Sunday, December 26, 2021

सामाजिक प्रबोधनाचा दगडी मक्ता


दगडी मक्ता

                            

                          लेखक - रमेश अंधारे.

 

मानवाच्या समृद्धीचा मार्ग हा त्याने केलेल्या प्रगतीच्या माध्यमातून असला तरी ती प्रगती त्याने मिळवलेल्या शिक्षणातून आहे. शिक्षण ही अशी मशाल आहे जी गुलामगिरीच्या, जाती-धर्माच्या अंधारातून वाट काढत उज्वल भविष्याच्या उगवतीची वाट दाखवणारे दिशा दर्शक आहे. शिक्षणामुळे कोणा एकाची प्रगती नसते तर त्यांच्या सोबतच्या सर्वांची प्रगती होते. विजयाचे शिखर गाठण्यासाठी शिक्षणाच्या पायऱ्या सदैव मदत करतात. पण शिक्षणामुळे आलेल्या शहाणपणाचा वापर उत्तम आणि आदर्श समाज घडवण्यासाठी करणे तितकेच महत्वाचे आहे.जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाला गुलामगिरीच्या खाईतून बाहेर काढले तसेच.याच गोष्टीवर भाष्य करणारे पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला अली आहे. लेखक रमेश अंधारे लिखित दगडी मक्ता.

३५० पानांच्या या पुस्तकाची भाषा सुरवातीला वाचकाला अवघड वाटते पण जस जसे आपण वाचत जाऊ तसे त्या भाषेचे वाचकाला आकलन होते. पुस्तकांमधील भाषा, त्यामधील काही म्हणी आणि पाथरवटी बोली भाषेमुळे वाचक पुस्तकाकडे खेचला जातो. कथेचा नायक उमा ढाले याच्या भोवती पुस्तकाचे कथानक घडत आहे. वटफळी गावामध्ये राहणार कोंडू हा पाथरवट समाजातील एक. हा समाज दगडावर घाव घालून त्याचे जाते-पाटे, बांधकामासाठी लागणारे घडविचे दगड बनवणारा हा समाज. कोंडूचे संपूर्ण आयुष्य जात्या-खलबत्यामध्ये दळले,कांडले गेले. जी फरफट आपली झाली ती आपल्या मुलाची उमाची होऊ नये म्हणून त्याचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी झटत राहतो. शिक्षण हे एक असं वरदान आहे जे माणसाला समृद्ध करते. कथेचा नायक उमा स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसमृद्ध होतो तर त्याच्यासोबत त्याच्या समाजातील सर्व लोकांची मदत करून त्यांना समृद्धीच्या मार्गाकडे घेऊन जातो. जातपंचायतीच्या जाचक त्रासामुळे अंधारात गेलेल्या समाजाला उमा जातपंचायती विरुद्ध लढून बाहेर काढतो. लेखक रमेश अंधारे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जाती- जातीमधील, गावा- गावातील राजकारण, गरीबी, गावातील यासमस्या यासोबतच शेती, उद्योग, शिक्षण आणि पारदर्शक राजकारण, मिळालेली सत्ता ही लोकांच्या उज्वल भविष्यासाठी कशी वापरावी याविषयी त्यांनी सखोल भाष्य केले आहे. बहुजन हितकारिणी पक्षाच्या माध्यमातून उमा राजकारणामध्ये प्रवेश करतो. आणि मिळालेल्या पदाचा वापर हा लोककल्याणासाठी करतो. कथेमध्ये उमाच्या आयुष्यात काही छोटी-मोठी वादळे येतात त्यातून तो स्वतःला नीट तारून नेतो. यासर्वां प्रवासामध्ये त्याला साथ मिळते ते त्याच्या पत्नी अंजलीची.उमाचा हा संपूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी नक्कीच हे पुस्तक वाचले पाहिजे.

धन-दौलत, सोनं, चांदी, जमीन हे ऐश्वर्या तुमच्याकडे असेल तर ते कोणीही तुम्हाला लुबाडून, तुमच्याकडून ओरबाडून सहज घेऊ शकते. पण जर तुमच्याकडे शिक्षण असेल तर कोणीही कितीही प्रयत्न केला तरी ते तुमच्याकडून घेऊ शकत नाही. आणि जर तुम्ही शिक्षणाने समृद्ध झाला असाल तर तुमच्या आणि तुमच्या समाज्याच्या प्रगतीसाठी तुम्ही त्याचा योग्य वापर करू शकता. याची शिकवण आपल्याला आदरणीय शाहू, फुले, आंबेडकर यांनी दिली. त्यांनी सांगितलेल्या याच गोष्टीचे आपण आचरण केले तर लेखक रमेश अंधारे यांनी या पुस्तकांच्या माध्यमातून सांगितलेला समाज आपण नक्की उभारू शकतो. असे मला वाटते.

पुस्तकाचे प्रकाशन पद्मगंधा प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक!

लेखक रमेश अंधारे लिखित दगडी मक्ता.


https://www.instagram.com/tv/CVDZEIfoX2_/?utm_medium=copy_link


https://youtu.be/5VIjOdHZY1w


आम्हाला Instagram वर Follow सुद्धा करा आमचा Insta ID आहे shri_pustakexpress

 

1 comment:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.