Sunday, September 5, 2021

शिक्षण, साहित्य, चळवळ यासर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारे पुस्तक



कळप

                      लेखक - राजन गवस

 

 या भूतलावरील कोणताही प्राणी विचारात घेतला मग तो मनुष्य प्राणी असो वा वन्यप्राणी, त्याच्या  स्वभावाची फोड केली तर एक गोष्ट प्रकर्षाने समजून येते ती म्हणजे की, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला कोणत्या ना कोणत्या कळपाचा (समूहाचा) आधार घ्यावा लागतो. कधी तो या कपाळात नुसता त्या कळपाचा भाग म्हणून संपूर्ण आयुष्य व्यथित करतो तर कधी त्या कळपातील म्होरक्याच्या हातचा बाहुला बनून राहतो किंवा त्याची हांजी हांजी करत राहतो, तर कधी स्वतः त्या कळपाचा म्होरक्या होतो आणि संपूर्ण कळप आपल्या इशाऱ्यांवर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यांना कळपात राहायचं नसतं ते स्वतः काही तरी करू पाहतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर out of the box जाऊन विचार करणाऱ्यांच एक तर खूप काही चांगलं होत तर काहींचं खूपच वाईट होत. यासोबतच शिक्षण, साहित्य, चळवळ यासर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारे पुस्तक लेखक राजन गवस लिखित ' कळप ' हे पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो आहे.

२१६ पानांच्या या पुस्तकाचा नायक रघु चिलमी या तरुणाच्या अवतीभोवती या पुस्तकाची कथा घडत असते. रघु हा कविता, कथा लिहिणारा कॉलेज तरुण आहे. देवदासींच्या चळवळीमध्ये सुद्धा तो काम करत आहे पण त्याला साहित्यिकांच्या कळपामध्ये किंवा चळवळीच्या संघटनेमध्ये किंवा तो करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणांमधील नोकरदार वर्गाच्या कळपामध्ये राहणे पसंत नाही. पुस्तकामध्ये ग्रामीण कथा, ग्रामीण साहित्य याच्या विषयी मांडलेल मत वाचल्यावर समजून येते की ग्रामीण साहित्यसुद्धा किती महत्वाचे आहे. रघु त्याचा मित्र शंकर हे दोघे ज्या देवदासी चळवळीमध्ये काम करत असतात त्यामध्ये होणारे राजकारण यामुळे त्याची बदलत चाललेली मानसिकता आणि पुढे जाऊन चळवळीच्या कळपातून तो बाहेर पडतो. पुढे साहित्यिकांच्या कळपातून तो बाहेर पडतो, त्याला एक घटना अपवाद ठरते. सरते शेवटी कथेचा नायक सर्व कळपातून म्हणजे चळवळ,लेखक,वाङ्मयीन चळवळ,तात्विकता,नैतिकता या सगळ्यातून बाहेर पडतो तेव्हा त्याला स्वतःच्या मेंदूला पडलेलं भगदाड त्याला स्पष्ट दिसतं.

लेखक राजन गवस यांची यापूर्वी खूप पुस्तके वाचली. त्या द्वारे लेखक समाजामधील जातीय राजकारण, सुशिक्षित वर्गामधील वर्गामधील बेरोजगारी, देवदासींचे प्रश्न, त्यांच्या समस्या यावर भाष्य करतात, कळप या पुस्तकाद्वारे लेखक यासर्व गोष्टींसोबत साहित्य क्षेत्रातील विविध गोष्टींवर बोट ठेवतात. त्यामुळे हे पुस्तक विशेष आहे. कथेमधील दिलावर,तांबट या तरुणांनी प्राध्यापकाच्या नोकरीसाठी केलेली धडपड वाचून शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी मिळवणं आणि त्यामध्ये असणारे राजकारण हे कशा स्वरूपाचे असते हे समजून येते. शिक्षण क्षेत्रामध्ये आणि शिक्षकीपेशामध्ये होणारे कुडघोरीचे प्रकार लेखकाने कथेच्या माध्यमातून समोर आणले आहेत. लेखक राजन गवस यांच्या या आधीच्या कादंबरीमधून ते देवदासींच्या व्यथा मांडतात त्याच प्रमाणे याही पुस्तकामध्ये देवदासींच्या विषयावर लेखकाने प्रकाश टाकला आहे. आणि याच चळवळीमधील राजकारण हा कथेचा गाभा आहे.

पुस्तकाचे प्रकाशन ' दर्या प्रकाशन 'यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ गिरीश उगळे यांनी साकारले आहे. प्रत्येक तरुणाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे शिक्षण,साहित्य,चळवळ यावर प्रखडपणे मत मांडणार पुस्तक लेखक राजन गवस लिखित कळप.


 

1 comment:

  1. पुस्तक वाचायला हवं!! छान माहिती दिली आहे!!

    ReplyDelete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.