Sunday, January 30, 2022

झुल्फिकार अली भुट्टो यांचा हा अण्वस्त्र कार्यक्रम निव्वळ एका टेलिग्राम द्वारे भारताच्या गुप्तचर विभागाच्या लोकांनी उघडकीस आणला.

 


लेट भुट्टो ईट ग्रास

           

                   लेखक - शौनक अगरखेडकर.

                         अनुवाद - अक्षय कुऱ्हे.

 

आपल्या होणाऱ्या प्रगतीकडे सर्व लोकांचे बारीक लक्ष असतं. आपल्या प्रत्येक हालचालीवर सुध्दा शेजारच्याचे अगदी बारीक लक्ष असते. आपली झालेली प्रगती ही तर त्याच्या नजरेत सलत असतेच पण ती प्रगती बघून त्याचा जळफळाट सुद्धा होत असतो. ही झाली दोन शेजाऱ्यांमधील गोष्ट, पण हीच गोष्ट एकमेकांच्या शेजारी शेजारी असणाऱ्या दोन राष्ट्रांमध्ये सुद्धा होत असेल तर...? आपले राष्ट्र कितीही प्रगतीशील असो वा प्रगतीच्या पथावर स्वार होऊन वाटचाल करत असो, शेजारच्या राष्ट्राची त्यावर नजर असतेच. या जागतिक राजकारणातील अत्यंत सूक्ष्म गोष्टी आहेत. पण आपल्या झालेल्या प्रगतीशी शेजारील राष्ट्र बरोबरी करू पाहत असेल किंवा त्याच्या माध्यमातून ते आपल्याला वरचढ होत असले तर, त्याच्यावर लक्ष ठेवणे हा सुद्धा जागतिक राजकारणाचा भागच आहे ! या गोष्टीवरून तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, की मी कोणा बद्दल बोलत आहे, तर वर नमूद केलेल्या विषयाला अनुसरूनच एक पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो आहे. लेखक 'शौनक अगरखेडकर' लिखित 'लेट भुट्टो ईट  ग्रास'!  या पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखक 'अक्षय कुऱ्हे' यांनी केला आहे.

"जर भारताने बॉम्ब बनवला, तर एक वेळ पानं किंवा गवत खाऊ,उपाशी राहू, पण आम्ही आमचा बॉम्ब बनवूच!" हे पाकिस्तानचे (तत्कालीन) परराष्ट्र मंत्री जुल्फिकार अली भुट्टो यांचे उद्गार हा या २६८ पानांच्या पुस्तकाच्या कथेचा विषय आहे. एखाद्या स्पाय थ्रिल्लिंग सिनेमाचे कथानक शोभावे अशी पुस्तकाची कथा आहे. १९७४ मध्ये भारताने आपली पहिली अणूचाचणी राजस्थानच्या पोखरण येथे केली हे समजताच पाकिस्तानला सुद्धा आपणही असा बॉम्ब तयार करून अणुसत्ता होण्याचे डोहाळे लागले, झुल्फिकार अली भुट्टो यांचा हा अण्वस्त्र कार्यक्रम निव्वळ एका टेलिग्राम द्वारे भारताच्या गुप्तचर विभागाच्या लोकांनी उघडकीस आणला. पण सरते शेवटी हाता-तोंडाशी आलेला घास काही चुकीच्या निर्णयाने भारताची गुप्तहेर संघटना गमावून बसते. आता यासर्वांमध्ये नेमकी कोणाची चूक होती हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.

पुस्तकांची कथा ज्या पद्धतीने लेखकाने मांडली आहे आणि त्याला काल्पनिकतेचे रूप दिले असले, तरी कथेचा कालखंड हा १९७४-७५ चा आहे. त्या कालावधीमध्ये भारत देशामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. भारतीय इतिहासाने कूस बदलली होती. त्यामुळे पुस्तकाची कथा ही काल्पनिक की वास्तव हे वाचकांनीच ठरवलेलं बरं!

प्रत्येक युद्ध हे युद्ध भूमीवरच लढलं जातं असं नसतं कारण काही लढाया या शत्रूशी समोरासमोर न लढताही जिंकता येतात. शत्रूच्या गोटात शिरून शत्रूची सर्व माहिती मिळवणे, शत्रूच्या राज्यात चालणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणे, आपल्याला हवी असलेली इत्यंभूत माहिती मिळवणे, शत्रूला गाफील ठेऊन त्याच्यावर मात करणे आणि आपल्या सैनिकांचे एक थेंबही रक्त न सांडता शत्रू वर विजय मिळवणे किंवा आपल्या सैन्याला योग्य माहिती पुरवणे हे गुप्तचर संस्थांचे काम. यामध्ये आपल्या भारताची गुप्तचर संस्था रॉ ही निष्णात आहे. गुप्तचर संस्थांमध्ये चालणाऱ्या कामांची,सरकारी संस्थांमध्ये चालणाऱ्या कामांची पद्धत लेखकाने पुस्तकामध्ये उत्तम प्रकारे मांडली आहे.

या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे लेखक अक्षय कुऱ्हे यांनी. जो अत्यंत योग्य शब्दांमध्ये आणि मूळ इंग्रजी पुस्तकाला न्याय देणारा झाला आहे.  पुस्तकाचे प्रकाशन व्हाईट फालकॉन पब्लिशिंग यांनी केले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक शौनक अगरखेडकर लिखित!

 लेट भुट्टो ईट ग्रास.


जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा.https://www.amazon.in/dp/1636403441/ref=cm_sw_r_wa_apa_glt_i_XY5544M4HN1544ZJ0RH3?_encoding=UTF8&psc=1


1 comment:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.