Monday, June 6, 2022

बदलत्या कृृषीव्यवस्थेचा चारीमेरा

 



चारीमेरा

                                लेखक - सदानंद देशमुख

 

 

आपल्या समोर असे भरपूर विषय असतात जे आपल्याला तेच तेच नेहमीचे असे वाटतात. कधी कधी आपण हे नेहमीचेच आहे म्हणून दुर्लक्षित करतो, तर कधी हे असच का म्हणून त्या विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. आज मी एक असे पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे, ज्याचा विषय नेहमीच्या चौकटीतला वाटत असला तरी या चौकटीचं वास्तव किती खोल आहे हे सांगणारा आहे. ते लिहिणारी व्यक्ती खूप महत्वाची आहे, कारण त्यांनी या विषयाच्या खोलामध्ये जाऊन, प्रदीर्घ चिंतनातून याची निर्मिती केली आहे.  मी बोलत आहे लेखक डॉ.सदानंद देशमुख लिखित 'चारीमेरा' या पुस्तकाविषयी. या आधी लेखक सदानंद देशमुख यांची 'बारोमास' आणि 'तहान' ही पुस्तके वाचली होती. त्यातूनच 'चारीमेरा' या पुस्तकाविषयी खुद्द लेखकांकडून माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच हे पुस्तक वाचायला घेतलं. 

चारीमेरा म्हणजे शेताच्या चारही बाजू. शेताच्या सीमानिश्चिती संबंधित हा वैदर्भीय शब्द आहे. ४३९ पानांच्या पुस्तकाची कथा ही चारीमेरा मजबूत ठेवण्यासंबंधी भाष्य करते, कारण जर आपल्या शेताचे बांध मजबूत नसतील तर आपल्या शेताचा खंगळा झाल्याशिवाय रहात नाही. या पुस्तकामध्ये मुख्य व्यक्तिरेखा उदेभान आणि त्यांची पत्नी भावनाताई या आहेत. लेखक सदानंद देखमुख यांनी या कथेच्या आणि या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून बदलत जाणारा शेतीव्यवसाय, त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढत जाणारे यांत्रिकीकरण, यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यासमोर निर्माण होणारी आव्हाने, बदलत जाणारा निसर्ग आणि त्याच्यापुढे हतबल झालेला शेतकरी बांधव, शेतकऱ्यांची पदोपदी होणारी फसवणूक आणि मिळणारी वाईट वागणूक मग ती बियाणे, खते विकणाऱ्या कृषिसेवावाल्यांकडून असो वा खाजगी सावकार आणि कर्जवसुली करणाऱ्या अधिकारी वर्गाकडून. या सर्वांकडून फटकारलेला शेतकरी दरवर्षी नव्या आशेने, नव्या उत्सहाने शेतामध्ये पेरणी करतो. काही नवी स्वप्ने त्याच्या डोळ्यांसमोर असतात, संपूर्ण हिशेब त्याच्या नजरेसमोर असतो, जसं की वेळेत पेरणी झाली तर आपलं उत्पन्न एकरी दहा क्विंटल येईल. पण हाच आकडा खाली खाली येऊ लागतो; त्याला कारण बदलत जाणारे वातावरण, पिकांवर पडणारी रोगराई. या सगळ्यातून शेतकरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्या गोष्टी जरी त्याच्यासाठी बदलत असल्या, घटत असल्या तरी एक गोष्ट त्याच्यासाठी वाढत असते ती म्हणजे कर्ज. ते कधीच कमी होत नसतं. या सर्व गोष्टींवर लेखकाने भाष्य केले आहे.

 वाचकाला कादंबरीचा विषय नेहमीचाच वाटेल पण लेखक सदानंद देशमुख यांनी खचलेल्या, नकारात्मक भावना मनामध्ये आलेल्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली शेती विकायला काढली आहे, अशा सर्वांसाठी एक प्रदीर्घ चिंतनातून हे पुस्तक लिहिले आहे ज्यामुळे निश्चितच एक सकारात्मक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजू लागेल. त्यामुळे फक्त शेतकऱ्यालाच नाही तर शेती करणाऱ्या, शेतीशी संबंधीत प्रत्येक व्यक्तीला आपला चारीमेरा मजबूत ठेवून लढण्याची हिंमत येईल. शेती व्यवसायातील समस्या, शेतकऱ्यांचे दुःख, त्याच्या समोरची नवनवी आव्हाने या सगळ्याचा लेखक सदानंद देशमुख यांचा मोठा अभ्यास आहे. हे लवकरात लवकर बदलावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे क्षण यावेत ही  भावना त्यांच्या प्रत्येक लिखाणातून स्पष्टपणे दिसून येते.

 पुस्तकाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ रविमुकुल यांनी केले आहे. अत्यंत वाचनीय असे हे पुस्तक. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असलेच पाहिजे.

लेखक सदानंद देशमुख लिखित चारीमेरा !


आमच्या YouTube चॅनेलला आजच भेट द्या

https://youtu.be/5VIjOdHZY1w

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.