Sunday, February 7, 2021

मराठी सिनेसृष्टीतील ज्युबिली स्टार ज्यांनी सलग नऊ चित्रपट हिट देऊन Guinness Book of World मध्ये आपल्या नावाची नोंद करणारे दादा कोंडके.

 



एकटा जीव

                                         - दादा कोंडके

                                                          शब्दांकन : अनिता पाध्ये.

 

आपल्या सामाजामध्ये काही अशा असामान्य व्यक्ती होऊन गेल्या आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या अखंड इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यांचे हे व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावी करतं,त्याच्या जडण-घडणीच्या प्रवासातून आपल्याला आपल्या जगण्याचा मार्ग मिळतो. अशाच काही प्रभावशाली व्यक्तींच्या आत्मचरित्राची मालिका आम्ही आमच्या 'पुस्तकएक्सप्रेस' या ब्लॉगवर घेऊन आलो त्याच मालिकेतले दुसरे पुस्तक  तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत

आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये असे काही अवलिया कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाने, आपल्या दिग्दर्शनाच्या जोरावर रसिकांचे मन जिंकले. रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. मराठी सिनेसृष्टीतील पहिले सुपर स्टार ज्यांनी सलग नऊ चित्रपट हिट देऊन Guinness Book of World मध्ये आपल्या नावाची नोंद केली. अशाच  हरहुन्नरी कलाकाराचा प्रवास सांगणारे पुस्तक; अभिनेता,लेखक,दिग्दर्शक दादा कोंडके यांचे आत्मचरित्र 'एकटा जीव' हे पुस्तक घेऊन आम्ही आपल्या भेटीला आलो आहे. ३९४ पानाच्या या पुस्तकामध्ये दादांच्या विनोदी अभिनेता,यशस्वी दिग्दर्शक,यशस्वी चित्रपट निर्माता या प्रवासाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी वाचायला मिळतात.

कृष्णा खंडेराव कोंडके. जन्म १९२८. खंडेराव कोंडके यांच्या घरी जन्मलेलं हे अपत्य पुढे जाऊन मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये एक मागून एक हिट सिनेमे करेल असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं. कारण जन्मापासून जगण्याचा संघर्ष दादांच्या नशिबाला चिकटला तो शेवट पर्यंत सोबत राहिला. लहानपणापासून दादा अतिशय खोडकर आणि दंगेखोर. त्यांच्या या गुणाने ते आपल्या आईला सतत भंडावून सोडत. सतत बडबड्या आणि विनोदी स्वभावामुळे दादांची मित्र मंडळी सतत वाढती असायची.  मुंबईमधील भोईवाडा परिसरात दादा लहानाचे मोठे झाले. पुढे आई-वडिलांचे छत्र हरवल्यावर दादा मुंबईत एकटे राहू लागले. अनधिकृत दारू विक्री,दूध चोरणे या पासून ते मारामारी करणे असे आणि किती तरी उद्योग दादांनी केले. पुढे सेवादलात काम करू लागले. सेवादलामध्ये गाणी म्हणणे,कलापथकामध्ये दादांनी त्याच्या तरुणपणात काम केलं. पुढे सेवादलातून बाहेर पडून स्वतःची दादा कोंडके आणि पार्टी सुरु करून.  "विच्छा माझी पुरी करा" या लोकनाट्याद्वारे दादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजू लागले.

विच्छा च्या माध्यमातून दादांची खूप लोकांशी ओळख झाली, त्यामध्ये एक नाव आवर्जून घेतल पाहिजे ते म्हणजे आशा भोसले यांचं. पुढे आशाबाईंनी दादांची ओळख भालजी पेंढारकर यांच्याशी करून दिली. बाबांनी  "तांबडी माती" मध्ये दादांना संधी दिली. तिथून त्यांचा सिनेमा क्षेत्रातला प्रवास सुरु झाला. म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी असते,तसंच तांबडी माती हा सिनेमा दादांच्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी होता ज्याला यश मिळाले नाही. या अपयशाने खचलेल्या दादांना आधार दिला तो त्यांचे गुरु बाबा (भालजी पेंढारकर) यांनी. बाबांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी फक्त सिनेमेच बनवले नाही तर संपूर्ण सिनेमा तंत्र दादांना शिकायला मिळाले. भालजी पेंढारकर दादांना आपला मुलगा मानत. हे बाप मुलाचं नातं इतकं मोठं होतं की बाबा दादांना स्वतः सोबत घेऊन एका ताटात जेवण करत. या पुस्तकामध्ये दादांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमाची जडण-घडण कशी झाली हे लिहिले आहे यामुळे त्यावेळच्या मराठी सिनेमाची आणि सिनेमा तंत्राची माहिती मिळते. या क्षेत्रामध्ये दादांच्या जवळ आलेल्या प्रत्येक व्यक्ती विषयी दादांनी लिहिले आहे. यासर्वांमध्ये आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे शिवसेनाप्रमुख ,हिंदूह्रदय सम्राट, कै. बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांसोबत असलेलं घट्ट नातं दादांनी या पुस्तकाच्या माध्यमातून उलघडले आहे. काही व्यक्तींविषयी दादांनी परखडपणे आपले मत व्यक्त केले आहे.  असो. दादांचे प्रत्येक सिनेमे जसे भन्नाट विनोदी होते तसेच त्यांचे हे आत्मचरित्र एकदा वाचायला सुरु केलं की ते एका बैठकीत पूर्ण करावेसे वाटते. सेन्सॉर बोर्ड विषयी दादांनी केलेलं लिखाण वाचतेवेळी हसून हसून पोटात दुखत. सेन्सॉर बोर्डला दादा 'शेंसार बोर्ड' म्हणतात. सिनेमा व्यतिरिक्त दादांनी त्यांच्या शिकारीच्या आवडीविषयीसुद्धा सांगितले आहे. शिकारीमधील गंमती जमती,थरारक अनुभव दादांनी पुस्तकामध्ये मांडले आहेत.

जस जसे आपण पुस्तकांच्या शेवटाकडे येतो तसतस पुस्तकाच्या सुरवातीला दादांनी या पुस्तकाचे शीर्षक 'एकटा जीव' हे का निवडले हे समजून येते. दादांच्या स्वभावाचा त्यांच्या जवळच्या लोकांनी खूप फायदा घेतला. आई-वडील,काका-काकूयांचे छत्र हरवल्यावर दादा एकटे पडले,पोरके झाले ते आयुष्याच्या अखेरी पर्यंत एकटेच राहिले.....

पुस्तकांमध्ये दादांच्या कार्यकाळामधील काही छायाचित्रे दिली आहेत. पुस्तकाच्या शेवटी दादांनी केलेल्या प्रत्येक सिनेमाची माहिती दिली आहे. मराठी सिनेमा क्षेत्रातील एक अवलिया तारा दादा कोंडके याचे हे आत्मचरित्र्य सर्वांना जगण्याची,संघर्ष करण्याची दिशा दाखवेल यात शंकाच नाही. पुस्तकाचे प्रकाशन 'मंजुळ पब्लिकेशन हाऊस' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अक्षर कमल शेडगे यांनी केले आहे. मराठी,हिंदी,इंग्रजी वृत्तपत्रे,मासिकांमधून लेख लिहिणाऱ्या लेखिका अनिता पाध्ये यांनी या पुस्तकाचे शब्दांकन उत्तम प्रकारे केले आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला त्यांनी त्यांची दादांसोबत झालेली ओळख आणि हे पुस्तक लिहिण्याची सुरूवात कशी झाली हे सांगितले आहे.  या पुस्तकाच्या आत्तापर्यंत १० आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. प्रत्येकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे एका लोकप्रिय व्यक्तीचे आयुष्य सांगणारे लोकप्रिय पुस्तक पुस्तक 'एकटा जीव'.  


2 comments:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.