Sunday, October 17, 2021

नैतिक आयुष्याला पडलेला आणि न सांधता येणार तडा....

तडा

 

                                 लेखक - डॉ. एस.एल.भैरप्पा.

मराठी अनुवाद लेखिका -  सौ.उमा.वि.कुलकर्णी.

 

 

एकदा का काचेच्या भांड्याला तडा गेला, तर तो परत सांधता येत नाही. तसेच मनुष्याच्या नैतिक आयुष्याला एकदा का तडा गेला, मग तो त्याच्या अजाणतेपणी असो वा जाणतेपणी तो परत सांधता येत नाही. स्वतःचे आयुष्य  मुक्त आणि स्वतंत्रपणे जगाता यावे यासाठी तो कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो यामध्ये तो स्वतःची वाताहत करून घेतोच पण दुर्दैवाने त्याच्या सोबत असणाऱ्यांची सुद्धा फरपट होत असते. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्याला याची जाणीव सर्वात शेवटी होते. याच मानसिकतेची एक विदारक कहाणी सांगणारे पुस्तक घेऊन मी आलो आहे. मंडळी मी बोलत आहे लेखक डॉ.एस.एल.भैरप्पा लिखित 'तडा' या कादंबरीविषयी.

२८६ पानांच्या या कादंबरीची मूळ भाषा कन्नड आहे आणि त्याचा मराठी अनुवाद लेखिका सौ.उमा.वि.कुलकर्णी यांनी केला आहे. पुस्तकाचे कथानक जयकुमार-मंगला आणि ईला-विनय या व्यक्तिरेखांवर आधारित आहे. जयकुमार हा एक व्यावसायिक आहे त्याची मध्यम आकाराची कंपनी आहे. जयकुमार आणि त्याची पत्नी वैजयंती या दोघांनी मिळून ही कंपनी उभारलेली असते. पुढे एका अपघातामध्ये वैजयंतीचा मृत्यू होतो आणि जयकुमार एकटा पडतो. पत्नीच्या मृत्यूनंतर काही वर्षाने जयकुमार त्याच्या ऑफिसमधील त्याची पी.ए मंगलाकडे ओढला जातो. वैवाहिक जीवनातील शरीर सुख त्याला मंगलाकडून मिळू लागते. पण पुढे जाऊन त्याच्या हातून एक चुकीची गोष्ट घडते ज्याने त्याच्या संपूर्ण आयुष्याला तडा जातो.

 मंगला ही एक कर्तृत्वान स्त्री जी तिच्या महाविद्यालयीन जीवनापासून स्वतःच्या पायावर उभी राहून शिक्षण पूर्ण करून  जगणारी स्वावलंबी स्त्री.  पण सुरवातीच्या काळामध्ये ती अशा काही लोकांच्या आहारी जाते आणि तिथून तिच्या नैतिक आयुष्याला तडा जातो जो तिच्या संपूर्ण आयुष्यात तिला परत सांधता येत नाही आणि ती त्यामध्येच अडकून पडते.

 दुसरी कथा आहे ती विनय आणि ईला यांची. विनय हा एका मोठ्या कंपनी मध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहे. साधं सरळ आयुष्य जगणाऱ्या विनयला नोकरीमध्ये  बढती मिळून तो दिल्लीला निघून जातो.आपल्या होणाऱ्या प्रगतीमध्ये आपल्यासोबत आपल्या पत्नीने इलाने यावे अशी त्याची इच्छा असते पण सुरवातीपासून स्वतंत्र आणि मुक्त रहाणारी, पाश्चात्य संस्कृतीची ओढ असणारी आणि प्रचंड आणि फुटकळ स्त्रीवादीपणा मिरवणारी ईला पती सोबत जाण्यास नकार देते. दोघांचे वैवाहिक जीवन दुरावते आणि इथे त्यांच्या संसाराला तडा जातो आणि तो कधीच परत सांधला जात नाही.

 आपल्या देशामध्ये बायकांसाठी कायदाचे झुकते माप आहे. याच गोष्टीचा गैरफायदा आपल्या समाजामधील काही लोकं, संघटना स्वतःच्या फायद्यासाठी किंवा एखाद्याला कायमची अद्दल घडवण्यासाठी कायद्याचा स्वतःच्या सोयीने वापर करतात. या पुस्तकातील दोन्ही गोष्टींमधून समजून येते की याच कायदाचा कशा पद्धतीने चुकीचा वापर झालेला आहे. स्त्रीवादी म्हणून मिरवणाऱ्या आणि स्त्री चळवळीच्या नावाखाली समस्त पुरुष जात वाईट आहे आणि त्यांनी नेहमी स्त्रियांवर अन्याय केला आहे या गैरसमजाखाली वावरणाऱ्या काही व्यक्तिरेखा या पुस्तकामध्ये आहेत. कथेमधील नायक जयकुमार हा अशाच संघटनांना बळी पडतो. त्याची झालेली वाताहत वाचून मन सुन्न होते. सरते शेवटी त्याच्या या अवस्थेला सर्वस्वी तोच जबाबदार आहे हे वाचकाला समजून येते.

पुस्तकाच्या शेवटी शेवटी मूळ कथेमध्ये काही अन्य कथा मिसळल्या आहेत ज्यामुळे वाचनात थोडासा रसभंग होतो. बाकी पुस्तकामधील मूळ दोन कथा या एकमेकांसोबत जोडल्या आहेत हे पुस्तकाच्या शेवटी समजून येते. या पुस्तकाची कथा ही वाचकालाच नव्हे तर सर्वाना बोध देणारी आहे. कितीही स्वतंत्र आणि मुक्त आयुष्य जगायचे असेल तरी सर्व प्रथम त्या स्वातंत्र्याचा, त्या मुक्तीचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि एखाद्या गोष्ठीची चटक लागली तर त्यावर स्वतःला आवर घालता आला पाहिजे. या गोष्टी जर आपल्याला जमल्या नाहीत तर आपल्या नैतिक आयुष्याला तडा जाणे साहजिक आहे. आणि  एकदा का तडा गेला की तो.......

पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. या सुंदर पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखिका सौ.उमा.वि.कुलकर्णी यांनी अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये केला आहे. पुस्तक वाचतेवेळी वाचकाला कुठेही हे अनुवादित पुस्तक आहे याचा भास किंवा जाणीव होत नाही.  प्रत्येक अभ्यासू वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक डॉ.एस.एल.भैरप्पा लिखित 'तडा'. पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. या सुंदर पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखिका सौ.उमा.वि.कुलकर्णी यांनी अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये केला आहे. पुस्तक वाचतेवेळी वाचकाला कुठेही हे अनुवादित पुस्तक आहे याचा भास किंवा जाणीव होत नाही.  प्रत्येक अभ्यासू वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक डॉ.एस.एल.भैरप्पा लिखित तडा.


 

1 comment:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.