Sunday, October 3, 2021

तिसरा डुळा, मानवी समाजातील अप्रकाशित लोकांवर प्रकाश टाकणारा....





तिसरा डुळा

 

लेखक - किरण येले  

           

 खूप दिवसांनंतर एक भन्नाट असा कथा संग्रह वाचायला मिळाला. या कथा संग्रहामधील प्रत्येक कथा सुरस आहे. विशेष कौतुक म्हणजे लेखकाच्या भोवती घडणाऱ्या घटनांचे, त्याच्या आयुष्यामध्ये आलेल्या व्यक्तींचे बारीक निरीक्षण करून त्या सर्वांना कथेच्या स्वपरुपामध्ये एकत्र आणून त्याची उत्तम मोट बांधली आहे. या आधी लेखकाने लिहिलेला कविता संग्रह वाचला होता, अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये मांडणी केली असली तरी प्रत्येक ओळ ही काळजाला भिडणारी. मंडळी मी बोलत आहे, कवीकथाकारनाटककार किरण येले यांच्याबद्दल. त्यांनी लिखाणबद्ध केलेला कथासंग्रह 'तिसरा डुळा' या कथासंग्रहाबद्दल आज मी लिहिणार आहे.

१९२ पानांच्या या कथा संग्रहामध्ये ७ कथा आहेत. ज्या survival of fittest या सृष्टीच्या नियमावर आधारलेल्या आहेत. या सर्व कथा त्या लोकांच्या आहेत जे समाजाच्या एका कोपऱ्यामध्ये आहेत. ज्यांच्यावर कधीच प्रकाश पडलेला नाही.  ती सर्व लोकं या आधी लेखकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेली आहेत किंवा येऊन गेलेली आहेत, त्या सर्वांचे तपशीलवार वर्णन लेखकाने केले आहे. अशा प्रकारे या सात कथांनी हा कथासंग्रह बनला आहे. जो अक्षरशः वाचकाच्या मनाचा ठाव घेतात,वाचकाला त्याच्या सोबत धरून ठेवतो. 

धार्मिक दंगल म्हणजे दोन धर्मांतील मूर्ख अनुयायांत झालेली दंगल या पंच लाईनवर आधारीत काही कथा या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात, मग त्यामध्ये हारून फ्रेम वर्क्स, “इस्साक पक्का हिंदू होता, असुविधा के लिये खेद है, जावेद जिवंत आहे. या कथा त्या लोकांच्या आहेत जे आपल्या समाजामध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आपल्या समाजातील काही लोक अजून त्यांना आपलं म्हणायला तयार नाहीत. कथा वाचून पूर्ण झाल्यावर आपल्याला वर नमूद केलेल्या विषयाचे गांभीर्य समजून येते. तसेच इतर कथा म्हणजे झुंबर, प्रॉपर्टी एक्सिबिशन, तिसरा डुळा या कथांचा विषयसुद्धा भन्नाट आहे.

ज्या कथेच्या नावावरून या कथासंग्रहाचे नाव आहे ती कथा म्हणजे 'तिसरा डुळा'. ही कथा माझ्या खूप जवळची आहे. कथेचा नायक म्हादू हा एक छोटा मुलगा आहे ज्याची भगवान शिवावर खूप भक्ती आहे, तो भगवान शिवांना आपला मित्र मानतो आहे. देवाला शंकर असं एकेरी नावाने बोलावलं तर त्याला राग येतो. असीम भक्ती असणारा हा छोटा म्हादू त्याला ही भक्ती त्याच्या बापाकडून ज्याला तो जगड्या म्हणून हाक मारतो. त्याची आई मंगळी तिला सुद्धा तो आई न म्हणता मंगळी म्हणून हाक मारतो आहे. गाव गावांमध्ये होणाऱ्या जत्रांमध्ये भगवान शिवांची चित्र काढून,दोरीवरचे खेळ करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब. एक प्रसंग असा घडतो ज्यामध्ये जगड्याचा मृत्यू होतो आणि मंगळी समोर म्हादूला घेऊन पुढचे आयुष्य कसे व्यथित करायचे असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा तिला एक कल्पना सुचते, येणाऱ्या जत्रेमध्ये म्हादुला भगवान शिवांचे सोंग घेऊन,नाच करायला लावायचा आणि त्यातून पुढच्या आयुष्याचा रोजगार करायचा. आपण भगवान शिवांचे सोंग घ्यायचे या कल्पनेनेच म्हादू हरकून जातो. महादेवाप्रमाणे आपल्याला ही तिसरा डोळा असावा असे त्याला वाटते. तिसरा डोळा उघडून वाईट गोष्टी नष्ट कराव्या असं त्याला वाटत असतं. पुढे एक अशी घटना घडते की त्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते.

कथा संग्रहामधील प्रत्येक कथा अप्रतिम आहे आणि वाचून पूर्ण झाल्यावर आपण त्या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करून विचार करू लागतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ आपल्याला या पुस्तकाकडे खेचून घेते. ते मुखपृष्ठ साकारले आहे सतीश भावसार यांनी. पुस्तकांचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन यांनी केले आहे.प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक कवी,कथाकार,नाटककार किरण येले लिखित 'तिसरा डुळा'.


 

2 comments:

  1. वाह! पुस्तक परिचय अप्रतिम आहे.
    तुम्ही खूप वाचता, हे वाचून आनंद झाला. किरण येले कवी म्हणून माहीत
    आहेत. आता त्यांच्या या कथासंग्रहाविषयी उत्सुकता वाटते आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आमच्या ब्लॉग वरील इतरही परिचय जरुर वाचा.

      Delete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.