Sunday, December 15, 2019

बारोमास





बारोमास

                                लेखक - सदानंद देशमुख


खुप दिवसांनी एक असे पुस्तक वाचले ज्याने विचार करायला भाग पाडले. मला आठवते झाडाझडती हे पुस्तक जेव्हा मी वाचलं होतं तेव्हा त्या पुस्तकाने मला विचार करायला भाग पाडलं होत. आता तसेच एक पुस्तक आज वाचून पुर्ण केलं. या पुस्तकाने तर माझे विचारच बदलुन टाकले. या पुस्तकाची पहिली आवृत्ती २००२ मध्ये प्रकाशित झाली. आज २०१९ साल संपण्याच्या मार्गावरती आहे. तरी हे पुस्तक वाचायला मला खूप उशीर झाला असला तरी पुस्तकांमधील कथेचा विषय हा अजुनही सुरूच आहे आणि तो न संपणारा नाही असेच आहे. मंडळी मी २००४ च्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक सदानंद देशमुख लिखित बारोमास ह्या पुस्तक विषयी बोलत आहे.

 शेतकऱ्याच्या जीवनावर अत्यंत जवळुन प्रकाश टाकणारी हि कादंबरी आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामधील दुःख,त्यांच्या समस्या,त्यांच्या आयुष्यात असणारं थोडं फार सुख. स्वतःच्या पोटाला चिमटे काढुन पोरांच्या पोटाला दोन घास जास्त देऊन त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी आणि आपल्याला या नरकातून बाहेर काढावं. अशी अपेक्षा ठेवणारा शेतकरी. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा डोनेशनच्या अभावी नोकरी न मिळालेली शेतकऱ्यांची मुलं शेवटी शेतीमध्येच येऊन पडतात तर काही दिवसाचा रोजगार मिळावा म्हणुन लग्नाच्या,मुंजीच्या वरातीमध्ये बॅण्ड वाजवत फिरतात. आपलं शिक्षणचं झाला नाही असं स्वतःला समजाऊन नोकरीचा सोड पिच्छा करतात. तर एक बाजुला ज्याच्या कडे डोनेशनचे पैसे आहेत त्यांनी नोकरी मिळवुन शेतीला रामराम ठोकुन शहराची वाट धरली आहे. पेरलं तर उगवत नाही, उगवलं तर ते टिकत नाही आणि टाकलच तर त्याला चांगला भाव मिळत नाही या समसेने शेतकरी आज हि बेजार आहे. त्याच हे दुःख कधीच संपणारं नाही आहे. शेतकऱ्याचा कोणाचं नाही ना निसर्ग,ना सरकार ना आणि कोणी. शेतकरी बिचारा एकटाच त्यांच्या कष्टी आयुष्याचा एकट्याने झगडा देत आहे. आणि अजुनही देत राहील यात काय शंका नाही. वर नमुद केल्या प्रमाणे जरी मला हे पुस्तक वाचायला खूपच उशीर झाला असला तरी शेतकऱ्याच्या समस्या अजुनही त्याच आहेत ज्या २००२ मध्ये किंवा त्याच्या आधी होत्या. अजुनही शेतकऱ्याला कोणाचं वाली नाही ना निसर्ग,ना व्यापारी, ना सरकार. शेतकरी एकटाच.

३६२ पानांची हि कादंबरी.  प्रत्येक पानावर मन हळहळुन टाकणार कथानक. कथेचा नायक एकनाथ आणि त्यांच्या अजुन बाजुची त्याच्या जवळची माणसं आणि त्याच गाव सोनखशी यामध्ये घडणारी कथा लेखकानी अत्यंत सोप्या आणि ग्रामीण भाष्येमध्ये म्हणजेच विदर्भ मराठवाड्याच्या भाष्ये मध्ये मांडली आहे.  शहरांमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये रहाणाऱ्या वाचकाला या कादंबरीची भाषा वाचते वेळी थोडी जाड जाईल, पण आपण जस जसे पुढे वाचत जाऊ तसं ती भाषा वाचकाला आपलंस करून टाकते.

एम.ए.बी.एड चं  शिक्षण घेतलेला एकनाथ तनपुरे प्राध्यापक होण्याचे स्वप्न बघत असतो पण नोकरीच्या ठिकाणी एक लाख रुपयाचं डोनेशन मागितलं जात आणि डोनेशनचे पैसे भरू न शकल्या मुळे आता आयुष्यभर शेतीच करावी लागणार हे त्याला समजत. मुळातच हुशार असणारा एकनाथ आपल्या जवळच्या शेतकी अभ्यासाचा वापर करून घरची शेती फुलवण्याचा अतोनात प्रयत्न करतो पण त्याला कोणाचीच साथ मिळत नाही. ना घरची, ना निसर्गाची, ना सरकारची. एकनाथाचा लहान भाऊ मधु हा पण हुशार १२वी ला विज्ञान विभागातुन उत्तीर्ण झालेला उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी नसलेला. एकनाथ प्रमाणे त्याच्या कडेही नोकरीच्या ठिकाणी पैसे मागितले जातात. नोकरीसाठी पैसे जमवायचे म्हणुन तो गावातील काही तरुणांना सोबत घेऊन, रात्री जमिनी खाली सोने सापडेल म्हणुन रात्रभर एका भोंदू बुवाच्या नादी लागुन जमीन उकरत फिरत रहातो. स्वभावाने मवाळ असलेला मधु पुढे त्याच्याच एका कलागती  मुळे तनपुरे कुटुंबाची वाताहत होते. मुलगा एम.ए.बी.एड आहे, पुढे नोकरी लागेल शहरात येऊन राहील आपली पोरगी सुखात राहील या आशेने अलकाच्या घरच्यांनी तिचा विवाह एकनाथ सोबत लावून देतात. शहरात वाढलेली अलका लग्नानंतर खेडे गावात येते. कुणब्याच्या घरच्या कामाचा रोजचा गाडा ओढुन बिचारी रोज अर्ध मेली होऊन जाते, ती भोगत असलेल्या नरकयातना एकनाथला समजत असतात. नोकरी नाही म्हणुन शेती करावी लागली, शेती मध्ये गती नाही,घरची परिस्थिती सुधारता येत नाही यागोष्टी माहिती असलेला एकनाथ हतबल होऊन अलकाचे होणारे हाल हाताशी पणे बघत रहातो. पुढे त्या दरिद्री घराला आणि नवऱ्याला कंटाळुन आणि मधुने केलेल्या अपमानाने अलका एकनाथला सोडुन जाते आणि त्याला एक नाथ करते. एकनाथांच्या वाट्याला आलेलं दुःख वाचुन मन पिळवटुन जाते.

शेतकऱ्याचे दुःख याच्या समस्या आणि त्याच्या सरकार कडुन नेमक्या काय अपेक्षा आहेत या सर्व गोष्टी लेखकानी अत्यंत अभ्यास पुर्वक मांडल्या आहेत. शेतीमधील बारीक बारीक गोष्टी सुद्धा लेखकानी खुप चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. शेतकऱ्याचे मित्र असणारे त्याचे सोबती बैल,गाय ,म्हशी,कुत्रा,मांजर यासर्वांचे शेतकऱ्याच्या जीवनातील त्यांचं स्थान आणि चंद्री मांजरीच्या ऐंड्री पिऊन झालेला मृत्यू मनाला चटका लाऊन जातो.
या कादंबरी विषयी बोलावं तितकं कमी आहे. आणि लेखक सदानंद देशमुख यांनी कादंबरी ज्या नोट जाऊन थांबवली आहे तिथुन समजत की शेतकऱ्याच्या जीवनाचे भोग हे न संपणारे आहेत. कादंबरी वाचते वेळ मन हळहळुन जाते, नकळत कधी डोळ्यातुन अश्रु गळून पानावर पडले हे समजत नाही.

आजच्या माझ्या पिढीला जी सोशल मीडियावाली आहे तिला नेहमी Adventures, Thrilling करायचं असतं, त्या पिडीला  मला एकच सांगायचं आहे. एकदा शेती करून बघा मग समजेल खरं  Adventures आणि  Thrilling काय असतं. कादंबरीचे  प्रकाशन कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांनी केलं आहे. अत्यंत वाचनीय हि कादंबरी प्रत्येक वाचकाच्या संग्रही असलीच पाहिजेल. जो शेतकऱ्याच्या वेदना समजतो त्याच्या कडे तर हि कादंबरी असलीच पाहिजेल.
लेखक सदानंद देशमुख लिखित बारोमास कादंबरी नक्की वाचा.


श्रीजीवन तोंदले

4 comments:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.