Sunday, February 27, 2022

आख्यायिका आणि दंतकथांच्या गोठण्यातल्या गोष्टी

 


गोठण्यातल्या गोष्टी.

 

लेखक - ह्रषीकेश गुप्ते.

 

 

प्रत्येक माणसाचं आयुष्य एक कथाच असते.त्याला आलेले अनुभव, त्याला भेटलेली माणसं, त्याच्या आजू-बाजूचा परिसर यासर्वांची एकत्रित बांधणी शब्दांमध्ये केली तर एक कथा तयार होऊ शकते. त्याच्या सोबत घडलेले ते सर्व प्रसंग, त्याला भेटलेली ती माणसं त्याच्या गावाचीच असतील तर...? एखादं गाव हे कधीच म्हातारं नसतं किंवा ते कधीच तरुण सुद्धा नसतं. ते फक्त जिवंत असतं चिरंतन चिरकाल, प्रत्येक गाव हे त्याच्यामध्ये त्या गावच्या प्रत्येक घडामोडी, प्रत्येक नवे-जुने बदल आपल्यामध्ये सामावून घेऊन जिवंत असतं. आणि अशाच गावांमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हस्तांतरीत केल्या जातात पण गाव तिथंच असतं जणू त्यासर्व गोष्टींचा साक्षीदार. याच गावाकडच्या गोष्टी सांगणारे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे. लेखक ह्रषीकेश गुप्ते लिखित गोठण्यातल्या गोष्टी.

२२३ पानांच्या या पुस्तकामध्ये गोठणे नामक एक काल्पनिक गावातल्या गोष्टी आहेत. या गोष्टी त्या गावातील काही व्यक्तिरेखांवर आहेत, त्या द्वारे लेखकाने त्या गावातील रूढी-परंपरा, गावातील काही प्रमुख वास्तू, मंदिरे, बाजार पेठा यांचे सुद्धा समावेश आहे.’सुलतान पेडणेकर’,’ जिताडेबाबा’, ‘जयवंतांची मृणाल’, ‘खिडकी खंडू’, ‘मॅटिनी मोहम्मद’, ‘रंजन रमाकांत रोडे’, ‘गोलंदाज’ या व्यक्तिरेखांच्या गोष्टींच्या माध्यमातून  लेखकाने संपूर्ण गाव या पुस्तकामध्ये मांडला आहे. पुस्तकातील या सात कथा लेखक आपल्या सांगत आहे. गावामध्ये घडणारी प्रत्येक घटना, प्रसंग, गोष्टी या तिरहित व्यक्तीला समजतात तेव्हा त्याला थोडा रंजकतेचा,  थोड्या अंगाच्या चार वाढीव गोष्टींचा समावेश असतोच आणि त्याचे प्रत्यंतर आपल्याला या पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये वाचायला मिळते.

सुलतान पेडणेकर हा लेखकाच्या घरी काम करणाऱ्या इबूचा म्हणजेच इब्राहिमचा मुलगा. त्याचं काम लेखकासोबत शाळेला जाणे आणि त्याच्यावर नीट लक्ष ठेवून शाळा सुटल्यावर लेखकाला घरी घेऊन येणे. भूत पकडण्याच्या, जादू टोण्याच्या, खजिन्याच्या गोष्टी सुलतान हा त्याच्या मोहक भाषेमध्ये सांगत असतो. कधी कधी त्यानेच बोललेल्या गोष्टी त्यालाच आठवत नसतात असा हा सुलतान विरोधाभासाचं अजब रसायन,  त्याच सुलतान हे नामकरण कसे झाले याची सुद्धा एक रंजक कथा आहे.

जिताडेबाबा हे मत्स्य आणि मांसाहारीप्रेमी व्यक्तिमत्व फक्त गावातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं. जिताडा हा दोन-अडीच ते सात-आठ किलो पर्यंत वाढू शकणारं मासा. आणि याच माश्याच्या एका गोष्टीमुळे तात्या दुर्वे यांना जिताडेबाबा हे नाव कायमचे चिकटले. या जिताडप्रेमाची कथा वाचकाला मोहिनी घालते.यासोबतच या कथेमध्ये लेखकाने मांसाहारी जेवणाचं, विशेषतः माश्याच्या कालवणाचे आणि इतर पदार्थांचे केलेले वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटते.

‘जयवंताची मृणाल’, मृणाल जयवंत दुर्वे, तिच्या प्रत्येक निर्णयाने ती गावामध्ये कायम तळपत आणि चमकत राहिली. सध्याच्या काळात सासरच्या आडनावासोबत माहेरचे आडनाव लावण्याची फॅशन असली तरी त्याकाळी माहेरच्या आडनाव नंतर सासरचे दुर्वे आडनाव लावून मृणालने गावाला एक मोठाच सांस्कृतिक धक्का दिला. सासरच्या घराला वाळवी लागली म्हनूण ती जागा बिल्डरला विकसित करायला देणे, असे बरेच धक्के तिने दिले आणि ते सर्व आपल्याला या कथेमध्ये वाचायला मिळतात.

‘खिडकी खंडू’,  कोवळ्या वयातच या मुलावर एक कौटुंबिक आघात होतो, ज्या वयात मुले स्वछंदपणे खेळतात त्यावयातच झालेल्या आघाताने तो पुरता हादरून जातो. त्याची कथा सांगतेवेळी लेखकाला पडलेले प्रश्न विचार करायला भाग पडतात. कोणत्याही गोष्टीला न घाबरणारा खंडू मग ते तळ्याच्या भुयारी जलमार्गातून पोहत रामटेकच्या ओहळापर्यंत जाण्याचे धाडसी कृत्य गावातल्या राती-महारातींना जमले नाही ते याने केले. पुढे या खंडूला स्मगलर खंडू, मुताऱ्या खंडू, कोयत्या खंडू, अशा उपाध्या मिळत गेल्या आणि त्या प्रत्येक उपाधीमागची कथाही तितकींच विनोदी आणि रंजक आहे. यासोबतच गावाला या अशा उपाध्या देण्याच्या सवयींवर सुद्धा लेखकाने भाष्य केले आहे.

मॅटिनी मोहम्मद, रंजन रमाकांत रोडे, गोलंदाज पुस्तकातील या गोष्टींबद्दल सुद्धा बोलावस तितका कमीच आहे. प्रत्येक कथा ही वाचकाला त्याच्या सोबत धरून ठेवते. प्रत्येक कथा ही सुरस आणि रंजक आहे. स्वतःचं असं वेगळेपण लेखकाने प्रत्येक कथेला दिले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यासर्व व्यक्तिरेखा ज्या गावामध्ये आहेत, त्या गावाचे वर्णन लेखकाने अत्यंत योग्य आणि सुंदर पद्धतीने केले आहे. वाचकाला त्या गावामध्ये गेल्याचा भास निर्माण होतो. प्रत्येक गाव हे त्याच्या स्वतःमध्ये त्याचं असं वेगळेपण, वेगळं महत्व घेऊन उभं असतं. एखाद्या अमरत्व प्राप्त झालेल्या योद्धा सारखं. लेखकांच्या मते पुस्तकातील या सर्व कथा या काल्पनिक, दंतकथा आहे. याचा खऱ्या आयुष्यासोबत साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी केले आहे. रोहन प्रकाशन यांनी त्याच्या दर्जेदार साहित्य निर्मितीच्या माध्यमातून वाचकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकामधील रेखाचित्रं अन्वर हुसेन यांनी साकारली साकारली आहेत. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक!


लेखक ह्रषीकेश गुप्ते लिखित गोठण्यातल्या गोष्टी.


जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा

https://rohanprakashan.com/product/gothanyatalya-goshti/


आमच्या चॅनेलला आजच भेट द्या   https://youtu.be/5VIjOdHZY1w


No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.