शीतयुद्ध सदानंद
लेखक - श्याम मनोहर
'शीतयुद्ध' हा शब्द ऐकला की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्धाची आठवण येते. 'शीत' या शब्दापेक्षा त्याची दाहकता कितीतरी पटीने जास्त होती, हे आपण इतिहासामध्ये वाचलंच आहे.भयंकर दाहकता असणाऱ्या त्या शीतयुद्धापेक्षा विनोदी आणि प्रत्येक वळणावर उत्सुकता वाढवणारं एक शीतयुद्ध माझ्या वाचनात आले आहे. आता मंडळी तुम्ही म्हणाल युद्ध आणि त्यातही शीतयुद्ध आणि ते ही विनोदी हे कसं काय ? तर मी बोलत आहे, लेखक श्याम मनोहर लिखित 'शीतयुद्ध सदानंद' या पुस्तकाविषयी. मूळ मराठी भाषेमध्ये असणाऱ्या या कादंबरीचा कन्नड अनुवाद झाला आहे. यासोबतच या कादंबरीवर आधारीत मराठी नाटक आणि एक मराठी सिनेमा सुद्धा प्रदर्शित झाला आहे. 'मनुष्य प्राणी' हा वरून जसा दिसतो तसा तो त्याच्या आतूनही असतो असं नसतं. त्याच्या वागण्यामध्ये आणि विचारांमध्ये फरक असतोच. मानवी मनामध्ये चाललेल्या युद्धाचे वर्णन या पुस्तकामध्ये दिसून येते.
१२२ पानांच्या या पुस्तकाची कथा
एखाद्या पुराणकथेला शोभेल अशी आहे. कथेचा नायक 'सदानंद' हा त्याच्या स्कूटरने जात असतो आणि
रस्त्याने जाणारी छोट्या बाळाची प्रेतयात्रा त्याला आडवी येते. स्कूटरवरचा त्याचा
कंट्रोल सुटतो आणि छोट्या बाळाच्या प्रेताला धक्का लागून ते प्रेत रस्त्यावर
पडते.प्रेतयात्रेमध्ये असणारे दोन पैलवान श्रीरंग आणि गोविंद हे दोघे बाळाचं प्रेत
पडलं म्हणून चिडतात आणि सदानंदला शिक्षा द्यायची असं ठरवतात. आणि इथून कथेला
सुरुवात होते. पुढे कशा प्रकारे सदानंदला
ते दोघे शिक्षा करता हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.
सदानंद-श्रीरंग-गोविंद या तिघांमध्ये
चालणारे हे शीतयुद्ध वाचते वेळी एक धमाल आनंद येतो. कारण हे शीतयुद्ध जस जसे पुढे
जाईल तसे वाचकाच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते. सदानंद याला शिक्षा
करण्यासाठी श्रीरंग आणि गोविंद कोणकोणते उपाय शोधतात आणि त्यांच्या पासून स्वतःला
वाचवण्यासाठी सदानंद कायकाय शकला लढवतो यावरून आपल्याला हे समजून येते की
माणूस वरून कितीही चांगला,नैतिकतेने वागण्याचा प्रयत्न करत असला
तरी तो आतून किती अनैतिक किंवा त्याच्या अंतर्मनात सुरू असणारे विचार हे किती
कल्पनेच्या पुढचे आणि धक्कादाक असतात हे
लेखक श्याम मनोहर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे मांडले
आहे.पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे कथेची सुरुवात आणि कथेमधील व्यक्तिरेखांचा होणारा
परिचय. सदानंदला त्याचे शेजारी या प्रकरणामध्ये खूप मदत करतात. मदत करतेवेळी
त्यांच्या मनामध्ये सुरु असणारा कल्लोळ वाचनामध्ये रंजकता निर्माण करतात.
या पुस्तकाच्या माध्यमातून एक गोष्ट
प्रकर्षाने समजून येते ती म्हणजे कधी कोणाच्या कशा भावना दुखावल्या जातील हे
सांगता येत नाही. सध्याच्या जगामध्ये आज-काल कोणाच्या कशावरून भावना दुखावल्या जातात हे आपण व्यावहारिक जीवनात
पाहत असतोच. त्यामुळे आपल्याला बोलताना,
चालताना, लिहिताना,
समाजामध्ये वावरत असताना या गोष्टीचे
सतत भान ठेवले पाहिजे की आपल्या एखाद्या कृतीने कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ
नयेत. नाही तर सदानंदच्या मागे जसे श्रीरंग-गोविंद लागले तसे आपल्या मागे न लागोत
एवढंच....
पुस्तकांचे प्रकाशन 'पॉप्युलर प्रकाशन'
यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ हे
पुस्तकाच्या कथेला समरूप आहे. माणसाच्या मूळ वर्तनामागे असलेल्या त्याच्या
आंतरक्रियेमध्ये चालले आणि होणारे बदल हे किती विदारक असतात हे जाणून घेण्यासाठी
हे भन्नाट असे पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचलेच पाहिजे. प्रत्येक वाचकाच्या संग्रही
असावे असे हे पुस्तक लेखक श्याम मनोहर लिखित 'शीतयुद्ध सदानंद'.
कन्नड मध्ये अनुवाद कोनी केला आहे
ReplyDeleteआणि
कन्नड मधील कादंबरीचे नाव काय आहे🤔