच्या मातीशी किती घट्ट नातं आहे हे समजून येते. आपली सोडून दिलेली म्हैस परत आणायला गेलेला देवप्पा, म्हैस पकडण्याच्या नादात एका वेगळ्याच प्रकाराला सामोरा जातो. आणि तो प्रकार वाचल्यावर मनाला अत्यंत वेदना होतात. हे पूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.

पुस्तकाचे प्रकाशन 'शब्द पब्लिकेशन' यांनी केले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असणारी म्हैस वाचकाचे लक्ष वेधून घेते. असे हे मुखपृष्ठ सरदार जाधव यांनी साकारले आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे आणि प्रत्येक वाचकाने वाचावे असेहे पुस्तक लेखक कृष्णात खोत लिखित 'रिंगाण'.

 

 

श्रीजीवन तोंदले

 


No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.