समाजातील हिंस्त्र वास्तवाचा शोध घेणारे कथासंग्रह

     



    दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट

     

                                   लेखक - प्रणव सखदेव

     

    नमस्कार मंडळी आज एक असे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे, त्यामधील कथा आपल्याला समाजातील दाहक वास्तवाचे चित्रण करतात आणि मराठी कथासाहित्याला एक वेगळे वळण देणारे आहे. या कथा संग्रहाच्या माध्यमातून लेखकाने मध्यमवर्गीयांच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. मी बोलत आहे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित "दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट" या कथा संग्रहाविषयी.

    १६८ पानांच्या पुस्तकामध्ये ८ कथा आहेत. प्रत्येक कथाही वाचनीय आहे. प्रत्येक कथा वाचकाला तिच्या सोबत धरून ठेवते. समाजभावना जागृत करणाऱ्या या  कथा वाचकाला तिच्या भाव विश्वामध्ये घेऊन जाते. लेखक प्रणव सखदेव याचे विशेष कौतुक वाटते कारण आजच्या आणि उद्याच्या बदलत्या समाजाचे प्रतिबिंब त्यांनी या कथा संग्रहाच्या माध्यमातून वाचकांना समोर आणि पर्यायाने समाजासमोर शब्दांच्या माध्यमातून मांडले आहे.

    "आठवलेची एक आठवण" या कथेमध्ये आठवले या सफाई कामगारासाठी एक आठवण इतकी गरजेची असते कि त्या आठवणीमुळे त्याच्यासाठी स्वर्गाचे दार उघडणार असते. पण सरतेशेवटी ती आठवण खोटी असते आणि त्याला समाजाने दिलेली वागणूक इतकी हिन असते कि त्याद्वारे समाजाचे वास्तव आपल्या समोर येते आणि त्यासोबत खोट्या आठवणीला लाथ मारून स्वतःला स्वर्गापासून दूर करणाऱ्या आठवलेचा हेवा वाटतो.

    "एक कुत्ते की मौत" सोसायटीमधील पाळीव कुत्र्यांनी रस्त्यावर, सोसायटीच्या गेट जवळ, नेहमीच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर शी करणे हे काही नवीन नाही, पण याच गोष्टीमुळे त्या पाळीव कुत्र्यांच्या मालकाची आणि एखाद्या सोसायटीच्या सदस्यांसोबत भांडणे होतच असतात, कथेमधील हा प्रसंग जरी साधा असला तरी लेखकाने त्याला रहस्यतेचा आधार देऊन हि कथा खूपच रंजक केली आहे.

    "खचणारे बहर माथी घेऊन" जर तुम्ही लेखक प्रणव सखदेव यांचा "निळ्या दातांच्या दंतकथा" हा त्यांच्या पहिला कथासंग्रह जर तुम्ही वाचला असेल तर त्यामधील "कथा सांगण्याची गोष्ट" या कथेमधील पात्रे, तेच कथानक घेऊन लेखकाने एक दीर्घ कथा खचणारे बहर माथी घेऊन या नावाने लिहिली आहे. हा पुनर्लेनखनाचा प्रयोग लेखकाने उत्तम प्रकारे हाताळलेला आहे. हा पुनर्लेनखनाचा प्रयोग वाचकाला समजून घ्यायचा असेल तर माझ्यामते वाचकांनी "कथा सांगण्याची गोष्ट" हि कथा जरूर वाचली पाहिजे.

    "बियास का उधाणली त्याची गोष्ट" या कथेमध्ये यांत्रिक कंपनीच्या रोबोट्सच्या गैर वापरातून एक भीषण सत्य समोर येते.कथेमधून आजच्या यांत्रिक युगाचे आणि उद्याच्या नव्या यांत्रिक जगाचे आणि त्यासोबत लोकांच्या बदलत्या मतलबी वृत्तीचे दर्शन होते.

    "दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट" या शीर्षककथेमध्ये पाककलेचे दर्शन होते. या कथेमधील 'पंचकलिका' हा जरी कल्पित पदार्थ असला तरी त्याची रेसिपी वाचून तोंडाला पाणी सुटते आणि तो पदार्थ एकदा तरी करून पाहायला हवा असा मोह होतोच. यासोबतच उच्च-नीचतेच्या माध्यमातून माणसा माणसांमध्ये केले जाणारे भेद आणि त्यामुळे निष्पाप लोकांची होणारी होरपळ हा विषय लेखकाने या कथेद्वारे अधोरेखीत केला आहे.  या कथा संग्रहातील इतर कथा सुद्धा वाचकांनी जरूर वाचाव्या त्याच्या माध्यमातून वाचकांना नक्कीच काही तरी वेगळे आणि भन्नाट वाचायला मिळेल यात शंका नाही.

    पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाश यांनी केले आहे. मोहर या मुद्रे अंतर्गत दर्जेदार फिक्शन आणि ललित साहित्य वाचकांपर्यंत पोहचावे यासाठी रोहन प्रकाशन नेहमीच प्रयत्नशील असतात. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकामधील रेखाचित्रे अन्वर हुसेन यांनी साकारली आहेत. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे आणि सामाजिक भावना असणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक लेखक प्रणव सखदेव लिखित "दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट"



    जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा

    https://rohanprakashan.com/product/dimitri-riyaz-kelkarchi-goshta/

    आमच्या youtube चॅनेलला आजच भेट द्या

    https://youtu.be/5VIjOdHZY1w

    Comments

    धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.