Sunday, March 28, 2021

एकविसाव्या शतकातील,गतिमान आणि प्रगतीची कास धरणाऱ्या शतकातील प्रश्नांना,समस्यांना थेट भिडणाऱ्या कथा,




श्रीलिपी

                                                  लेखक- किरण गुरव.

 

बऱ्याच दिवसांनंतर एक भन्नाट कथासंग्रह वाचायला मिळाला. गावागावातील राजकारण,विकासाचा आणि सोयी सुविधांचा अभावयामुळे जनतेची होणारी पिळवणूक,नात्यांमधील छोट्या-मोठ्या गोष्टी, जाती-जातींमधील अहंकार, भांडणे, राजकारण यासर्व गोष्टींचे  इतंभूत वर्णन ग्रामीण साहित्य, कथा-कादंबरीमध्ये वाचायला मिळतं. त्या लिखाणाशी समरूप होता येते. अशाच ग्रामीण भागातील लेखकांमध्ये एक आवर्जून घ्यावे असे नाव म्हणजे लेखक किरण गुरव यांचे नाव. लेखक किरण गुरव यांनी २००२ ते २००८ या काळामध्ये विविध दिवाळी अंक-मासिकांसाठी लिहिलेल्या काही कथांचा संग्रह असलेले 'श्रीलिपी' हे पुस्तक घेऊन आज मी तुमच्या भेटीला आलो आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक परिस्थितीचे तपशीलवार वर्णन लेखक किरण गुरव यांनी त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये केले आहे.

पाच कथांचा हा कथा संग्रह २१२ पानांचा आहे. त्यामध्ये काही कथा इतक्या मोठ्या आहेत की त्यांना लघु कादंबरी म्हंटले तरी चालेल. प्रत्येक कथा ही कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये घडणारी आहे. 'वडाप' या कथेचा नायक आंद्या. वडापची जिप गाडी चालवणाऱ्या तरुणाची ही कथा. एस.टी बसच्या आधी आणि कमी पैशामध्ये जलद पोहचवणारे वाहतुकीचे ग्रामीण भागातील सुलभ साधन म्हणजे वडाप. या वडापच्या गाड्यांमध्ये त्याची होणारी होरपळ, त्याच्या समस्या, त्याची चाललेली तगमग लेखकाने त्यासोबतच आजूबाजूच्या परिस्थितीच्या तपशीलवार वर्णनासह मांडली आहे.

'क्लॉक अवर बेसिस' ही कथा ग्रामीण भागातील तरुण शिक्षकावर आधारित आहे. असा शिक्षक जो गावातील कॉलेजमध्ये  क्लॉक अवर बेसिस म्हणजेच लेक्चरशीप वर काम करणारा आहे. अशा प्रकारचे तरुण ग्रामीण भागातील विविध शिक्षण संस्थामध्ये लेक्चर शिपवर वर्षानुवर्षे कधीतरी पर्मनंट होऊ या एकाच आशेवर काम करतात. काहींचे हे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे स्थानिक राजकारणाला बळी पडून होरपळून जाते. अशाच तरुण शिक्षकाची ही कथा आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागातील शैक्षणिक विश्वाचे वर्णन केले आहे. शैक्षणिक संस्थांमधील कुडघोरीचे राजकारण,समस्या यांचे वर्णन लेखकाने केले आहे.

पुढची कथा आहे. 'डिजिटल मृगजळाचा प्रवास' या कथेमधून लेखकाने ग्रामीण भागातील तरुण मुलांना द्योजक होण्यासाठी सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये त्यांना सरकार तर्फे द्योगधंद्यासाठी भांडवल पुरवलं जातं. अशा स्वपरुपाच्या योजना येतात खऱ्या पण त्या किती लोकांपर्यंत पोहोचतात,याचा खरा लाभ कोणाला मिळतो,सरकारी कार्यालयांमध्ये अशा योजनांच्या नावाखाली गरीब तरुणांना फसवून त्यांची दिशा भूल करून लुटणाऱ्या एजन्ट लोकांचा सुळसुळाट असतो,फक्त एजन्ट नाही तर त्या त्या खात्याचे संबंधीत अधिकारी,शिपाई,नोकरदार लोक त्यांची अदलं-मधलं  करण्याच्या पद्धती यासर्व गोष्टी लेकाने कथेमध्ये मांडल्या आहेत. सरकारी योजनांच्या मृगजळाचा प्रवास लेखकाने या कथेमध्ये मांडला आहे. सरकारी योजना,अनुदान हे एक प्रकारचे मुर्गजळच असतं ते कोणाला मिळत कोणाला मिळत नाही, त्यासाठी संपूर्ण आयुष्य तिष्ठत बसावे लागते.

पुस्तकाच्या शेवटची कथा 'श्रीलिपी' ही आहे. या कथेमध्ये एका शिक्षकाचा तरुण मुलगा व्यवसाय करू इच्छित आहे. पण शिक्षक बाप जुन्या विचारांचा म्हणजे नोकरी व्यवसायावर विश्वास ठेवणारा आहे. धंद्यामधील उतार चढाव त्याला माहिती आहेत. त्या उताराला तो घाबरत आहे त्यामुळे आपल्या मुलाने एखादी नोकरी करावी अशी इच्छा असणारा आहे. कथेमध्ये मांडलेला काळ हा संगणक क्रांतीच्या युगाचा आहे. MSCIT  या कोर्स द्वारे संगणकाच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करणारा काळ. यासर्व गोष्टी लेखकाने या कथेमध्ये उत्तम प्रकारे मांडल्या आहेत ज्यामुळे कथा वाचनीय झाली आहे.

श्रीलिपी या कथा संग्रहामधील सर्व कथा या २००२-२००८ या वर्षातल्या आहेत. त्यावेळच्या सर्व गोष्टींचा,सर्व परिस्थितीचा,आजूबाजूच्या वातावरणाचे तपशीलवार वर्णन लेखक किरण गुरव यांनी त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये केले आहे. तपशीलवार वर्णन,कथेच्या विषयाची निवड यामुळे या कथा भन्नाट आणि आशय संपन्न झाल्या आहेत. एकविसाव्या शतकातील,गतिमान आणि प्रगतीची कास धरणाऱ्या शतकातील प्रश्नांना,समस्यांना थेट भिडणाऱ्या कथा,लेखक किरण गुरव यांच्या 'श्रीलिपी' या कथासंग्रहामध्ये वाचायला मिळतात. पुस्तकाचे प्रकाशन 'शब्द पब्लिकेशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकातील रेखाटने ज्यामुळे प्रत्येक कथेचा आशय आणि प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो ते साकारले आहे जितेंद्र पतके यांनी. प्रत्येकाने वाचावा असा हा कथा संग्रह लेखक किरण गुरव लिखित 'श्रीलिपी'

1 comment:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.